बायकांना मारहाण करणारे पुरुष आजही आपल्यात बऱ्याच संख्यने आहेत. अजूनही बऱ्याच पुरुषांना वाटतं, एक दिली ठेऊन की बायको बसेल कोपऱ्यात जाऊन.
कितीतरी अशा केसेस दाखल होतात दरदिवशी, नवऱ्याने केलेल्या मारहाणीच्या, आणि त्याहून कितीतरी पट अजूनही होत नाहीत. घरातल्या घरात दाबल्या जातात.
पण सांगा मला, तुम्ही किती वेळा ऐकलंय, बायकोने नवऱ्याला चोपल्याचं? नवऱ्याने तक्रार केल्याची बायकोच्या मारहाणीविरुद्ध ? कितीही ताण दिला तरी मोजून दोनतीन केस सापडतील. तिच्यात अगम्य शक्ती आहे तरी ती सोसत राहते फक्त………
पण मी मात्र अशा बाईला पाहीलय जिने नवऱ्याला बेदम हाणलय आणि नवऱ्याने तक्रार नोंदवलेली तिच्याविरुद्ध………
तरी वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. कित्येक बायका अजूनही धारिष्ट्य दाखवत नाहीत आणि तिने ते तेव्हाच दाखवलेलं.
दुर्गा……..
तिचं नाव दुर्गा नव्हतं, पण तिचा विचार केल्यावर हेच नाव येतं माझ्या डोळ्यासमोर तिच्यासाठी.
ही दुर्गा लग्न होण्याअगोदर शिक्षिकेची नोकरी करायची. जिथे लग्न करून गेली; त्यांचा पापड, लोणची, मसाले तयार करून विकण्याचा घरगुती व्यवसाय होता.
तिच्या घरच्यांची इच्छा नव्हती, अशा ठिकाणी तिला दयायची, पण दुर्गेला तोपर्यंत पाहिलेल्या सर्व मुलात हाच पसंत पडला. मग मुलीला सर्व आवडलय, तिची जमवून घ्यायची तयारी आहे म्हटल्यावर घरच्यांनी फार आढेवेढे घेतले नाहीत.
लग्नाअगोदर दुर्गेने नवऱ्याला स्पष्ट सांगितलं होतं, मला हीच नोकरी पुढे करायची आहे. नवऱ्याने आमची काही हरकत नाही असं निक्षून सागितलेलं देखील. मग हिला आणखी छान वाटलेलं सगळंच.
दुर्गाचं संसारातलं पहिलं वर्ष तसं बर गेलं. घरगुती गोष्टींचा व्यवसाय अगदी घरूनच असल्याने, कधी चार बायांमधली बाई आली नाही, तर सासूला वाटायचं, रजा घेऊन हिने त्या बाईची जागा भरावी. नवीन नवीन नकार देता आला नाही म्हणून दोन चार वेळेस तिने केलंही तसं. पण पहिल्यांदा विचारणारी सासू, वर्षानंतर मात्र महिन्यातून चार पाचदा तरी दुर्गेला घरी राहून घरच्या उद्योगात मदत करायचा हुकूमच सोडायला लागली.
चारही बायका कामावर आल्या तरी सासूला ती हवी असायचीच. बाकी काही दुसरा जाच नव्हता, पण हिच्याकडून व्यवसायात मदत व्हावी अशी अपेक्षा सारखीच केली जात होती.
तशी ही देखील घरची सारी कामं करून शाळेत जायची, आल्यावर देखील सासू थकली असणार म्हणून हीच सगळं करायची. आणि तिला त्याचं काही वाटत नव्हतं. तिच्यासाठी तिला तिची आवडती नोकरी करायला मिळतेय, हेच खूप होतं.
पण घरच्यांना आणि हळूहळू तिच्या नवऱ्याच्या डोळ्यातही हिची नोकरी सलायला लागली. ती खाजगी शाळेतच होती. अगदी खूप पगार नसला तरी वाईटही नव्हता. पण सासूला वाटायचं, नोकरी करतेय म्हणून मस्ती आहे अंगात. नोकरी सुटली तर आपोआप गाय होईल. म्हणून दुर्गा घरी नसल्यावर तिच्या सासूने सारखी चिडचिड करून दुर्गेचा हातभार लागल्यावर मला थोडं मोकळं होता येईल, मी किती दिवस कष्ट करणार, असं काय काय मुलासमोर बोलायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात उगीचच तिडीक जायला लागली.
