पौर्णिमा आणि संपदा दोघी सख्ख्या जावा. पौर्णिमा मोठी तर संपदा धाकटी. पौर्णिमा लव्ह मॅरेज करून आलेली होती तर संपदाला सासूने खास आपल्या गावाकडून पसंत करून आणलेली होती.
तसं पाहिलं तर सासूला दोघी सारख्या होत्या. ती काही सुनांचं उणंदुणं काढत बसणारी नव्हती. तिला आपलं देवधर्मात रमायला जास्त आवडायचं.
संपदा नवीन आली होती, तेव्हा पौर्णिमा तिच्याशी फार छान वागायची. पण तरीही मनात ठुसठुसत असायचंच, की ही सासूबाईंनी आणलेली, हिच त्यांची आवडती असणार वगैरे.
आणि इकडे संपदाला वाटायचं, ह्या दोघींचं चांगलं सूत जमलेलं असणार, मला एकटीला पाडतील या, जपून राहील पाहिजे.
दोघींनी मनातल्या मनात आपल्याच मनाचं पकडलं, त्यामुळे थोड्या दिवसातच त्यांचं प्रेम ओसरलं आणि त्या एकमेकींना पाण्यात पाहू लागल्या. दोघीही सासूबाईंना एकमेकींविषयी सांगायच्या, पण सासूबाई यात पडणाऱ्या नव्हत्याच. त्या दोघींनाही एकमेकींशी जुळवून घ्यायला सांगायच्या. पण त्या सांगण्याचाही दोघी वेगळाच अर्थ घ्यायच्या, आणि दोघींना वाटायचे सासूबाईची लाडकी तिच, मी नाही.
अशी कुठली गोष्ट नसेल ज्यावरून या भांडायच्या नाहीत. काही वर्षांनी दोघींकडे एक एक मुलंही आलं. आई झाल्यावर मॅच्युअरपणा वाढण्यापेक्षा भांडणाला आणखी पोरांचाही विषय वाढला. दोघीही चांगल्या सुशिक्षित होत्या, नोकरीही करत होत्या, तरी नोकरीवरून थकून आल्यावरही त्यांच्यात जीव असायचाच भांडायचा. ह्यांच्या भांडणानी सासूबाईंनाच सळो कि पळो करून सोडलेलं अगदी.
एकदा तर सासूबाईंनी यांना सांगितलंही दोघीही निघून जा इथून, आपापला वेगळा संसार मांडा, मी मेल्यावर या इथे उच्छाद मांडायला. आहे तोपर्यंत मला सुखाने जगू दे तरी.
घर तसं मोठं चार खोल्यांचं होतं, सासऱ्यांनी सासूबाईंच्या नावावर ठेवलेलं होतं. दोघींनाही घर हवं होतं. सोडून गेलं तर कुणी एकटीने बळकावण्याची भीती वाटत होती.
त्यामुळे तिथून हलायला कोणीच तयार नव्हतं.
हलायलाही तयार नव्हतं आणि सुधारायलाही तयार नव्हतं.
ह्यांच्या भांडणानी सासूबाईंचं देवधर्मात पण नीट लक्ष लागत नव्हत. त्यांना वाटायचं, आपण आहोत तर खाऊ की गिळू करतायत एकमेकींना, आपण नसल्यावर काय करतील या, आणि माझी मुलं, नातवंड जशी सुखी राहतील,यांच्या गदारोळात!!
काय करावं विचार करता करताच त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली.
त्यांनी एक दिवस दोघींना बोलावलं, आणि त्यांना म्हणाल्या, तुम्हांला तर माहितीये गेली, कितीतरी वर्षे मी देवळात जातीये. तिथे बाबा बसतात त्यांना एकदा मी विचारलं, आमच्या घरात शांती नाही बाबा. काय उपाय करावा?
तर त्यांनी मला काय सांगितलं माहितीये?
दोन्ही जावंचे कान टवकारले.
