शर्विलला हातावरच्या टॅटूकडे बघून याचं आता काय करावं हेच कळत नव्हतं……….
तिच्या वाढदिवसाला तिला सरप्राईज द्यायला किती हौसेने बनवला होता तो त्याने. पाहून तर किती हरखली होती ती, किती वेळा हात फिरवला होता तिने त्यावरून.
आणि तिला इतकं खूष झालेलं बघून शर्विलला आपल्याला असं सुचलं याबद्दल स्वतःच खूप कौतुक वाटलेलं.
शर्विलला, तिला आपल्या प्रेमाचा विश्वास द्यायचा होता, तिला आपल्यापासून कधीही दूर जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्याने तिच्या नावाचा टॅटूच बनवून घेतला अगदी. तसं त्याच्या हातावर कायमसाठी तिचं नाव उमटलं, ‘लतिका’.
लतिका आणि शर्विल एका विवाहसंस्थेद्वारे भेटले होते. लतिकाचा फोटी बघताक्षणीच ती शर्विलच्या मनात भरली होती, भेटण्याचे सोपस्कार नंतर पार पडले. त्याचं मन अगोदरच ‘हो’ म्हणून मोकळं झालं होतं.
लतिकाकडून होकार यायला तसा थोडा उशीरच झाला.
शर्विलला वाटलेलं, ती देखील आपल्याला पटकन हो म्हणेल, पण त्याचा अंदाज चुकला. तिने चांगला महिना घेतला विचार करायला.
शर्विल दिसायला हँडसम पठडीत मोडणाराच होता, शिवाय भरगच्च पगाराची नोकरीही होती. घरही सुसंस्कृत होतं. नाही म्हणण्यासारखं, किंवा हो म्हणायला वेळ घेण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात.
तो थांबला तरीही. तिचं उत्तर येईपर्यत दुसरी कुठली मुलगी पाहिलीही नाही त्याने. त्याच्या आईला फारसं आवडलं नव्हतं ते. पण मुलाच्या हट्टापुढे तिने दुर्लक्ष केलं.
शेवटी महिन्याने का होईना तिच्याकडून ‘हो’ आलं.
शर्विल आस लावून बसलाच होता. उत्तर आलं तसं, दोघांचं भेटायचं ठरलं. पहिल्या भेटीत शर्विलच्या चेहऱ्यावर अत्यानंद तर लतिकाच्या चेहऱ्यावर दडपण होतं.
जशा जशा भेटी वाढत गेल्या, तसं तसं लतिकाच्या चेहऱ्यावरचं दडपण कमी होत गेलं.
ती खुलली पण इतकीही नाही, जेवढा शर्विल. त्याला नेहमी वाटायचं, आपल्याला जेवढं आतून वाटतय, तेवढं तिला अजूनही वाटत नाहीये. त्याने तिला अनेकदा तसं बोलूनही दाखवलं, पण प्रत्येकवेळी तसं काही नाही म्हणत उत्तर द्यायचं टाळलं.
त्याला वाटलं, आपला भरोसा वाटत नसेल. मन कुढत असेल तिचं. म्हणूनच मग तिचा वाढदिवस आल्यावर तिला आपल्या प्रेमाची खात्री पटवायला म्हणून त्याने तिच्या नावाचा टॅटू बनवून घेतला.
ती खूप खूष झालेली ते बघून. स्वतःहूनच त्याला बोलली सुद्धा त्यावेळेस, आपण साखरपुडा लवकर करून घेऊया. त्यालाही एकदम छान वाटलं.
तिच्या म्हणण्याप्रमाणे साखरपुडा लवकरच पार पडलाही. आणि ते ऑफिशियली एकमेकांचे झाले.
लग्नाची तारीख पण तीन महिन्यांतरची काढली गेली होती. शर्विल तर प्रचंड आनंदात होता. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्न अगदी पंधरा दिवसांवर आलं असतां, लतिकाने त्याला बोलवून तिला हे लग्न करता येणार नाही असं संगितलं.
तिचं ज्याच्यावर प्रेम होतं, त्याच्या घरच्यांनी त्याच्यावर जबरदस्ती करून त्यालाही साखरपुडा करायला भाग पाडलं होतं. पण आता तो ते सर्व मोडून घरच्यांचा दबाव झुगारून लतिकाशी लग्न करण्यासाठी परत आला होता. आणि मनात असलेला तो परत आल्यावर लतिका त्याच्याकडे आपोआप झुकली गेली होती.
शर्विलला त्यावेळी अगदी हेल्पलेस झाल्यासारखं वाटलं. बोलण्यासारखं तर खूप काही होतं त्याच्याकडे, पण तरीही त्याला काहीच बोलावसच वाटलं नाही.
त्याला कळलं तो तिच्यासाठी फक्त एक सोय होता. तिच्या प्रियकराने दुसरीबरोबर लग्न केलंच तर हिलाही लग्न करायला म्हणून शर्विलला तिने राखीव म्हणून ठेवलं होतं फक्त.
