संचिता आणि अपूर्व नवीन लग्न झालेलं छान जोडपं!!
दोघही एकमेकांना शोभेसे. दोघही उच्चशिक्षित. शहरातल्या नामांकित कंपनीत चांगल्या पदावर होते.
संचिताच्या घरातलेही सासू सासरे अगदी चांगले होते. अगदी मनमोकळे, मुलांच्या आनंदात आनंदाने सहभागी होणारे!!
त्यामुळे संचिताचे लग्नानंतरचे दिवस अगदी मजेत चालले होते.
लग्नाला महिना होतोच आहे तोपर्यंत अपूर्वच्या कंपनीने त्याला त्यांची अमेरिकेतली ब्रँच जॉईन करण्याची ऑफर दिली.
घरात कोणीही आडकाठी घेतली नाही, सर्वजण खूषच झाले.
अगदी पुढच्या पंधरा दिवसातच जॉईन व्हायचं होतं.
अपूर्व रुजू होण्यासाठी गेला, आणि बाकी सर्व तजवीज करून महिन्याभरानंतर संचिताला बोलावणार होता.
इकडे संचितानेही आपल्या कंपनीत रिझाईन दिलं.
आता तिला अमेरिकेला जाऊन नवीन जॉब शोधावा लागणार होता.
ठरल्याप्रमाणे महिन्याभरानंतर ती अमेरिकेत अपूर्वला जॉईन झाली.
अपूर्व रोज कामाला जायचा, आणि ती घरी असायची. पंधरा वीस दिवस मजेत घालवल्यानंतर, थोडं रिलॅक्स झाल्यावर तिने स्वतःसाठी जॉब शोधायला सुरुवात केली.
नवीन देश, सगळं नवीन, ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ जातोच.
तसंही लगेच कुणाला काय मिळतं??
तिचे प्रयत्न चालू होते.
लग्नानंतर लगेच इकडे यावं लागलं, कुणाकडे जायला मिळालं नाही, म्हणून ती माहेरच्या सासरच्या सर्व माणसांशी संपर्क ठेवून होती.
स्वतःहून साऱ्यांना फोन करायची. मेसेज पाठवायची.
पण त्या साऱ्या नातेवाईकांना भलतीच काळजी सतावत होती.
हिने विचारपूस करण्यासाठी कोणाला फोन केला की, त्यांच्याकडून पहिला प्रश्न यायचा, काय ग तुला लागली का तिकडे नोकरी?
ती म्हणायची नाही अजून प्रयत्न चालू आहेत.
व्हाट्सपवर कोणाला हाय पाठवायची खोटी, की लगेच, काय करतेस ग लागली का नोकरी?? हा प्रश्न यायचाच.
संचिताला वाटायचं, माझ्या नोकरीचा प्रश्न यांच्यासाठी एवढा महत्वाचा कसा झाला??
मी एवढी विचारपूस करायला फोन करते, तर यांना माझ्या नोकरीचं जास्त पडलंय.
झाडाला लागल्यात का नोकऱ्या इकडे??
किती इंटरव्ह्यू दिले मी यांना काय माहीत??
माझे प्रयत्न किती चालू आहेत. बरं, मला नोकरी नाही मिळाली, तर आम्ही उपाशी मरतोय असंही काही नाही.
माझा नवरा उत्तम कमावतो. मी माझ्या स्वाभिमानासाठी, मी जे शिक्षण घेतलंय त्याचा सदुपयोग करण्यासाठी नोकरी करणार आहे, यांना का घाई माझ्या नोकरीची??
अपूर्वकडे सगळं मन मोकळं करायची ती. बरेचदा नातेवाईकांच्या अशा वागण्याने फ्रस्ट्रेट व्हायची.
अपूर्व तिला खूप समजवायचा. अगं लोकच ती आणि दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर मुद्दामहून पाय देणं, हे त्यांचं आवडतं काम.
संचिता म्हणायची, ती लोकं आपले नातेवाईक आहेत याचच जास्त वाईट वाटतं रे……..
सगळे तिला नोकरीसाठी छळायचे, अपवाद फक्त तिचे सासू सासरे आणि आईवडील!!
त्यांनी तिला कधीही असं विचारलं नाही, उलट नातेवाईक त्यांनाही विचारायचे, लागली का तिला नोकरी म्हणून??
काय लोकं असतात, फार पडलेलं असतं दुसऱ्याचं त्यांना.
एवढी शिकलेली आहे, म्हणजे पटकन नोकरी लागावी ही त्यांची अपेक्षा.
त्या अपेक्षेपायी समोरच्याला आपण दुखावतोय हे ही लक्षात येऊ नये त्यांच्या??
शेवटी खूप प्रयत्नानंतर संचिताला अमेरिकेतल्याच एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी लागली एकदाची.
तिला ते सगळे डोळ्यासमोर दिसू लागले, ज्यांचा तिला नोकरी लागण्यासाठी जीव फार फार तडफडत होता.
सर्वप्रथम तिने आपल्या आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना आनंदाची बातमी दिली. खूप खूष झाले सगळे. त्यानंतर अपूर्वला ठसक्यातच म्हणाली, यांना तर खबर दिली, आता बाकीच्यांची खबर बघ कशी घेते मी!!
तिने सगळ्यांना खास मेसेज करून कळवलं. तुमच्या साऱ्यांच्या कृपेने मला इथल्या मोठ्या कंपनीत नोकरी लागली होssss!!
अपूर्वला म्हणाली, आता शांती मिळेल जिवाला त्यांच्या!!
अपूर्व त्यावर फसकन् हसत म्हणाला, नाही ग नाही ते काही केल्या त्यांच्या आणि तुझ्याही जीवाला शांती लागून देणार नाहीत. लोकच ग ती, त्यांचे प्रश्न कधीही संपणार नाहीत, आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं ते कधीही सोडणार नाहीत.
बघ जरा रिप्लाय बघ काय आले ते??
रिप्लाय बघून संचिताला तर जोरात ओरडावसच वाटलं, त्यातल्या बरेच जणांनी तिचं अभिनंदन तर केलं होतं, पण तिच्या तोंडावर दुसरा प्रश्न फेकला होता, काय मग आता गुड न्यूज कधी??
शांती काय लोकांच्या जीवाला लागत नसते, ना ते दुसऱ्या कोणाच्या जीवाला अशी तशी लागून देतात…….🤦
होय की नाही हो?😉
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास ‘हल्ला गुल्ला’ पेजला लाईक आणि फॉलो करा बरं का😀