सासूबाई पौर्णिमाला उद्देशून म्हणाल्या, तू घरी यायच्या आधीच एक वर्षं आम्ही इथे शिफ्ट झालो होतो. शिफ्ट झालो आणि तुमचे सासरेबुवा गेले. मग तू आलीस, तुझ्यापाठोपाठ काही महिन्यात ही आली.
पौर्णिमा म्हणाली, मग त्याचं काय ?
त्याचं काही नाही, बाबा म्हणाले ही जागाच धार्जिणी नाही तुम्हाला. ही जागा सोडा. त्यातून येणारा पैसा दान करा, म्हणजे सर्व ठिक होईल.
म्हणून मी आता ठरवलंय, ही जागा नको,आणि या जागेचा पैसाही नको. जागा नाही लाभली तर पैसे कसा लाभेल?
अगं तुमचा दोष नाहीच, तुम्ही सरळ साध्या आहात, ही जागा दोषी आहे. नवीन होता तेव्हा किती प्रेमाने वागायचा एकमेकींशी. तुमच्या मनात एकमेकींबद्दल प्रेम आहे, पण बाहेर येत नाही, ते या जागेमुळे फक्त.
ही जागा मनातून उतरलीच आहे आता माझ्या. मी विकायची ठरवलीय आता ही आणि पैसेही दान करायचे ठरवलेत. दोषी पैसा नकोच घरात. मनःशांती मोठी पैशापेक्षा, हो की नाही?
दोघीच्या तोंडातून शब्दच फुटणं मुश्किल झालेलं सगळं ऐकल्यावर………
सासूबाईंचं पुढे म्हणाल्या,आता तुम्ही चौघे तर चांगलंच कमावता. तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्हाला काय कमी? मी राहीन दोघांकडे येऊन जाऊन.
खूप शांती लाभेल आपल्या सगळ्यांना, बाबांचे बोल नेहमी खरे ठरतात, तुमच्या दोघींनाही पहिली मुलगी सांगितलेली, झाली ना बरोबर?
मी मुलांनाही सांगते, ही जागा हा पैसा नको आपल्याला, शांती हवी शांती!!
पौर्णिमा आणि संपदाला यावर काय बोलावं तेच कळेना. पहिले तर वाटलं सासूबाईंचं डोकच फिरलंय की काय? पण ते तर नीट वाटत होतं. अगदी एक एक मुदा पटवून देत होत्या त्या. जे घर विकून पैसा दान करायचं बोलत होत्या, त्या घराची किंमत करोडोत होती. मोठ्या मोठ्या खोल्या, प्रत्येक खोलीला गॅलरी, असं घर तर दोघींच्याही नवऱ्यांना घेताच आलं नसतं. आणि आता एवढं मोठं घर सोडून दुसऱ्या घरात ऍडजेस्ट करायची तयारीही नव्हती त्यांची. त्यातून काय तर हे घर विकून त्याचे पैसेही घ्यायचे नाहीत??
त्या शांतीसाठी?
दोघींनाही वाटलं, सासूबाईना काय होतंय बोलायला, त्यांच झालं आता सगळं. आमच्या संसाराची तर सुरुवात आहे.
दोघीही काही न बोलता तिथून उठल्या. रात्रभर काही झोप आलीच नाही त्यांना. सकाळी उठल्या त्या पहिले एकमेकीकडेच धावल्या. दोघींनाही न बोलताच कळालं, काय म्हणायचं आहे ते. तरी संपदा बोललीच, ताई जे झालं ते विसरून जाऊ. जावा जावा बहिणी होऊ.
पौर्णिमाही तिला दुजोरा देत म्हणाली, हो ग त्यातच शहाणपणा आहे. सासूबाईंनी जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. काहीही बोलायला लागल्यात. आपण जमवून नाही घेतलं तर या घराला मुकावं लागेल ग बाई.
