हि कथा आहे ती साधारण 90 च्या दशकाच्या सुरुवातीची. त्यावेळी शहरामध्ये तर संडासाची चांगली सोय होती, पण बऱ्याचशा गावात मात्र नदीच्या पलीकडे, रानात जायला लागायचं, गावच्या लोकांना आवर्जून संडास आपल्या दारात असलाच पाहिजे असं वाटायचंच नाही. ते खूष होते, त्याच्यातच.
आपल्या गायत्रीलाही लग्नांनतर कोकणातल्या अशाच एका गावात जावं लागलं. त्यातल्या त्यात थोडं दिलासादायक हे होतं की तिला त्या घरात कायमचं रहायचं नव्हतं, तिला नवऱ्याबरोबर त्याच्या नोकरीच्या ठिकाणी तालुक्याच्या गावात रहायचं होतं. पण खरं घर मात्र सासू-सासरे रहायचे तेच होतं; कोकणात असतं तसं अगदी टिपिकल. कोणीही बघून प्रेमात पडेल असं!! पुढे मागे मोठं अंगण, मोठ्या मोठ्या खोल्या, बाहेर पडवी, पडवीत झोपाळा, गायत्रीला ते घर सर्वात जास्त आवडायचं. तिलाही तालुक्याच्या गावी शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. शनिवार, रविवार ते दोघे गावातल्या घरी जायचे, पण नवऱ्यापेक्षा जास्त हिच्याच मनाला त्या घराची ओढ वाटायची.
सगळं सगळं छान होत तिथं, अडचण होती ती संडासाचीच. त्यासाठी सर्वांना नदीपलीकडे जावं लागायचं. पावसाळ्यासाठी मात्र घरापासून थोडा लांब काट्याकुट्याचा आडोसा बनवला जायचा.
गायत्रीने असं कधीही पाहिलं नव्हतं. सुरुवातीला तर अगदी विचित्रच वाटत होतं सगळं. तिचं माहेर शहरातलं असल्यामुळे तिच्यासमोर असा कधी प्रश्नच उद्भवला नव्हता.
त्यावेळी पूर्ण गावातच कोणाकडेही संडास नव्हता, एवढंच काय तो असावा असं त्यांनाही आणि शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलाबाळांनाही वाटत नव्हतं.
गायत्रीनेही घराकडे बघून स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. तसही आठवड्यातले दोन दिवसच काढायला मिळायचे त्यांना तिथे. सणासुदीला मात्र जास्त मुक्काम पडायचा.
तिच्या सासू-सासऱ्यांचं पण तसं वय झालं होतं. तिला नेहमी वाटायचं, आमचं ठिक; पण यांचं कसं होत असेल, रात्री अपरात्री लांबवर जाताना? बॅटरी, कंदील घेतले तरी इतकं काय दिसणार त्याच्यात?
कोकणात पाऊस पण जास्तच, कुठे जाता येता यांचा पाय सटकला तर केवढ्याला पडेल?
सारखा हाच विचार डोक्यात येऊन मग तिला वाटायला लागलं, घराच्या आवारात संडास बांधला तर काय होईल? मागे एवढी जागा आहे. थोडा जवळच संडास असेल तर सासू-सासऱ्यांना किती बरं पडेल!!
तिने मनातलं नवऱ्याला बोलून दाखवलं. पण त्याने विशेष इंटरेस्ट दाखवला नाही. वर्षानुवर्ष तेच अंगवळणी पडलेलं त्या सगळ्यांना.
ज्यांच्याकडे बघून हा विचार आला, त्या तिच्या सासूला विचारलं तर ती म्हणाली, छे! काय करायचाय तो संडास, आम्हाला कुठे सवय त्याची?
जे आहे ते बरं आपलं. नको तो खर्च कशाला वाढवायचा?
तिने तिच्या परीने त्यांना समजावलं, पण संडास घरात नाही, याचं तिच्याशिवाय कोणालाच काडीचंही ही दुःख नव्हतं.
पुढे मोठ्या सुट्टीत तिच्या दोन नणंदा आणि दिर आल्यावर देखील गायत्रीने पहिल्यांदा आडून मग कोणी रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावर समोरूनच संडास बांधण्याचा विषय काढला. पण शहरात राहणारे असूनही आणि सुट्टीत दहा दहा दिवस गावच्या घरी राहूनही त्यांना कोणाला ती गरज आहे हे वाटतच नव्हतं. किंवा आपण दहा दिवस येणार, आपल्याला काय म्हणून हात वर करणं सर्व दृष्टीने सोयीचं वाटत असावं कदाचित. थोडक्यात काय तर गायत्रीला एकाचाही पाठींबा मिळला नाही. सासू- सासऱ्यांचा विचार करतेय याचं तर कौतुक बाजूलाच राहील़ं.
कोणाला काहीही वाटत नव्हतं, आणि वाटलं तरी ते दाखवण्याची गरज वाटत नव्हती.
काही वाटत होतं ते गायत्रीलाच, तिला वाटायचं आपले आईवडील असते तर काळजी वाटली असती ना आपल्याला? कदाचित मीच पुढाकार घेऊन बांधूनही दिला असता त्यांच्यासाठी.
मग आता तसाच विचार सासू-सासऱ्यांसाठीही करायलाच हवा मला!!
