वरद ऐकतोस का? काही बोलायचं होतं तुझ्याशी.
बोला ना बाबा, काय झालं?
अरे मी काय म्हणतो, आम्हा दोघांना तू मोरगावला नेऊन सोड ना. देवाला बघत, देवाच्या दारी राहतो, तेवढंच बरं वाटेल जीवाला.
बाबा, इथे काही त्रास होतोय का तुम्हाला? इथे बरं नाही वाटत आहे का?
नातवंडात मन नाही का रमत तुमचं? काय झालं? का असा विचार मनात आला?
सुरभी काही बोलली का तुम्हाला?
नाही रे कोणी काही बोललं नाही, पण उगाच उपरं वाटत इथे रहायला. वय झालं जास्त आता, आजारपणं वाढत जातील, तुम्ही पोरांकडे बघायचं की आमच्याकडे?
बाबा, नक्कीच आमचं काहीतरी चुकलं. उपरेपणाची जाणीव कशी झाली तुम्हाला आपल्या घरात? का नको ते विचार करता?
वरद कितीही झालं तरी तू जावई आमचा, आमचं मन मानत नाही बघ. पहिल्यापासून ते डोक्यात बसलेलच आहे, जावयाच्या दारी किती दिवस रहायचं? तुम्ही कितीही मोकळं वागला तरी आम्हाला मोकळं होता येतच नाही रे.
बाबा, माझे आईवडील माझ्या बहिणीला सोबत म्हणून तिच्याबरोबर बाहेरच्या देशात राहतात. माझी बहिण आणि तिचा नवरा हट्टाने सोबत घेऊन गेले त्यांना. तिच्या नवऱ्याने कधी आईवडिलांचं प्रेम अनुभवलं नाही म्हणून. आणि तिथे गेल्यावर जावई असूनही त्याचं प्रेम आणि वागणूक बघून खूप सुखावून गेले ते. त्यांना वाटलं सर्वच मुलींच्या आईवडिलांना असा जावई मिळाला तर किती चांगलं होईल!!
मग माझ्याही मनात तुमचा विचार आला. सुरभी तुम्हाला एकुलती एक. तिचं लग्न झालं, आणि तुम्ही एकटे पडलात.
सुरभीलाही तुमची सतत काळजी वाटायची. मग आम्ही दोघांनीही ठरवलं, तुम्हाला आमच्याबरोबरच रहायला घेऊन यायचं.
आणि आता सहा महिने व्हायला आले तरी तुम्हाला उपऱ्यासारखं वाटतं, म्हणजे आम्हीच कमी पडलेलो दिसतंय कुठेतरी!! एवढं बोलून नाराजीनेच वरदने सुरभीला हाक मारली. आणि म्हणाला, सुरभी इकडे ये ग, हे बघ काय म्हणतात. उपरं वाटत म्हणे यांना इथे.
सुरभी आली तसं तिने वरदकडे पाहिलं, त्याच्या डोळ्याच्या कडात अडकलेलं पाणी तिला स्पष्ट दिसलं. तिला कळलं वरद खूप दुखावला गेलाय.
पण तरी त्याच्याकडे लक्ष न देता तिने आईलाही बाहेर बोलावलं.
आई आली तशी, सुरभी म्हणाली, आई-बाबा, तुम्हाला मी झाले त्याचा आनंद झाला नव्हता ना? तुम्हाला मुलगा हवा होता ना, खरं सांगा.
सुरभीने असं विचारताच, झटकन तिची आई म्हणाली. काहीही काय बोलतेस सुरभी. जे होईल ते निरोगी असावं, एवढी एकच इच्छा होती आमची.
बाबाही आईला दुजोरा देत म्हणाले, अगं उलट जे मुलगी झाली म्हणून नाव ठेवायचे ना, त्यांना मी सांगायचो, माझ्यासाठी माझी मुलगीच मुलगा आहे माझा.
येस sss आता कसे बोललात बाबा. मीही लहानपणी खूप वेळा ऐकलेलं तुमच्या तोंडून हे. मग आता तुम्हीच कसे विसरलात हो?
म्हणजे मुलगा असता तर राहिला असतात बिनदिक्कत,आणि मुलगी आहे म्हणून आता नको वाटतं का तुम्हाला. केलाच फरक तुम्हीही!!
ती असं बोलताच दोघेही एकदम, “नाही ग बाई नाही” म्हणत ओरडले.
नाही ना? तर मग मुलगा मानून रहा की बिनधास्त. मला नाही तर वरदला माना. आपण मानण्यावरच सारं असतं ना? तो तर प्रेमानेच वागतो ना तुमच्याशी? मग तुम्ही का अस्तित्वातच नसलेलं दुःख खरवडून काढताय?
देवाच्या दारी जाऊन एकटं राहण्यात मजा, की मूलं-बाळं नातवंडांसोबत राहण्यात मजा. बोलायला बोलताय पण तिथे चैन तरी पडेल का तुम्हाला? आणि तुमच्या बाप्पाला तरी आवडेल का तुमच्या जिवाभावाच्या माणसांना डावलून त्याला जवळ केलेलं?
देव तर सगळीकडेच आहे की!! तुम्ही असंच सांगा, आत्ता गाडी काढून मोरगावला नेऊन आणेल वरद तुम्हाला. पण माणसांना सोडून देवाच्या दारी नका हो राहायचं बोलू, कितीही झालं तरी लागतं मनाला.
पण ……
सगळे किन्तु परंतु सोडा हो आईबाबा. अवघडलेपण काढा मनातलं. आणि हक्काने रहा, तुमच्या पोराबाळांत. तुम्ही म्हणता तर चला, बाप्पालाच घरी घेऊन येऊ. तुमच्या हाताने स्थापन करू, मग तर आपलं घर वाटेल तुम्हाला?, वरद हे बोलला तसा आतमध्ये खेळत बसलेली दोन्ही मुलं नाचत बाहेर आली आणि म्हणाली, खरंच आपल्या घरी आणायचं बाप्पाला?
हो आणुया की, पण तुमचे आजोबा ‘हो’ म्हटले तरच!!
दोन्ही पोरं आजोबांना बिलगून म्हणाली, आजोबा हो म्हणाना. तुमचा तर फेवरेट आहे ना गणपती बाप्पा? तुम्ही गावाला असताना गणपतीला कित्ती मज्जा यायची. तुम्ही किती उत्साही असायचा. चला ना आता आपल्या या घरी पण गणपती आणुया. तुम्ही तर आता कायमचे आमचे झालात ना?
हो बोला ना आजोबा……..
नातवडांचा हट्ट कुठल्या आजी-आजोबाना डावलावायला जमलाय आजपर्यंत ते यांना जमणार होता?
बसल्या जागी भारावून विनायकाला नमस्कार करून, तूच कर्ता आणि करविता आहेस; जशी तुझी इच्छा असं म्हणत सुरभीचे बाबा उठले. मायलेकींना बाकीची तयारी करून ठेवायला सांगून मयुरेश्वराची सुंदरशी मूर्ती आपल्या घरी आणायला वरद आणि मुलांना घेऊन कृतार्थ भावनेने बाहेर पडले………..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.