काय करू? काय करू? काय करू?
पाठवू का रिक्वेस्ट?
कॉलेजमध्ये कसली बेहद्द आवडायची मला, प्रपोज केलं तर नाही म्हणाली शहाणी.
म्हणे I am already enggaged.
काही एगेंज वगैरे नव्हती, आमिर खान फेवरेट होता ना तिचा, तशीच मुलं आवडायची तिला, चिकनी सुरतवाली.
मी काही वाईट नव्हतो, स्माईल कातिल होती आपलीही, पोरी काही कमी मागे नव्हत्या, मलाच तिच्याशिवाय कोण दिसत नव्हतं म्हणून.
निमिष तिच्या प्रोफाइल फोटोकडे बघत स्वतःशीच मनातल्या मनात बडबडत होता.
तो तसा रोजच एकदातरी तिच्या प्रोफाईलवर जायचा, रोज विचार करायचा पाठवावी का रिक्वेस्ट? पण नंतर सोडून द्यायचा.
त्याचं तिचं दोघांचही वेगवेगळं लग्न झालं होतं तरीही, तो तिला रोज एकदातरी बघायचाच.
असं नाही त्याला त्याची बायको आवडायची नाही, त्याची मॅरीड लाईफ मस्तच चालली होती. पण तरीही तो तिला, त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरू शकतच नव्हता, आणि त्याला विसरायचंही नव्हतं.
काही नव्हतं त्यांच्यात, तो तिच्यासाठी वेडा होता, आणि तिने त्यावेळी त्याच्या वेडाला कधी मनावर घेतलच नाही.
कुठलंही गाणं ऐकताना त्याला तिच दिसायची फक्त, त्याच्या डोळ्यात, मनात सगळीकडे तिच होती.
पण तिच्यापर्यंत ती आर्तता पोचवायला तो कमी पडला, अन् ती बेफिकीर तिचा चमको शोधत पुढे निघून गेली. हा तळमळत राहिला तिच्यासाठी, त्यावेळी तर लग्नही करणार नाही असाच प्रणही केला होता त्याने. कारण सदैव डोळ्यासमोर तिलाच ठेवलेली, बायको म्हणून दुसरी कोणी त्याच्या कल्पनेतही कुठेच नव्हती.
पुढे वर्ष सरली, निमिषने तिला मनात ठेऊनच लग्न केलं. बायको मनात भरली, हृदयात बसली, तिची जागा हलली, पण सुटली मात्र नाही.
रोज बघायचाच तिला, पण का कुणास ठाऊक त्याला आता तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी वाटू लागली.
रोज विचार करायचा पाठवू की नको. शेवटी एकदाची पाठवलीच. एक दिवस ती तशीच पेंडिंग होती, रिस्पॉन्स आलाच नाही काही, मग परत त्याने जाऊ दे सोडून देऊया, म्हणून ती डिलीटच करून टाकली.
तिने ती रात्री उशिरा पाहिलेली, उद्या करू एक्सेप्ट म्हणून ठेवून दिलेली. आणि दुसऱ्या दिवशी तिला ती रिक्वेस्ट उडालेलीच दिसली.
तिला कळलं, हा अजूनही तसाच लाजरा बुजरा राहिलाय.
मग तिनेच निमिषला रिक्वेस्ट पाठवली. त्याने बघितलं तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही.
त्याने लगेच एक्सेप्ट केली. ती करताना अजूनही त्याला मनात धडधडलंच.
मेसेंजरवर तिनेच मेसेज केला. अरे आता खूप मोठे झालो आपण, ठिक आहे यार……
रिप्लाय म्हणून त्याने स्माईली पाठवली.
बाकीच्या गप्पा झाल्यावर तो तिला म्हणालाच, मी अजूनही तुला विसरू शकलो नाहीये.
आणि सरप्राईजींंगली त्यावर तिचा रिप्लाय आला, मीही……
तो हादरलाच, आणि त्याने रिप्लाय केला, काय????
ती म्हणाली, हो, जेवढी मुलं माझ्यामागे होती ना त्यातला फक्त तूच आतापर्यंत मनात राहिलास, माझं तुझ्याबरोबर काही नसतानाही.
त्याला नवल वाटलं.
पुढे तिने लिहिलं, तुला सांगू का, तसं आता बोलायला काही हरकत नाही. तुझं प्रेम मला कळत होतं, वाटतही होतं, तू नेहमी माझ्यावर असाच प्रेम करशील, पण बाकीची कॅल्क्युलेशन्स तुझ्याबरोबर जमतील असं वाटलं नाही मला.
तुझं तेवढं ब्राईट फ्युचर असेल असं वाटलं नव्हतं मला त्यावेळी.
ओहहs पण मी आता एका कंपनीचा MD आहे, त्याने पटकन् रिप्लाय केला.
ग्रेट!! पण त्यावेळी तुझ्याकडे बघून तरी कोणाला तुझं काही धड होईल असं वाटण्यासारखा नव्हतास तू, स्टडिजमधे पण जेमतेमच होतास. आणि मला इमोशनल फूल बनण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.
तू प्रेम खूप देशील ही गॅरेंंटी नक्की होती, पण मी आंधळं प्रेम करण्यावर विश्वास ठेवणारी नव्हते. प्रेमाबरोबर मला बाकी सर्व ही हवं होतं.
मग तुला आता ते सर्व मिळालं असेलच, सुखी आहेस ना?, त्याने विचारलं.
त्यावर तिचा रिप्लाय आला, असा काही मी विचार करत बसत नाही. मला हवी ती प्रत्येक गोष्ट माझ्या हातात आहे, सुखीच असेन. एवढा मनाचा विचार करणारी असते तर तुझ्याबरोबर नसते का मी?
चल आता नंतर बोलू बाय….. त्याला मधेच तोडून ती ऑफलाईन गेली सुद्धा.
निमिषच्या मनात आलं, बरं झालं ती आपल्याबरोबर नाहीये. ऑल फॉर दि बेस्ट म्हणतात तेच खरं……तिला कधीच किंमत कळली नसती आपल्या प्रेमाची. तिच्या गरजा वेगळ्या होत्या, त्यात प्रेमाला शेवटचं स्थान होतं.
Thank God…….आता तरी समजलं मला. एवढे दिवस चुटपूट होती मनात, काश ती तेव्हा ‘हो’ म्हणाली असती …….
पण होतं ते चांगल्यासाठीच, खात्री पटली मला!!
त्यानंतर मात्र निमिषला तिचा फोटो पाहायची कधी इच्छाच झाली नाही. मनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून त्याने तिला कायमच ब्लॉक करून टाकलं.
©️ स्नेहल अखिला अन्वित
नेहीप्रमाणे सु रे ख!!!… मस्त लिहिलं आहेस!!
Mast akdm👌
yes….जे होत ते चांगल्यासाठीच होत…
Thank you dear😍
Thank you😍
Yess😍