तेव्हा शुभदा आपल्या नवीन जागेत राहायला येऊन जेमतेम दोन दिवस झाले होते. तशी कोणाशी ओळखही झाली नव्हती तिची. त्याचं तेवढं तिला काही वाटलही नाही, आणि तसाही वेळ आवरासावर करण्यातच जात होता. मुलगी होतीच अडीच वर्षाची, फुल टाईम कामाला लावणारी. तिचा नवरा नऊ वाजता ऑफिससाठी घर सोडायचा ते सात साडेसात वाजेपर्यंत घरी यायचा. तोवर या दोघीच.
एके दिवशी अशीच कामं आवरून शुभदा तिच्या मुलीबरोबर खेळत बसली होती, तेवढ्यात बेल वाजली. आता यावेळी कोण म्हणून तिने पाहिल्यांदा आयहोल मधून पाहिलं. सदरा आणि लेंगा घातलेला माणूस दिसला. हा कोण आता म्हणून आणखी नीट पाहिलं, तसा बघण्यातला वाटला. म्हणून मग सरळ दार उघडलं.
मुलगी शुभदाच्या जवळच तिला पकडून होती. तो एकदम ओळखीचं हसून म्हणाला, काय ठिक आहे ना सर्व. नवीन आलात ना तुम्ही. काही प्रोब्लेम नाही ना? मुलीचा तर त्याने गालगुच्चाच घेतला. तिला नाहीच पण शुभदाला ही नाही आवडलं.
तिने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मी वर राहतो, काही लागलं तर आवाज द्यायचा हा.
तो निघून गेला, हिने थोडं जोरातच दार लावलं. कोण होता हा? काय माणसं असतात एकेक. जान ना पेहेचान, ह्याला दूरच ठेवलं पाहिजे.
संध्याकाळी तिने नवऱ्यालाही सांगितलं, तो म्हणाला; बिल्डिंगमध्येच राहतो ना? मग असेल कोणीतरी एवढा नको विचार करू.
दुसऱ्या दिवशी शुभदाकडे तिची मैत्रीण आणि तिचा नवरा आला होता. गप्पा सुरु होत्या. दरवाजा ढकलेला होता फक्त.
तो सदरा आणि लेंगेवाला पुन्हा आला आणि दरवाजा सरळ ढकलून त्याने हिच्या मुलीला हाक मारली. ए सोनू, सोनू!!
शुभदाची मुलगी म्हणाली, माझं नाव सोनू नाही. दिव्या आहे.
तो म्हणाला, माझी सोनूच!! मी तुला सोनू म्हणणार.
एवढं बोलून तो गेलाही.
इकडे सगळे स्तब्ध, मैत्रीण म्हणाली, कोण ग हा. मेन्टलच वाटतोय जरा.
शुभदा म्हणली, हो ग मलाही तसच वाटत. उगीच सारखा डोकवतोय कालपासून.
शुभदाला त्याचा भयंकर राग येत होता. ब्लॉकमध्ये अशी सिस्टम असते का, उगाच कोणाच्याही घरी डोकावण्याची?
काय आहे हे, प्रायव्हसी आहे की नाही? पुढे दुसऱ्या दिवशीही त्याने खिडकीतून तिच्या मुलीला हाक मारली. काय करते सोनू विचारलं आणि निघून गेला.
शुभदाचं घर ग्राऊंड फ्लोअरलाच होत. जाता येता बिल्डिंगमधली सगळी माणसं दिसायची.
नंतर तर तो सारखाच खिडकीतून मुलीशी बोलू लागला, आणि मुलगीही त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. तो दिसला की तिलाही आनंद व्हायचा. पण शुभदा मात्र मनात उगाचच अढी ठेऊनच होती.
खिडकीत मुलगी नाही दिसली तर तो बेधडक बेल वाजवून दरवाजा उघडायला लावायचा. किंवा ढकलेला असेल तर उघडून पोरीला बोलवायचा. तिच्याशी दोन शब्द बोलून वर घरी जायचा.
