दळवी काका काकूंनी दोघांचेही पेन्शनचे पैसे आल्यावर छानसा ब्लॉक घेतला. तसं गावात त्यांचं टुमदार घर होतं, चार खोल्याचं, सभोवताली बाग बगिचाही होता. पण गावात नवीन मोठा कॉम्प्लेक्स नुकताच तयार झाला होता. काकूंना इच्छा झाली, आपलाही एखादा ब्लॉक असावा तिथे. वाटलं तर कधी जाऊ रहायला तेवढीच बिल्डिंग मध्ये राहायची मजा अनुभवता येईल, नाहीतर देऊ भाड्याने.
अनायसे पैसेही होते, इकडे तिकडे गुंतवण्यापेक्षा प्रॉपर्टीत गुंतवलेले केव्हाही चांगले, असं वाटून त्यांनी पाचव्या मजल्यावर एक ब्लॉक घेऊन टाकला.
दोन मुलं होती त्यांना, पण दोघही परदेशात स्थायिक होती. चार पाच वर्षांनी एकदा फेरी मारायची. गावात होते म्हणून तसं काका काकूंना एकटं वाटायचं नाही. सगळे पहिल्यापासून ओळखीचे होते. बाहेर व्हरांड्यात बसलं की जाता येता दिसणारी माणसं दोन शब्द बोलून जायचीच.
मुलं तर लांब…… आपली हौस आपणच पुरवायची, म्हणून काकूंनी ब्लॉक घेतला. नवीन नवीन आठवड्यातून एकदा दोनदा झोपायला म्हणून गेले दोघं तिथे, पण महिन्याभरातच त्याची हौस भागली.
आणि मग मनात तो ब्लॉक भाड्याने द्यायचा विचार येऊ लागला.
पण द्यायचा कोणाला? आणि कोणी फसवलं तर?
आपण कुणाच्या मागे जाणार? आपल्याला तर आवाज चढवून बोलताही येत नाही कुणावर……..
काका काकू दोघांनाही हेच वाटत होतं. तरीही त्यांनी ओळखीच्या सगळ्यांना सांगून ठेवलं, आम्हाला काही घाई नाही, कोणी चांगला बघा हो भाडेकरू.
पण भाडेकरू चांगला की वाईट ठरवायचं कसं? तोंडावरून तसे तर सर्वच चांगले वाटतात. आपलं काम व्हावं म्हणून काम गोड गोड तर सगळेच बोलतात.
बातमी पसरल्यावर आठवड्याभरात दोन जणं येऊन जागा बघून गेले, जागेत काही नावं ठेवण्यासारखं नव्हतंच. अगदी नवी कोरी होती ती. एकाला भाडं जास्त वाटलं तर एकाला पाचवा मजला नको वाटला. लिफ्ट होती. बंद पडली तर काय करायचं, म्हणून त्याने जागेचा विचार सोडला.
मग एक ओळखीतूनच पुढे आला. दळवी काका तसे चेहऱ्याने ओळखत होते त्याला. जागा पाहून त्याने त्वरित होकार दिला. स्वतःची माहिती देताना आम्ही चौघे आहोत हे सांगितलं. मी माझी बायको, आणि दोन मुलं. काका काकूंना पारिवारिक वाटला खरा. पण काका काकूंनीच विचार करून दोन दिवसात कळवतो म्हणून सांगितलं. इकडे तिकडे चौकशी केल्यावर त्याला जवळून ओळखणारं कोणी भेटलच नाही. जिथे काम करतो म्हणून सागितलं होतं, त्या पतपेढीत जाऊन काका त्याचं कामात गढलेलं तोंड पाहून आले. तसं सर्व बरं वाटलं, म्हणून काका काकूंनी होकार देऊन टाकला.
मगितलेलं डिपॉजीट देऊन चार दिवसात तो राहायला आलाही.
आठ दिवसांनी काका काकू जाऊन त्याच्या बायकोचं दर्शन घेऊन आले. पोरं बाहेर कुठं उंडारत होती, त्यांना बघणं तेवढं राहिलं. एकंदरीत सगळं व्यवस्थित वाटलं.
सहा महिने सगळं व्यवस्थितच राहिलं. भाडं तसं दहा तारखेच्या आत यायच्या ऐवजी वीस तारखेच्या आगे मागे येत होतं, पण काका काकूंचं त्याविना काही अडत नसल्याने त्यांना एवढं काही जाणवत नव्हतं इतकंच.
पुढे काकू एक दिवस संध्याकाळी व्हरांडयात बसल्या असता, त्यांच्या ओळखीच्या बाईने विचारलं, घेतलात काय हौसेने, आणि विकायला पण काढलात होय ब्लॉक?
काकू आश्चर्यचकित झाल्या, आणि म्हणाल्या, कुणी सांगितलं तुम्हाला?
तर त्या म्हणाल्या, तुमचा भाडेकरुच सांगतोय सगळ्यांना. आम्ही विकत घेतोय ब्लॉक म्हणून. मला तर कोणा तिसऱ्याकडूनच कळलं.
काकू म्हणाल्या आमचाच ब्लॉक आणि आम्हालाच खबर नाही?
दुसऱ्या दिवशी काकांनाही बाजारात दोन जणांनी विचारलं, एवढ्या लगेच ब्लॉक विकताय काही काळंबेरं आहे का जागेत म्हणून?
