सुखदाने तुळस स्वैपाकघराच्या खिडकीत तिला अगदी समोर दिसेल अशीच ठेवली होती. उठल्यावर पहिले जाऊन ती तुळशीला बघायची, तिला थोडं पाणी घालायची, आणि नमस्कार करून तिचा दिवस सुरू करायची. काहीतरी नातं असल्यासारखं वाटायचं तिला नेहमी त्या तुळशीशी. बघितलं तर छोटीशी होती तिची खिडकी, पण हिची तुळस मात्र त्यात चांगलीच तरारली होती. येणारे जाणारे सुद्धा हिच्या तुळशीकडे कौतुकाने बघायचे अगदी.
काही बिनसलं, जिव्हारी लागलं, की ती तिच्या तुळशीपाशी येऊन रडून मोकळी व्हायची.
ती तुळस ‘आई’ होती तिच्यासाठी. तिच्या आईचा जीव नेहमी तुळशीत असायचा. आजारी पडली तरी सारखी म्हणायची, माझी तुळस सांभाळा. आईचं मन सतत त्या तुळशीभोवती असायचं. आईने तिच्याशी कित्येकदा बोलतानाही बघितलेलं सुखदानं. तिच सवय सुखदानेही लावून घेतली होती.
एक तुळस आणि मन मोकळं करायला दुसरी तिची सखी होती उत्तरा. तिच्याच शेजारी राहायची. दोघीही वयाने साधारण सारख्याच असल्याने चांगलं जमायचं त्यांचं. दुपारची जेवणं झाली की बरेचदा उत्तरा हिच्या घरी यायची. उत्तराच्या घरी सासू होती, थोड्याफार कुरबुरी असायच्या, पण सुखदाशी बोललं की तिला बरं वाटायचं. मनात काही राहायचं नाही कोणाबद्दल.
याच उत्तराला सुखदाकडच्या तुळशीचं भारी अप्रूप वाटायचं. उत्तराचं घर मोठं होतं, प्रत्येक रूमच्या खिडक्याही मोठया होत्या, पण त्यात झाडं दोन तीन आणि तीही फारश्या काही बऱ्या अवस्थेत नव्हती. तुळस वाढणं सोडा, जगलीही नाही कधी. बाकी झाडाचं काही नाही पण सुखदाची तुळस बघून उत्तराच्या मनात हेवा वाटायचाच. ती नेहमी हिच्याकडून मंजिऱ्या घेऊन जायची, बाहेरून सुद्धा रोपं आणून लावलेली तिने कितीदा, पण तुळस जगली नाहीच कधी.
सगळी सुबत्ता होती उत्तराकडे, नवराही चांगला होता, गोडशी मुलगीही होती. पण तिला पडलेलं सुखदाच्या तुळशीचं. तिला सारखं वाटायचं हिच्यासारखी तुळस आपल्याकडे का येत नाही? काय कमतरता आहे आपल्या घरात? त्यात तिची सासू पण तिला सारखं बोलून दाखवायची, तुळस घरी पाहिजे हो, त्या सुखदाकडे बघ आणि आपल्याकडे कशी जगत नाही कोण जाणे? रोज एकदा तरी सासू हा विषय काढायचीच. त्यामुळे तिला आणखी घोर लागायचा.
सगळं सुख असूनही ती दुःखी होती, काय तर तुळस जगत नाही म्हणून!! तिला सुखदाचा हेवा वाटायचा. सासूच्या बोलण्यामुळे जास्तच. आपलंच सुख आपल्यालाच टोचायला लागतं असं काही झालं होतं तिचं……….
विचार करून करून तिला हळूहळू निगेटिव्ह फिलिंग यायला लागली होती, कशात रस वाटेना झाला. सारखे सासूचे शब्द डोक्यात फिरायचे, तुळस जगली पाहिजे हो!! काहीतरी नकारात्मक घरात आहे, किंवा माझ्यात तरी आहे, म्हणूनच तुळस जगत नाही, किंवा ती जगत नाही म्हणजे काही तरी वाईट होणार आहे असे विचार सतत तिच्या डोक्यात फिरायला लागले होते. दिवसेंदिवस ती मलूल होऊ लागली होती, उगाच स्वतःच्याच मानसिक ताणाने.
नंतर तर सुखदाकडेही जाणं टाळू लागली ती. चार दिवस वाट पाहून सुखदाच विचारायला गेली, तर सासू म्हणाली तिला बरं नाहीये. हल्ली काहीतरी विचित्रच वागते. बघ जरा तूच समजावून.
सुखदा गेली, तर ती पडून होती. तिची लहान मुलगी एवढंस तोंड करून बसली होती.
सुखदाला पाहून उत्तराला भरून आलं. सुखदा म्हणाली, काय झालं ग एकदम?
उत्तरा म्हणाली, काही नाही मन नाही लागत ग हल्ली कशात. छान वाटतच नाही. प्रसन्नताच नाही मनात.
पण झालं काय ते तरी सांग मला, कसलं दुःख खातय तुला? आपण बोलतो की बरच काही. तुलाच चांगलं वाटेल, मनात आहे ते बोल मोकळी हो, सुखदा तिचा हात हातात घेऊन म्हणाली.