शुभदाला हे आवडत जरी नसलं, तरी तिला आतापर्यंत कळलं होतं, की तो खरंच डोक्याने थोडा अधू होता. आणि अपायकारक तर मुळीच नव्हता.
कारण एकदा असच तिची मुलगी आत बेडरूममध्ये होती. हा तिला बोलवत होता तर ती येत नाही म्हणून हा बिनधास्त आत बेडरूममध्ये शिरला, आणि मुलीशी दोन शब्द बोलून निघूनही गेला.
पण त्यावेळी शुभदाला मनात अगदी धस्स झालं होतं. त्याच्यावर संशयही आला होता, पण तो फार साधा होता. दुनियदारीपासून खूप लांब, त्याच्या डोक्याची समजच नव्हती तेवढी.
त्यानंतर एकदा मुलीने खिडकीतून खेळणं बाहेर टाकलं म्हणून ती तिला घरात ठेऊन ते उचलायला गेली. नुसता दरवाजा ओढण्याच्या नादात लॅच लागलं, मुलगी घरात अन् ती बाहेर अडकली.
खिडकीला सरकतं ग्रील होत, त्याच कुलूप फोडायला ती दगड मारत होती तेवढयात तो कुठूनतरी आला. काय झालं ते कळल्यावर त्याने त्याच्या घरातून मोठा हातोडा आणला, आणि एका दणक्यात ग्रीलचं कुलूप फोडून आतमध्ये उडी मारून गेला. मुलीला घेऊन पहिल्यांदा त्याने लॅच उघडलं. जणू काही घाई यालाच जास्त होती.
तेव्हापासून शुभदाची त्याच्याकडे बघण्याची नजरच बदलली. तीही त्याच्याशी अगदी घरच्या माणसासारख बोलू लागली.
आणि ती चांगली बोलते म्हणून हा ही तिच्याशी, तिच्या घरातल्या सगळ्यांशी आपलेपणाने बोलू लागला.
मग हळूहळू शुभदाच्या लक्षात येऊ लागलं, अरे हा तर आपला बंडूमामा होता तसाच आहे अगदी.
शुभदा लहान असताना, हा बंडूमामा, तिच्या आईच्या आत्याचा मुलगा चार महीन्यातून एकदा तरी त्यांच्याकडे यायचाच. येताना सगळ्या लहान मुलांसाठी आठवणीने गोळ्या आणायचा. तो आला की शुभदाला शाळेत सोडण्या- आणण्याचं काम त्याच्याकडेच असायचं. तिलाही आवडायचा तो येणार म्हटल्यावर.
तो कधीही कुठलंही काम करायचा. तो खरंतर सगळ्यांची सगळी काम करण्यासाठीच होता. डोक्याने अधू म्हणून तसा सर्वांकडून दुर्लक्षिलेला. पण मनाने अगदी साधा.
मुलांसारखच मन म्हणून तो सगळ्याच मुलांना खूप खूप आवडायचा.
आणि हा ही असाच होता. शुभदाला वाटलं, खोट त्याच्या मनात नव्हतीच कधी. आपल्याच मनात होती. तिलाही आता त्याच्याबद्दल तिच्या बंडूमामामुळे ओलावा वाटायला लागला. तो दिसला की तिला बंडू मामाच आठवायचा.
त्याच्याशी नीट बोलणारे तसे कमीच होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छदमी हास्यच यायचं त्याच्याकडे बघून. तो सगळ्यांशी चांगला बोलायचा वागायचा, पण बहुदा सगळे त्याला झिडकारायचेच. तो अजिबात अपायकारक नसताना, फक्त डोक्याने कमी म्हणून.
शुभदाला वाटायचं, त्याचा बिचाऱ्याचा काय दोष त्यात? अशांना हवही काय असतं? कुणी थोडही चांगलं बोललं की खूष होतात अगदी. पण त्याच्याशी थोडं चांगलं बोलायलाही जीवावर यायचं माणसांना, हे सत्य होतं. तो कामानिमित्त सारखा खालीवर करत असायचाच, आणि प्रत्येक वेळी हिच्या घरात आवाज दयायचाच.
