सुरुची संध्याकाळी चहा घेताना सहज म्हणून व्हाट्सप बघत बसलेली, तेवढ्यात तिला एका मैत्रिणीने फॉरवर्ड केलेली बातमी आली, जी वाचून तिला धक्काच बसला.
एका परिस्थितीने गांजलेल्या बाईचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा, तिला कशी एका मोठया नेत्याने आर्थिक मदत केली, दवाखान्याचं बिल भरण्यापासून ते तिला न परवडणारी महागडी औषधं तिच्यापर्यंत पोचवण्यापर्यंत……
त्या नेत्याची जनसामांन्यांबाबत असलेली कळकळ दाखवण्यासाठी खास ती बातमी हायलाईट करून टाकली होती.
सुरुचीने त्या मैत्रिणीला डायरेक्ट फोन केला, आणि म्हणाली, काय ग खोट्या बातम्या असतात एकेक.
आपण तर चांगलंच ओळखतो ना या बाईला? ही कुठे गांजलेली आहे ? मी तर शॉक झालीये ही बातमी वाचून. कशी लोकं असतात एकेक??
तिची मैत्रीण म्हणाली, हो ना!! म्हणूनच तर तुला पाठवली सुरुची. बघ कसा खोटा देखावा असतो सगळा.
अगं ही तर लॉकडाऊनच्या आधी माझ्या घरी आली होती, तेव्हा तिने नुकताच मोबाईल घेतलेला, तोच पंचवीस हजाराचा होता. मग कशी गांजलेली?
आता या बाईला आपण ओळखतो म्हणून ठिक, नाहीतर आपणही विश्वास ठेवला असता. तिच्या गरिबीबद्दल हळहळ वाटून घेतली असती, आणि त्या नेत्याच्या दिलदारपणाबद्दल कौतुक वाटलं असतं!!
सगळच खोटं खोटं……
राईचा पर्वत करून सांगितलेलं…… कसा विश्वास ठेवायचा या बातम्यांवर??
माणसंही खोटी आणि बातम्याही खोट्या…..
काय वृत्त्या असतात एकेकाच्या, मिळेल ते सगळं लुबाडू पाहणाऱ्या!!
फोन झाला तरी सुरुचीच्या डोक्यातून तो विषय जातच नव्हता. का असं वागतात लोकं?? ज्यांना खरी गरज आहे त्यांना मिळू द्यावी ना मदत, गरज नसताना का लुबाडायची इच्छा??
तिला नुकतीच वाचलेली दुसरी बातमी आठवली. साधारण परिस्थितल्या बाईने कोरोना काळात नगरसेवकाकडून मिळणारी धान्याची मदत नाकारली. कुणा गरजवंताला मिळावं म्हणून. आमच्याकडे आहे पुरेसं, ज्याला नाही त्याला मिळू द्या.
किती समाधानी वृत्ती!! हपापलेपणा नाही, किंवा मिळतंय ना फुकटात तर काय जातंय घ्यायला, असाही विचार नाही.
साधारण दोन वर्षांपूर्वी सुरुचीबरोबरही असंच काहीसं घडलेलं, तेही या निमित्ताने तिच्या डोळ्यासमोर आलं…….
सुरुची एकुलती एक होती. आईवडील तिच्याच शहरात राहणारे. आईला खूप साऱ्या सामानाची हौस होती. रिटायरमेंट नंतर पैसाही हातात खेळत होता. त्यामुळे ती सारखं काही ना काही खरेदी करून आपली हौस भागवत होती. दोघंच होते तरी सगळं घर भरपूर सामानाने भरलं होतं. सुरुची सारखी सांगायची आईला आता बास उगाच काही घेत बसू नका. तर आई म्हणायची, आमच्या नंतर तू वापरशील की. सुरुची म्हणायची, अगं आई, माझ्या घरात आहे की सगळं, हे कुठे ठेवणार मी आणखी?
माझ्यासाठी म्हणून काही घेऊ नका, मी काही नेणार नाही.
असं बोलणं त्यांच्यात नेहमीच व्हायचं. एकदा तिची काकू आली होती, तेव्हाही बोलता बोलता तोच विषय निघाला, तर काकू पटकन म्हणाली, आता नाही म्हणतीयेस पण नंतर नेशील बरोबर. मिळणारं कोणाला नको असतं?
त्यावेळी सुरुचीला ते मनाला खूप लागलं होतं. तिने विचार केला, माझ्याकडे असताना मी का नेईन? फक्त मिळतंय म्हणून?
पुढे काही वर्षांच्या अंतराने आईवडील दोघेही गेले. घरात भरपूर सारं सामान होतं. मोठा टिव्ही, मोठा फ्रिज, मोठमोठी कपाटं, आणखी पाच संसार उभे राहतील एवढी भांडी, आणखीनही कित्येक गोष्टी.
सुरुचीने स्वतः भेट देऊन आश्रम निवडले, आणि मोह टाळून सर्व खऱ्या गरजवंताना शोधून देऊन टाकलं.
तिच्या घरच्या टिव्हीपेक्षा आईचा टिव्ही खरंतर खूप मोठा होता, पण जो तिच्याकडे होता तो तिच्या नवऱ्याने त्याचं प्रमोशन झाल्यावर घेतला होता, त्याची काही खास जागा होती तिच्या मनात, म्हणूच तो काढून मोठा मिळालाय तर लावावा असं अजिबात वाटलं नाही तिला.
तिच गोष्ट फ्रिजची, आईचा फ्रिजही चांगलाच सुटसुटीत आणि मोठा होता, पण सुरुचीला तो मोठा फ्रिज घरी असण्यापेक्षा जिथे भरपूर माणसं असतील तिथे असणं योग्य वाटलं. तिथेच त्याचा पूर्णपणे वापर झाला असता.
आईकडे काय नव्हतं, हौस म्हणून उपयोगाचं आहे की नाही, याचा विचार न करता घेतलेलं बरंच काही होतं.
आईच्या घरी काम करणाऱ्या बाईला पण तिच्या उपयोगाच्या गोष्टी देऊन टाकल्या तिने, विशेष म्हणजे तिनेही मिळतंय तर दोन गोष्टी आणखी मागा, असं करत उतावळेपणा दाखवला नाही. खूप कौतुक वाटलेलं तेव्हा तिचं सुरुचीला!!
हा, काही आठवणी मात्र सुरुचीने नक्की स्वतःकडे ठेवल्या, बाबांचं आवडत्या पुस्तकांचं कपाट आणि आईला आवडणारं हलकीशी किणकिण करणारं विंडचिम्पस् !!
आजही या दोन्ही गोष्टींत सुरुचीला आईबाबाचं अस्तित्व सतत जाणवत राहायचं. त्यांच्या सर्वात आवडत्या वस्तू आता सुरुचीच्या हृदयाच्या सर्वात जवळच्या वस्तूंपैंकी होत्या.
सगळं डोळ्यासमोर आलं, आणि तिला वाटलं; बरं झालं आपण तो मोह टाळला, नाहीतर यांच्याबरोबर मलाही माझ्या वृत्तीची आज किव आली असती………….
फोटो साभार: गुगल
©️स्नेहल अखिला अन्वित
कथा आवडल्यास माझ्या ‘हल्ला गुल्ला’ या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा……..
Thank you kahi prashnanchi uttar milali