तुझी तुळस मला छळतीये ग सुखदा, उत्तरा एकदाची बोललीच.
अगं, माझी तुळस तुला का छळेल?, सुखदा आश्चर्याने म्हणाली.
बघ ना मी इतके वेळा लावली, कधी जगलीच नाही ग. काय होतंय कुणास ठाऊक? मला पण असावी वाटते तुळस घरी, प्रसन्न वाटत बघितलं की!! पण जगतच नाही ती. सासूबाई रोज टोमणे मारतात मला, तुझ्या हाताला गुण नाही. त्यांच्या हातानेही नाही लागलीये, ते विसरतात त्या.
मनात नेगेटिव्ह गोष्टीच येतायत ग फक्त. मनातून जात पण नाही आणि गेलं तरी त्या आठवण करून देतात. सारखी तुझी माझी तुलना करतात. प्रत्येक गोष्टीत हातगुणावरून हल्ली ऐकवतात मला. मन उडायला लागलंय ग सगळ्यावरुन, उत्तरा बोलता बोलता आणखी रडायला लागली.
काय त्या तुळशीचं एवढं मनाला लावून घेतलंस ग तू, उत्तरा?
मी अगोदरही सांगितलं होतं तुला, पाण्याचं प्रमाण कमी जास्त होत असेल, जागाही बदलून बघायला सांगितली होती ना? एवढं तुझं मन खाल्लं जात असेल या गोष्टीने, याची कल्पना नव्हती ग मला………
थांब, दोन छोटी रोपं आलीयेत माझ्याकडे, ती घेऊन येते, आपण तिघी मिळून लावूया. तुझ्या मुलीला पण घे बरोबर.
इथेच लावूया, बेडरूममध्ये, विसावायला टेकलीस की समोर दिसेल. काही सांगावसं वाटलं तर सांगत जा तिला.
तुला सांगू, तुळस काय किंवा दुसरं कुठलंही झाड काय प्रेमानेच फुलतं ग मांणसांसारखच. नुसतं त्याला जगवायला पाणी घाला, आणि दिवसभर ढुंकूनही बघू नका अशाने त्याचाही इंटरेस्ट जातो जगण्यातला. तुला कोणी विचारलं नाही दिवसभर, नुसतं खायला प्यायला दिलं, तर तुला तरी जगावं वाटेल का? तेच मायेने कोणी जवळ घेतलं, तू आम्हाला हवी आहेस सांगितलं तर किती ऊर्जा येईल नाही अंगात!! ती झाडं पण जीवच ना ग……..
एवढं बोलून सुखदा पटकन उठली आणि तिच्याकडची दोन तुळशीची रोप तिने हलकेच काढून आणली, त्यांना प्रेमाने कुरवाळून सांगितलं, माझ्या मैत्रिणीकडे सोडतेय तुम्हाला, भरभरून आनंद घ्या तिला!!
तिघी मिळून ती रोपं कुंडीत लावायला लागल्या, तेवढ्यात तिच्या सासूबाईही दिसल्या दारातून डोकावताना, सुखदाने त्यांनाही बोलावलं, सगळ्यांनी मिळून ती रोपं लावली. ती तुळशीची कुंडी उत्तराने बेडरूममध्ये कुठूनही दिसेल अशी नजरेसमोर ठेवली. सुखदा म्हणाली, आता ही तुझी नवी जिवाभावाची सखी. जेवढा लळा लावशील तेवढी भरभरून वाढेल, हातगुण सोड, प्रेमगुण बघू तुझा किती आहे तो!!
दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली, त्या मिठीतूनच काही न बोलता सुखदाला उत्तराने लाख धन्यवाद दिले.
मनातली सगळी मरगळ घालवून उत्तरा उठली आणि मुलीला म्हणली, हिला जपायचं हं आता आपण नीट. मुलगी म्हणाली, तू अशीच छान, हसरी राहशील तर मी नक्की जपेन तिला कायमसाठी!!
मायलेकी दोघी रोज तुळशी जवळ जाऊन बोलायच्या, तिथे बसून गप्पागोष्टी करायच्या, मूकपणे तुळसही त्यात सहभागी असायची. बघता बघता प्रतिसाद म्हणून महिनाभरातच चांगलंच अंग धरलं तिनं……..
सासू बघत होतीच, पहिले तर तिला वाटतच नव्हतं, हिच्या हातगुणाने काही होईल, पण शेवटी तिने मान्य केलंच हातगुण कसाही का असेना प्रेमगुण जास्त महत्वाचा!!
थोड्याच दिवसात तीही ह्यांच्या बरोबर तुळशीपाशी रमू लागली. या मायलेकींबरोबर सुख-दुःखाच्या गप्पा मारू लागली, तिला तरी कोण होतं यांच्याशिवाय?
मनं मोकळी झाली तशी त्या तिघींची छान गट्टी जमली. ही नात्यांची मैत्री जशी अधिकाधिक फुलू लागली, तशी त्यांची तुळसही आनंदाने आणखी आणखी डवरू लागली……..
फोटो साभार: गुगल
©️स्नेहल अखिला अन्वित
कथा आवडल्यास माझ्या ‘हल्ला गुल्ला’ या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा……..