वेड्यासारखा रडला तो घरी येऊन, त्या टॅटूकडे बघत. त्याच्यावरून अनेकदा हात फिरवत. काय करायचं या टॅटूचं हेच त्याला आता कळत नव्हतं.
फारसा काही विचार न करता आपण तो बनवून घेतलेला, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. तिला खूष करण्यासाठी. पण ती तर चुटकीसरशी गेली आपल्याला डावलून. एकवारही नाही आठवला तिला तो टॅटू, जो आपण जन्मासाठी आपल्या हातावर कोरून घेतला.
दोन वर्ष लागली शर्विलला या सगळ्यातून बाहेर यायला. तेव्हा कुठे आई वडिलांच्या म्हणण्याचा विचार करून तो लग्नाला तयार झाला.
ना त्याने शिल्पीचा फोटो पहिला ना बघण्याच्या कार्यक्रमात तिला नीट निरखलं. त्याचं तर मनच उडालं होत या गोष्टींवरून. कितीही वरून पहा, आतलं मन थोडंच कळतं. माणसं बिनदिक्कत खोटे मुखवटे लावून फिरत असतात, हेच त्याच्या मनाने पकडलं होतं.
तसा शिल्पीकडून लगेचच होकार आला. यानेही जास्त काही अपेक्षा न ठेवता आता आई वडील म्हणतायत तसं करूया, म्हणून होकार देऊन टाकला पण तिला एकदा भेटायला बोलावलं.
शिल्पी हॉटेलमध्ये त्याच्यासमोर बसली होती, तरी तो तिच्याकडे निट असं बघतच नव्हता. त्याला काही सांगायचं होतं, त्याचीच जुळवाजुळव करत होता.
पटकन काय मनात आलं,आणि त्याने त्याच्या हातावरचा टॅटू तिला दाखवला, आणि एका दमात सगळं घडलेलं सांगितलं. तिला थोडा धक्का बसला खरा, पण तरी सावरून ती म्हणाली, ही आता नेमकी कुठे आहे?
तिच्या प्रश्नाने तो गडबडला, तो म्हणाला, नाही माहीत.
शिल्पी म्हणाली, ती आता तुझ्यात कुठे आहे?
शर्विल म्हणाला, कुठेच नाही, फक्त हातावरच्या नावात आहे. आयुष्यात ही चूक पुन्हा व्हायला नको म्हणून तिला मी तसच ठेवलंय.
शिल्पी म्हणाली, ती हातावरचं आहे ना? मग तिला राहू दे तशीच, मला काही फरक पडत नाही. तुझ्या मनात रहायला मला जास्त आवडेल. कारण मला तू पहिल्या नजरेत आवडला होतास. तू माझ्याकडे नीट बघतही नव्हतास तरीही. तू नाही म्हटला असतास तरी मी तुझी वाट बघत थांबले असते कितीही महिने.
ती असं बोलताच, शर्विलच्या हृदयात एकदम काहीतरी हललं, चेहऱ्यावर कित्येक महिन्यांनी हलकसं हसू पसरलं. ही तर अगदी आपल्यासारखीच आहे, त्याला मनोमन पटलं.
थोडं निरखून बघितलं तर अगदी मोहक वाटली त्याला ती. पण नकळतही लतिकाशी तिची तुलना झालीच नाही, कारण लतिका मनातून केव्हाच उतरली होती. कुठेच नव्हती ती मनात त्याच्या. होती ती फक्त हातावरच्या टॅटूतच.
पुढे दोनच महिन्यात शर्विल आणि शिल्पीचं लग्न झालं. शिल्पीच्या सहवासात शर्विल पुन्हा नव्याने फुलला. पण तो टॅटू त्याला छळत होताच. त्याला आता तो नकोसा वाटत होता. तो हातावर असणं म्हणजे शिल्पीशी प्रतारणा वाटत होती त्याला.
एक दिवस तो शिल्पीला म्हणाला, मला हा नकोसा झालाय काय करू याचं. याला काढून मला तुझ्यासाठी काहीतरी बनवावसं वाटतय, नाहीतर पूर्ण मिटवून टाकू का याला?
शिल्पी त्याला म्हणाली, हे बघ तो टॅटू मला अजिबात टोचत नाहीये. मी तुझ्या मनात आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तू तो खोडलास तरी तिथे बघितलं तरी तुला तेच नाव दिसणार. ती जागा तुला आठवण करून देणारच. कितीही नाही वाटलं तरी!!
आणि माझ्यासाठी म्हणशील तर काही करू नकोस. मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. टॅटू काढून तू ते आणखी कोणाला दाखवणार आहेस?
ज्याला आपल्याबरोबर राहायचंचय ते राहतातच, आणि ज्याला जायचंय ते, तुम्ही त्याच्यासाठी कितीही काहीही करा ते जातातच………..
याचा पूर्ण अनुभव घेतलेल्या शर्विलला ते अगदी मनापासून पटलं………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.