तो त्या वस्तू इतर दुकानांमध्ये पोचवून त्यांच्या ऑर्डरी सांभाळण्याचं काम करायचा. मार्केटिंगचं सगळं खातं त्याच्याकडे होतं. जे पहिले त्याचे वडील करायचे. नंतर ते घरीच देखरेखीचं काम बघायला लागले.
दुर्गेचं पहिलं वर्ष बरं गेलं, दुसरं मानसिक ताणाखाली गेलं. तिसऱ्या वर्षात मुलं होत नाही म्हणून ताण आणखी वाढला. नोकरी सुरू होती. पण अचानक एक दिवस गॅदरिंगमुळे तिला यायला उशीर झाला, तेवढं निमित्त पकडलं, आणि नवऱ्याने सांगितलं, नोकरी बंद म्हणजे बंद. एकतर मी तरी, नाहीतर नोकरी तरी.
दोन दिवस ती गेली नाही. तिला वाटलं, होईल नवरा नंतर नॉर्मल. पण नवऱ्याने अडगेपणा धरून ठेवला. नाही म्हणजे नाही. नोकरी किंवा मी यातलं काहीतरी निवडावचं लागेल.
तिने आईला सागितलं, आई म्हणाली, तो एवढं म्हणतोय तर कशाला नोकरीचा हट्ट? आपला संसार बघायचा. नवरा खूष असला, तर सगळं मिळालं. आता सोड, नंतर बघ त्याच्या कलेने घेऊन, त्याचं मन बदलू शकतं.
तिला खूप जीवावर येत होतं, का सोडलं पाहिजे कुणासाठी काहीतरी? मी कुठे काय सोडायला सांगते त्याला? तो जसा आहे तशी ऍडजस्ट करतेय ना मी? मग माझ्या नोकरीचा कसला त्रास यांना?
पण तरी जीवावर दगड ठेऊन तिने नोकरी सोडली. त्या रात्री सेकंदभरही ती झोपू शकलीच नाही. आपण चुकीचं करतोय हेच तिला वाटत होतं. कुणासाठी आपलं स्वत्व का सोडायचं?
जशी तिने नोकरी सोडली, तशी सासूने तिला कामात ओढली. दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाष्टा पाणी, आणि बाकीच्या वेळेत पापड बनवत बसायचं काम तिच्यावर टाकलं. उबग येत होता तिला सगळ्याचा, तिला काही आवडत नव्हतं ते. हात प्रचंड दुखून जायचे तिचे, सवयच नव्हती ना एवढी कधी!!
दिवसभर काम करून करून थकून जायची अगदी ती. नोकरी होती तेव्हा ही थकत होती, पण तो विरंगुळा होता तिचा. नोकरी हे आवडतं ठिकाण होत तिचं. त्यामुळे थकवा जाणवायचा नाही.
न आवडत्या कामात माणसाला लगेच शीण येतो.
सगळी कामं करून झोपायला गेली की क्षणात डोळा लागायचा तिचा.
पण तिथेही नवरा अपेक्षा ठेऊन बसलेला असायचा. काही दिवस तिने केलं सहन तसच. पण नंतर जशी ती नकार द्यायला लागली, तसं तुझं काहीतरी आहे बाहेर, म्हणूनच तुला नोकरी करायची होती, असं बोलून नवरा तिला दिवसेंदिवस जास्तच शिव्या घालायला लागला.
तिला सगळं सहन होईनास झालं. वाटायचं द्यावं सगळं सोडून आणि जावं पळून.
दिवसभर सासू डोक्यावर, म्हणजे ती समोर बसून इतर बायकासारखं हिलाही ऑर्डर सोडून, काही चुकलं तर त्याच बायकांसमोर जीवाला लागेल असं बोलून, तिच्याकडून कामं करून घ्यायची आणि रात्री नवरा. नकार दोघांनाही द्यावा वाटे तिला, पण हिंमत होत नव्हती. त्यातून नवऱ्याला बोलायची तरी, नंतर नंतर तर तो तिला त्यावरून मारायलाही लागला. सकाळी उठलं की दिसायचं अंगावर तिच्या, पण कोणी एका शब्दाने विचारायचं नाही.