सगळ्यांनी नाकारलं तरी गायत्रीने ठरवलच. मी
त्यांच्यासाठी संडास बांधून घेणारच!! मला कोणाचीच कुठलीच मदत नको. तिने नवऱ्याला आपला निर्धार सांगितला. सासू- सासऱ्यांनाही सांगितलं, तुम्हाला सोयीचा नाही वाटला तर तुम्ही नका वापरू, पण मला ती तुमच्या वयाची गरज वाटतेय, मला या घरी संडास बांधायचा आहेच. नाखुषीनेच का होईना त्यांनी होकार दिला. पण त्यांना तो पैशाचा अपव्यय वाटत होता एवढं खरं…..
आख्ख्या गावात एकाकडेही नव्हता ना तो, मग त्याचं कुणालाच सोयरंसुतक नव्हतं.
पण गायत्रीने मनावरचं घेतलं, ती शिक्षिका होती. त्यामुळे तिने चौकशी करायला सुरुवात केल्यावर तालुक्यातल्या जाणकारांनी चांगले गवंडी शोधून दिले. एका शनिवारी आपल्याबरोबर गावच्या घरी नेऊन तिने सर्वांचं मत घेऊन संडास आणि बाथरूमसाठीही जागा ठरवली. जी घराच्या अगदी जवळ असून कधीही जायला सोयीस्कर ठरणारी होती. हो, संडास तर नव्हताच पण बाथरूमही नीट असलं तरी काट्याकुट्याचा ओडासा करूनच होतं. तिने ते दोन्हीही व्यवस्थित आणि पक्कं बांधायचं ठरवलं.
काम सुरू झालं तसं, गावातली लोकं खास बघायला यायला लागली. गावात बांधला जाणारा पहिला संडास होता ना तो!! सगळ्यांना फार कुतूहल होतं त्याचं.
गायत्रीचे सासरेबुवा सर्वाना सांगायचे सून बांधून घेतीये हो आमची. त्यांना गरज वाटत नव्हती तरी बांधकाम सुरू झाल्यावर कुठेतरी मनात कौतुकही वाटायला लागलं होतं गायत्रीचं.
पूर्ण बांधकाम होऊन मनाजोगते संडास बाथरूम बांधून झाल्यावर तर गायत्रीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिची काळजी आता पूर्ण मिटली होती.
त्या दिवशी संपूर्ण गाव लोटला होता त्यांचा संडास बघायला, कोणाला कौतुक तर कोणाला वायफळ खर्च वाटत होता तो. पण गावात गायत्रीच्या घरचा संडास गाजला एवढं मात्र खरं होतं!!
ज्यांच्यासाठी बनवला ते सुरुवातीला आढेवेढे घेऊन नंतर मात्र आनंदाने तो वापरायला लागले.
आणि गायत्रीच्या मनाला समाधान मिळालं.
सासरे तर बोलले सुद्धा, जो विचार माझ्या एकाही पोराबाळाच्या मनात नाही आला, तो विचार मनात आणून आमच्या सुनेने प्रत्यक्षात उतरवला, आम्ही भाग्यवंत ठरलो.
पुढे सुट्टीत येणाऱ्या मंडळीनी सुद्धा आयत्या सोयीचा पुरेपूर लाभ घेतला. पण इतक्या वर्षात स्वतः पुढे येऊन, अशी सोय आपण आपल्या आईवडिलांसाठी करावी, असा विचार शिवलाही नव्हता कोणाच्या मनाला!!
गायत्रीच्या घरातल्या संडासाकडे बघून काहींना स्वतःकडेही ही सोय असावी वाटू लागलं. हळूहळू इतरही घरात संडास येऊ लागले. प्रमाण कमीच होतं, पण गावची लोकं त्याबाबत विचार करू लागली हे थोडकं नव्हतं.
अजूनही त्या गावातल्या अगदी प्रत्येक घरी संडास नाहीये, पण ज्या घरी आहे, ते मात्र एवढी चांगली सोय दारात आली, ती गायत्रीने त्या वेळी घेतलेल्या पुढाकारामुळेच असेच मानतात. कारण त्यापूर्वी असा विचार कोणी केलाच नव्हता ना, आणि विचार केला असला तरी कोणी करून दाखवलं नव्हतं. तो प्रत्यक्षात उतरवणारी गायत्री पहिलीच ठरली.
पुढे याच गायत्रीला आपल्या घराच्या दारात नळ आणायचाही पहिला मान मिळाला. त्यावेळी प्यायला, खर्चाला लागणारं पाणी नदीवरून आणावं लागायचं. अगदी येणाऱ्या पाहुण्यांना पण स्वतःच्या नावाच्या कळश्या, बादल्या नदीवरून आणाव्या लागायच्या. खूप कष्टदायक होतं ते. त्यातही पुढाकार घेऊन, खटपटी करून गायत्रीने आपल्या दारात नळ आणला. भले दिवसातून एकदा पाणी यायचं, पण ते अंगणातूनच भरायला लागायचं, हे कमी नव्हतं.
सुधारणा करायला कुणीतरी एक आतून जागं व्हावच लागतं, येणारे हजार अडथळे खंबीरपणे पार करावेच लागतात. त्या पावलावर पाऊल ठेवणारे मागाहून बरेच येतात मग. ते वाट बघतच असतात, कुणीतरी पुढे व्हावं.
आपणच ठरवायचं आपलं पाऊल कुठलं असावं, धिटाईने टाकलेलं पहिलं, की अनुकरणातून टाकलेलं दुसरं…….
आपल्या सासू- सासऱ्यांसाठी टॉयलेट बांधणारी ही गायत्री माझ्या नात्यातली आहे, आणि तिचं हे सर्व मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी लहान होते तरी, या गोष्टींनी त्यावेळीही माझ्या मनावर छाप पाडलेली हे नक्की!! म्हणूनच हे सर्व अजूनही माझ्या डोळ्यासमोर तसंच आहे………..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.