दुपारी दोघी सासूबाईंकडे गेल्या, आणि म्हणाल्या, आम्हाला नाही वाटत हो घराचा दोष आहे. आम्ही खूप विचार केला आणि आमच्या लक्षात आलं, चूक आमचीच आहे. घरातल्या अशांतीच कारण आम्हीच आहोत.
त्यांना मधेच थांबवत सासूबाई म्हणाल्या, छे काहीही काय? बाबांनी तुमचं नाव घेतलही नाही. उगाच काहीतरी मनाला लावून घेऊ नका. होतात अशी भांडण सगळीकडेच. दोष घराचाच आहे नक्कीच. मला हे घर नकोच.
सासूबाई हे बोलताच दोघींनाही धडकीच भरली. स्वतःला सावरून पौर्णिमा म्हणाली, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ का? जरा वेळ द्या आम्हाला. महिनाभरात तुमच्या लक्षात येईल दोष नक्की कुणाचा होता?
सासूबाईंना हेच अपेक्षित होतं, तरी चेहऱ्यावरील एकही भाव न बदलता त्या म्हणाल्या, जे इतकी वर्षे नाही कळलं, ते एका महिन्यात कसं कळेल?
दोघीही जावा मान डोलावून म्हणाल्या, कळेल नक्की कळेल. आम्हाला महिना तर द्या.
सासूबाईंनी उगाच आढेवेढे घेतल्यासारखं केलं, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना महिना देऊन टाकला.
आता मात्र दोघी जावा एकमेकींवर धुसपूस न करता, एकमेकींना किती ऍडजस्ट करता येईल बघू लागल्या. थोडं अवघड गेलं सुरुवातीला, पण दुसरा काही पर्यायही नव्हता त्यांच्याकडे.
पण हे सगळं पहिले मुद्दाम करता करता नंतर मात्र त्यांच्या लक्षात येऊ लागलं, आपण समजत होतो तेवढं कठीण नव्हतंच हे. आपण दोघीनींंही कधी एकमेकींचे स्वभाव पडताळून बघितलेच नाहीत. तसा मौकाच दिला नाही. आपण मन स्वच्छ ठेऊन कधी बघितलंच नाही एकमेकींंकडे. बहिणी, मैत्रिणी होता आलं असतं आपल्याला सहज, पण आपण त्याच ठरवून दिलेल्या नात्याला घट्ट पकडून बसलो.
महिन्याभरात दोघीनांही कळलं, आपलं काय चुकलं. महिना झाला तसा दोघीही आनंदाने गेल्या सासूबाईंकडे आणि म्हणाल्या; बघा, आम्ही तुमच्या बाबांना खोटं ठरवलं. दोष घराचा कुठे होता? आमचाच होता. आम्ही आमच्या मनात वाकून पाहिलं, आणि सगळं शांत झालं.
सासूबाई म्हणाल्या, तेच तर ग बायांनो. दोष आपल्यातच असतो, आपण शोधायला जातो दुसऱ्यात. तिथेच तर गणितं चुकतात. मी जीव तोडून सांगत होते, तुम्हाला कुठे कळलं?
बाबांनी दोष दाखवला, त्यांना हाणून पाडण्यासाठी तुम्ही तो दोष स्वतःवर घेतलात.
जाऊदे झालं ते झालं. घर टिकलं ना ते चांगलं झालं.
पण लक्षात ठेवा, हा एका महिन्याचा दिखावा नको मला, माझं डोकं कधीही फिरू शकतं, बाबांना मी फार मानते. पुन्हा काही तुमचं बिनसलेलं माझ्यापर्यंत आलं, तर मी घर विकलच समजा!!
दोघीही जावा एकमेकींकडे बघून एका सुरात आनंदाने म्हणाल्या, आम्ही दोघी बहिणी अशी वेळच नाही येऊ देणार आता……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझ्या हल्ला गुुुल्ल्ला् पेेजला नक्की लाईक करा.