सतत यायचं मनात, काय करून घेतलं आपण स्वतःचं? कुठे त्या नोकरीमुळे शिक्षिकेचा मान मिळायचा, आणि कुठे सर्व करूनही फक्त मानहानी पदरात येतीये. या सगळ्या टेन्शनमध्ये बाळाचीही चाहूल लागते नाहीये. पण बरंच आहे ते, त्याचे कुठे हाल करायचे या सगळ्यात.
कंटाळा आला होता सगळ्याचा तिला त्यात आईही म्हणत नव्हती, ये सगळं सोडून. त्यामुळे पाय बाहेर टाकायला अडकत होता.
एके दिवशी अशीच दुर्गा दिवसभर काम करून त्रासली गेली, बेडवर पडली तोच झोप लागली. नवरा बाजूलाच अगोदर झोपला होता. झोपेतच अचानक खाली पडली, काय झालं म्हणून बघितलं तर नवऱ्याने लाथ मारून खाली पाडलं होतं. त्याला न उठवता गुपचूप झोपली म्हणून त्याचं डोकं फिरलं होतं. तोंडाला येईल त्या शिव्या देत तो तिला कसाही मारायला लागला, ते वार चुकवता चुकवता, ती दरवाजा उघडून बाहेर गेली, कपडे वाळत घालण्याची काठी समोर दिसली, तिने ती क्षणात उचलली आणि मनात जी भडास होती ती काढत त्याला चोपायला सुरुवात केली. अगोदर गप्प बसलेले, सासू सासरे पोराला वाचवायला धावून आले, पण तिच्यात शक्तीच शिरलेली, त्यातून कोणी वाचू शकत नव्हतं. शेवटी नवरा रडून पाया पडायला लागला तेव्हा बऱ्याच वेळानंतर ती थांबली. तोपर्यंत नवरा बेशुद्ध पडला होता.
तमाशा बघायला सगळी सोसायटी जमली होती, तेव्हा तिने विचारलं, आज जमलाय सगळे, मी नवऱ्याला मारल्यावर. इतके दिवस मला तो मारत होता तेव्हा नाही आला आवाज तुम्हाला? घरात असणाऱ्या माझ्या सासू-सासऱ्यांनाही नाही आला, तर तुम्हाला कुठून येणार?
तिच्या नवऱ्याला उचलून लोकांनी हॉस्पिटल मध्ये नेलं. पोलीस केस झाली. अगदी पेपरमध्ये बातमी आली. बऱ्याच गुंतागुंतीनंतर ती सगळ्यातून सुटली. तिने वाराला प्रतिवार केला. तिची शक्ती जागृत केली. तिचा नवराही काही दिवसांनी बरा झाला. पण तिने त्याचं नंतर कधीही तोंड पाहिलं नाही.
दुर्गेने त्याला कायमच सोडलंच. काही दिवस आईवडिलांकडे राहिली, नंतर स्वतःच्या हिमतीवर वेगळी झाली. मुख्य म्हणजे तिची नोकरी पुन्हा सुरू झाली, ती सुद्धा मान्यताप्राप्त शाळेत!!
ती पुढेही एकटीच राहिली, कारण पुरुष तिच्या मनातून उतरला होता. तिचा स्वतःवर विश्वास होता, आणि तिला पुरुषाच्या आधारशिवायही आपण जगू शकतो याची खात्री होती………
ही कथा वीस वर्षांपूर्वीची पण आत्ताही काही बदललं नाहीये. अगदी कालच विपरीत ऐकायला मिळालं. म्हणून ही दुर्गा आठवली. अजूनही हे चालू आहे त्याचं खूप वाईट वाटतं. का सहन करतात बायका? अशिक्षितही आणि शिक्षितही, उच्चशिक्षितही, चांगल्या कमावणाऱ्याही!! मार, शिव्या, अपमान. स्वतःवर विश्वास नसतो म्हणून? आधार हवा म्हणून? का मारून टाकतात ती शक्ती, जी मनात आणलं तर काहीही करू शकते, अगदी काहीही!!
भले झोडू नका, पण सोडू तर शकता? नाहीतर मग जे चाललंय ते बदलून तरी टाका, पण आणखी किती सहन करत राहणार……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
KHARE VASTAV