आता अस झालं होतं की त्याचा आवाज नाही ऐकला तर हिला आणि मुलीला चुकल्यासारखं वाटायला लागायचं.
त्याच्या घरी सगळे होते, आणि त्याला व्यवस्थित संभाळूनही होते. लग्न होणं तर दूरच होतं त्याच्यासाठी.
आता शुभदालाही तिथे आठ वर्षे झाली होती. आणखीही एक मेम्बर घरात वाढला होता. मुलीला सोनू आणि मुलाला सोन्या त्याची त्यानेच नाव ठेवलेली. हा दोघा पोरांना सारखं जाऊन येऊन विचारत बसायचा.
असंच एकदा शुभदाने घराचं रिन्युएशन काढलं होतं. घरात सगळीकडे पसारा होता, काम करणारी माणसं होती. तिला त्यात काहीच सुचत नव्हतं. अस्ताव्यस्त सगळं बघून नुसतं इरिटेट होत होतं. मुलांनाही मैत्रिणीकडे पाठवून दिलं होतं.
आणि नेमका नेहमीसारखा खिडकीतून त्याचा आवाज आला. तो पोरांना बाहेरून हाका मारत होता. शुभदा काम करून आणि बाकीच्या आवाजने खूप वैतागलेली होती, तिने त्याला उत्तरच दिलं नाही. उत्तर आलं नाही म्हणून त्याने सरळ दरवाजा ढकलून विचारलं, मुलं कुठायत?
तिला वाटलं, ह्या पसाऱ्यात ह्याला आत्ताच यायचं होतं? ती जरा त्रासिकतेनेच बोलली, मुलं बाहेर गेलीयेत.
मनात काही नव्हतं तिच्या, त्यावेळी कोणीही समोर आलं असत तर कदाचित हिच रिऍक्शन असती तिची. तिला फारसं काही वाटलं ही नाही तेव्हा.
दुसऱ्या दिवशी मात्र तो हॉस्पिटलमध्ये असल्याची खबर तिला पोचली, तेव्हा तिला खूपच वाईट वाटलं. लवकर बरं वाटु दे म्हणून देवाला बोललीही ती.
आणि तिसऱ्या दिवशी तो डायरेक्ट गेल्याचीच खबर आली. शुभदाला खरंच वाटेना. अरे, परवा तर बोलला ना हा माझ्याशी. चांगला तर होता. हे काय अनपेक्षित?
आणि ती शेवटची आठवण तरी काय असावी, मी वैतागल्याची? इतके वर्ष त्याच्याशी चांगले बोललो आपण.
तो गेला, आणि हिच्या जीवाला मात्र कायमचा चटका लागला.
ती विसरू म्हणताही विसरू शकणार नाही, अशी आठवण तिला देऊन गेला. काय बंध होते कोण जाणे? एकदा दोनदाच कधी म्हणाला असेल, राग नाही ना येत तुला. मला मोठा भाऊ समज हा. लोकं माझ्यावर सारखी रागवत असतात.
ती त्यावेळी मनातच म्हणालेली, मला नाही राग येणार, मी तुझ्यासारखा माणूस पाहिलाय.
तो जाऊन चार वर्ष झाली, तरी शुभदाला अजूनही सारखं वाटतं, तो येईल आणि हाक मारेल. तो होता तर बिल्डिंग गजबजलेली वाटायची तिला. तो सारखा इकडे तिकडे करत असायचा.
सर्वांना विनाकारण हाका मारून बोलतं करायचा.
आता तो नाही तर तसं काही कोणी करत नाही. कारण आता तिथे कोणी डोक्याने अधू नाही ना मनाने त्याच्याइतकं साफ!!
तसा त्याच्याजाण्याने कुणाला काही फरकही नाही, कारण आधीही तो कुणाच्या खिजगणतीतीत नव्हता, आणि आतातर अजिबातच नाही.
पण शुभदाच्या घरी मात्र जातानाही आठवणीने कायमची आठवण ठेऊन गेला तो………कुठल्या हक्काने ते त्याचं त्यालाच माहीत…………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा, आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा.