सकाळपासून लख्ख ऊन पडलेलं बघून त्रिवेणीला मनातून खूप छान वाटत होतं. इतके दिवस पावसामुळे नुसतं मळभ दाटलेलं असायचं, ऊन आलं तरी पाच- दहा मिनिटात पुन्हा पसार व्हायचं.
मग त्रिवेणीच्या मनातही तसाच ऊनसावलीचा खेळ सुरू व्हायचा. थोडं चांगलं वाटलं की पुन्हा उगीचच उदासवाणं वाटायला लागायचं.
पण आज त्रिवेणी मनातूनही तेवढीच खूष होती. त्यातून हे ऊन मनाला आणखी उल्हास देत होतं.
तसं तिला खूपच उत्साह वाटण्याचं दुसरही कारण होतं, ते म्हणजे तिने नवऱ्यासाठी छानसं घड्याळ मागवलं होतं. ते येणार होतं आज. आणि रात्री बरोब्बर बारा वाजता त्रिवेणी त्याला ते देणार होती.
त्याचा वाढदिवस साजरा करणार होती. खूप दिवसांपासून स्वप्न होतं ते तिचं. तिच्या नवऱ्याने ते विशलिस्टमध्ये टाकून ठेवलेलं केव्हाचं, पण घेणं झालं नव्हतं!!
आणि तेव्हाच मनोमन हिने ठरवलेलं, आपणच देऊ याला गिफ्ट ते वाढदिवसाला.
नोकरी घरातून चालूच होती, त्यामुळे त्रिवेणीला पैशाचा प्रश्न नव्हता. त्याने कितीही रकमेच्या घड्याळावर बोट ठेवलं असतं तरी तिने ते आनंदाने घेतलं असतं, त्याच्या वाढदिवसासाठी. जेमतेम तीनच तर वर्ष झालेली त्यांच्या लग्नाला.
दोघात खूप प्रेम होतं, तशी आडेबाजीमुळे भांडणही व्हायची बरेचदा. पण जेवढ्यास तेवढी. उगीच कुणी जास्त ताणून धरायचं नाही. छोट्या मोठ्या अपेक्षाही असायच्या एकमेकांकडून, पूर्ण नाही झाल्या की कुरकुर व्हायची ती देखील तेवढयापुरतीच!!
पण आता वाढदिवस म्हटल्यावर त्रिवेणीला जरा जास्तच प्रेम आलेलं नवऱ्यावर. तो तर सकाळीच कामावर गेलेला, हिने वाढदिवसाचा काहीच विषयही काढला नव्हता त्यावेळी. सगळं नॉर्मल चालू ठेवलं. तिला एकदम रात्री बारा वाजता सरप्राईज द्यायचं होतं.
तसं ते त्यालाही माहिती होतच, काहीतरी प्लॅन असणार हिचा.
दुपारी दोन वाजता बेल वाजली, तिने पटकन दार उघडलं. ती वाट पाहत होती ते पार्सल घेऊन दारात माणूस उभाच होता. तिने हसतच त्याच्याकडून ते घेतलं. त्याला पाणीही विचारलं, तिच्या वागण्यामुळे तोही सुखावून गेला.
ती मात्र स्वतःवरच खूष होऊन तरंगत होती. तिला हवं ते तिला करता आलेलं. नवऱ्याच्या आवडीचं घड्याळ तिच्या हातात होतं.
तिने सगळं डोळ्यासमोर बघितलं. छोटासा केक असेल, मागे सुंदर दोघांच्या आवडीचं गाणं सुरू असेल, तो केकचा तुकडा पहिले स्वतः न खाता आपल्याला भरवेल आणि मग आपण त्याला.
मी हळूच त्याचे डोळे बंद करेन, आणि गिफ्ट उघडायला सांगेन. ते उघडून जेव्हा तो बघेल, तेव्हा आनंदाने उडेलच एकदम. पाणीही येईल बहुदा त्याच्या डोळ्यात. कशाला घ्यायचं एवढं हे तर नक्की म्हणेलच तो. मग मी त्याला जवळ घेऊन म्हणेन, तुझ्यासाठी नाही घेणार तर कोणासाठी??
सगळं कल्पूनच आनंदाच्या उकळ्या फुटल्या तिच्या मनात!!
कामात तर आज लक्ष लागणं शक्यच नव्हतं त्रिवेणीचं. तिला वाटलं उद्या शनिवार आहे ते एक बरं झालं. म्हणजे पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवता येईल. उद्या सगळं हॉटेलातूनच मागवेन मी. पूर्ण आराम मिळेल त्यानिमित्ताने.
एकेक क्षण अगदी जाता जात नव्हता. सहा वाजले तशी लॅपटॉप बंद करून, ती केक आणण्यासाठी बाहेर पडली. अर्धा किलोचा केक घेतला, त्याला आवडते म्हणून मोठी कॅडबरीही घेतली त्याच्यासाठी. मूड झाला, तर काही गोड घरी करावं म्हणून गिट्सच्या गुलाबजामच पाकिटही घेऊन ठेवलं.
आठवेल ते त्याच्यासाठी घ्यावं वाटत होतं तिला. आणि त्यावरून स्वतःचंच स्वतःला हसायलाही येत होतं, वाढदिवस आला की एवढं प्रेम का उचंबळून येतं त्या माणसाबद्दल हेच तिला कळत नव्हतं.
ती घरी आली तर साडे सात वाजले होते. तिला वाटलं, एवढसं घेतलं तरी किती वेळ गेला आपला बाहेर. आता आठ वाजता येईल तो. पटकन फ्रेश होऊन तिने सगळ्या वस्तू त्याला दिसणार नाहीत अशा जागी ठेवल्या. शीण घालवण्यासाठी कॉफी घेतली. आल्यावर त्याला प्रसन्न वाटावं म्हणून त्याच्या आवडीचा ड्रेस घालून बसली.
सहज नजर गेली म्हणून घड्याळात बघितलं तर सव्वा आठ वाजले होते. आतापर्यंत तर यायला हवा होता, खरंतर तिला वाटलेलं तो आज नेहमीपेक्ष थोडा लवकरच येईल. लवकर सोडा पण नेहमीच्या वेळेवरही नाही कसा?
आपण जास्तच वाट पाहतोय म्हणून उशीर होतोय वाटतं, म्हणत तिने उठून कूकर लावला.
कूकर झाला, तरी याचा पत्ता नाही, म्हणून तिला फोन लावावा वाटला, पण उगीच गाडी चालवताना व्यक्त्यय नको, म्हणून तिने वाट पाहायचं ठरवलं.
आठ वाजता येणाऱ्याचा साडेनऊ वाजताही पत्ता नाही म्हटल्यावर, तिने फोन लावलाच. चारदा लावूनही तो उचललाच गेला नाही, मग तिला खात्रीने वाटलं गाडीच चालवत असणार, आता येईल लवकरच.
मधेच सर्व ठिक असेल ना अशीही शंका आली, पण ती आली तशीच तिने उडवून लावली.
साडेदहा वाजता तिने पुन्हा फोन लावला, तरीही तो उचलला गेलाच नाही. आता ती मगाशी उडवून लावलेली शंका परत फिरून मनात आली, तिला घाबरल्यासारखं झालं, डोळ्यात पाणीही भरलं, पण तसं काही असतं तर फोन आला असता आपल्याला आतापर्यत, म्हणून परत तिने परत त्या शंकेला हाकलून लावलं.
त्रिवेणीचं पोटही आता भुकेची जाणीव करून द्यायला लागलं होतं, त्याच्या वाढदिवसाच्या पूर्व तयारीच्या उत्साहात तिने कॉफीशिवाय काहीच घेतलं नव्हतं.
पण आजच्या दिवशी त्याला सोडूनही जेवावंही वाटत नव्हतं. मधेच राग येत होता, मधेच रडू येत होतं, खूप काय काय चाललेलं त्रिवेणीच्या मनात!! उशीर होणार होता, मिटिंग लागणार होती तर सांगायचं ना? एवढही कळू नये त्याला…….