आता काय ते बघितलंच पाहिजे म्हणून, काकांनी त्या भाडेकरूला फोन लावला तर तोही म्हणाला, हो हो, आम्हाला तुमचा ब्लॉक पसंत आहे, आम्ही घेऊन टाकणार आहोत.
काका म्हणाले, आम्हाला विकायचाय हे कोणी सांगितलं तुम्हाला?
सांगितलं नाही हो कोणी, पण म्हटलं पटवू तुम्हाला, त्यात काय एवढं?
काकांना तर त्याला शिव्या हासडाव्याच वाटत होत्या, पण स्वभाव आड आला, आणि ते म्हणाले, हे बघा आम्हाला ब्लॉक अजिबात विकायचा नाही. तुम्हाला घ्यायचाय तर खुशाल घ्या दुसरा कुठेही. आमचा मिळणार नाही.
पुढे वीस तारखेच्या आगेमागे येणारं भाडं तीस तारखेपर्यंत येईना झालं. देईल देईल करत काका काकूंनी दोन महिने ढकलले, मध्ये दोनदा फोन केले तर तो एकदा म्हणाला, उद्या आणूनच देतो कोणत्याही परिस्थितीत. नंतर म्हणाला, तुम्ही ठेवा फोन, मी दहा मिनीटात हजर होतो पैसे घेऊन. तेव्हापासून जो लुप्त झाला, तो दहा दिवस झाल्यावर सुद्धा उजाडेना म्हटल्यावर काका काकूंनी पुन्हा आपल्या ब्लॉकमधल्या त्याच्या कुटुंबाला सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं.
काका काकू मुद्दामच न कळवता गेले, दार वाजवलं तर ते उघडणाऱ्या बाईला बघून काही सेकंदासाठी आपण चुकलो असंच त्यांना वाटलं. मग भानावर येत त्यांनी विचारलं असतां, त्या बाईने आपण त्याची बायको असल्याचं सांगितलं. काकू जरा बाचकत बोलल्या, आम्ही मागच्यावेळी आलो तेव्हा तुम्ही नव्हता. तर ती म्हणाली हो, मी जरा पोरांना घेऊन माहेरी गेले होते. काकूंना घाम फुटल्यासारखं झालं, म्हणून त्यांनी पाणी मागितलं.
त्या सद्गृहस्थाबद्दल विचारपूस केली असतां, तो कामानिमित्त बाहेरगावी गेलेला आढळला.
जास्त काही न बोलता, काकांनी माझा भाऊ राहायला येणार आहे, असं सांगून त्यांना लवकरात लवकर तिथून आपला बोजाबिस्तरा उचलायला सांगितला.
काकूंचा घरी आल्यावर देखील कुठल्या बाईला खरी मानावी, हा संभ्रम जातच नव्हता.
आता काका काकूंना भाडंही नको होतं, पण असली ब्याद तिथून हलणं गरजेचं वाटत होतं. हा बंडल माणूस आपला ब्लॉकच गिळंकृत करायला देखील पुढेमागे बघणार नाही, ह्या भीतीनेच त्यांना पछाडलं.
तो भाडेकरू जिथे कुठे गेला होता, तिथून आल्यानंतर काकांचा निरोप मिळूनही त्यांना भेटायला आला नाही. काकांनी मोजून पन्नास फोन केले, एक्कावन्नावा फोन मात्र एकाएकी ईश्वराने सद्बुद्धी दिल्यासारखा त्याने उचलला. गयावया करून एक महिना मागून घेतला. पण तो ब्लॉक सोडण्याचे थोर उपकार करायला सहा महिने लागले त्याला. मधल्या काळात ब्लॉकवर फेऱ्या मारून काकांच्या चपलांचे दोन जोड झिजले. काकूंचा घरबसल्या कित्येकदा बीपी फ्लक्च्यूएट झाला.
एकदाचा तो गेला, तेव्हा मात्र काकूंनी स्वयंप्रेरणेने पुरणाचा घाट घातला. भाडं काही मिळालंच नाही. पहिल्या सहा महिन्यांचं मिळालं तेवढंच, नंतरचं काही डिपॉजिट मधून वळतं झालं. तरी बाकी उरलीच. काका काकूंनी ती त्याच्या नावाने स्वाहा: करून टाकली.
आता दोन वर्षे झाली, दळवी काका काकूंचा ब्लॉक रिकामाच आहे. पण महिन्यातून दोनदा अगदी ठरवूनच ते ब्लॉक सिस्टीम एन्जॉय करायला जातात.
अजूनही लोकं भाडेकरू अगदी दर आठवड्याला सुचवत राहतात, त्यांना फार कळकळीने वाटतं, रिकामा ठेवण्यापेक्षा भाडेकरू भरावा.
पण काका काकूंनी मात्र त्या शब्दाचाही धसका घेतलाय……..त्यांना वाटतं, पडेनाका तिकडं रिकामा, पण भाडेकरू कोणत्याही परिस्थितीत नककोच!!
(हे सरसकट सगळ्या भाडेकरूंंसाठी नाही. उगाच जीवाला लावून त्रास करून घेऊ नये. खूप जणं चांगलेही असतात. हा एक अनुभव आहे, कुणाला आलेला इतकंच…….)
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.