साडे अकरा वाजले तसं तिला राहवलं नाही म्हणून पुन्हा तिने फोन केला, दहा मिनिटं करतच राहिली तेव्हा तिकडनं फोन उचलला गेला, ती काही बोलायच्या अगोदर तोच म्हणाला, उशीर होईल थोडा, जरा मित्रांबरोबर आहे…….
ती काय समजायच ते समजली. फोन ठेवला, खूप वेळ ढसाढसा रडून घेतलं. नंतर थोड्या वेळातच तिचा फोन वाजला. सासूबाईंचा होता, तिने उचललाच नाही. मग त्याच्या बहिणीचा आला, नंतर त्याच्या काकांचाही. तो उचलत नव्हता म्हणून सर्वजण हिला करत होते.
तिला कोणाशी काही बोलायची इच्छा नव्हती. पण फोनही थांबत नव्हते. तसही, उचलून त्याला दे म्हटल्यावर काय सांगणार होती ती? ज्याचा वाढदिवस आहे, तो घर सोडून मित्रांबरोबर पार्टी करत बसलाय. तिला वाटलं, काही बोलले तर ऐकायला तो कुठाय, मी का ऐकून घेऊ त्याच्या वाटणीचं?
तिने सरळ फोन बंद करून टाकला, आणि झोपायला निघून गेली. त्याच्या आवडीचा ड्रेस आता टोचायला लागला होता तिला, तिने तो झटकन काढला आणि नजरेआड करून टाकला.
झोप नव्हतीच येत, दिवसभर रंगवलेलं चित्र डोळ्यासमोर येत होतं. ज्याने आनंद दिला होता, तेच आता दु:खाने रडवत होतं. हे असं कधी कधी चार महिन्यातून एकदा व्हायचं, पण तिला त्याने हे आज करावं याच प्रचंड वाईट वाटत होतं.
रडत रडत कधी डोळा लागला ते तिला कळलच नाही. जाग आली ते त्याच्या लॅच उघडण्याच्या आवाजाने. तिनं घड्याळात पाहिलं तर तीन वाजले होते.
ती कुशी बदलून झोपून राहिली तशीच, त्यानेही कसबसं फ्रेश होऊन बेडवर आपलं झुलतं अंग टाकून दिलं!!
सकाळी जाग आली तसा तो तिच्या सॉरी सॉरी म्हणत मागे पुढे करू लागला. मित्र ऐकायलाच तयार नव्हते, म्हटल्यावर मी काय करणार होतो? त्यात दुसऱ्या दिवशी सुट्टीचा वार होता ना!!
त्यांना पार्टी हवीच होती. इतके मागे लागले की नाही म्हणणंच मुश्किल होऊन बसलं…….
तिने काहीही रिस्पॉन्स दिला नाही. पण मनात मात्र आलंच, वर्षातून एकदाच येणारे हे सुंदर क्षण माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवण्यासाठी मी मात्र कुणालाही हसत हसत नाही म्हटलं असतं, अगदी कुणालाही!!
इतका राग होता मनात की, तिला त्याच्याकडे बघावसही वाटत नव्हतं. तिरिमिरीनेच तिने मोबाईल घेतला, आणि मागवलेल्या पार्सलची रिटर्न रिक्वेस्ट टाकून दिली.
ज्याला माझ्या भावनांची कदर नाही, त्याच्या भावना मी का जपू. त्याक्षणी जे तिला वाटलं, ते करून मोकळी झाली त्रिवेणी.
नंतर शांतपणे बसावं म्हणून ती खिडकीत गेली, पण तिला कालचं लख्ख ऊन आज कुठेच दिसलं नाही. सहज म्हणून तिने वर आभाळाकडे पाहिलं, तर ते ही तिला अगदी तिच्यासारखंच खूप खूप भरून आल्यासारखं वाटलं………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.