एवढ्या वरसात पहिल्यांदा झालं की वो असं, देवीची जतरा न्हाई. या दिसांत कवातरी घरी असतूया व्हय आपन असं?
धा दिस कसं निघून जात्यात कळत बी न्हाई!! किती कलकलाट अस्तुया. किती आवाज नी किती त्यो गोंगाट. पिपाण्या वाजवून डोकी उठीवणारी पोरं, ह्ये कितीला नी ते कितीला विचारुन भंडावून सोडणारी गिऱ्हाईकं, त्ये मोठाले डोळे करून, ह्ये घेऊ का त्ये घेऊ करत ज्या त्या वस्तुकडं आशेने बगत बसणाऱ्या बाया, जिथून तिथून त्यांना वढणारे त्यांचे बापे, जतरतलं हरएक खेळणं मागत किरकिरणारी पोरं, समदं समदं दिसतंय बगा डोळ्यासमोर…..
गेले आठ दिवस एवढंस तोंड करून सोनी रोज आपल्या नवऱ्याला हेच सांगत बसायची.
लग्न झाल्यापासून वीस वर्ष नेमाने जत्रेत नवऱ्याबरोबर लाखेच्या बांगड्या, कानातली, गळ्यातली विकायला बसणाऱ्या सोनीला यावर्षीच्या नवरात्रीच्या दिवसांत नुसतं बेचैन बेचैन होत होतं.
मोठ्या शहरात भरणारी ती देवीची जत्रा वर्षातल्या सगळ्या जत्रेतील मोठी जत्रा असायची. गर्दीचा नुसता लोटच्या लोट दिसायचा कुठूनही बघितलं तरी. आजूबाजूच्या लहान मोठ्या गावातून झाडून सगळे यायचे, हरतऱ्हेच्या वस्तू घेऊन विकायला. या जत्रेत जोरात धंदा व्हायचा सर्वांचाच. अखेरच्या दिवशी कोणी नाराज नसायचं. जणू काही देवीचा आशीर्वाद मिळायचा त्यांना. सगळे समाधानी दिसायचे, तक्रार मनात उरायचीच नाही काही!! शेवटच्या दिवशी आपल्या बायकापोरांची चैन करून भरल्या मनाने आणि खिशानेही घरची वाट पकडायचे सारे.
पुढचे कित्येक दिवस जत्रेतल्या गोष्टी तोंडात असायच्या साऱ्यांच्या. आणि तेवढ्यात पुढचं वर्षही समोर यायचं.
सोनी तर वर्षभर याच जत्रेची वाट बघत असायची. जत्रेत दहा दिवस डोंगरावढं काम पडायचं, दिवसभर गिऱ्हाईकं काही सुचून द्यायची नाहीत, कोण नाही बघून कोपऱ्यात आडवं पडलं की हमखास कोण तरी भाव विचारायचंच. आराम तो काय मिळायचा नाहीच दोघांच्याही जीवाला.
घरी म्हातारीजवळ पोरं सोडून यायची, म्हणून त्यांची वचवच नसायची पाठीमागं. तशी पोरंही मोठी होती बऱ्यापैकी. जत्रेतून येताना दोन चार खेळणी, खाऊ, कपडे आणले की खूष व्हायची. ते मिळण्याच्या आशेवर दहा दिवस आजीपाशी गप गुमान काढायची.
या वर्षी मात्र काहीच नाही. ना खिसा भरला, ना पोरांना खाऊ, खेळणी, कपडा मिळाला. यावर्षी जत्रा भरलीच नाही. यावर्षी सोनीच्याच काय कुणाच्याही मनात उत्साहाची पालवीच फुटली नाही. जसं तसं सगळं चाललेलं आपलं.
सोनीला मात्र तरीही काहीतरी खूप टोचत होतं. रोज ती नवऱ्याकडं जत्रेचा विषय काढायचीच. नवराही ऐकून घ्यायचा. मात्र नवव्या दिवशी अचानक मनात आलं तिच्या, जत्रा नाही पण देवीला भेटायला जाऊ शकतो की!! इतक्या वर्षात दर्शन चुकलं नाही कधी. तिच्या आशिर्वादाचा हात डोक्यावर होता म्हणून एवढी वर्ष सुखरूप सरली. तिच्या जत्रेत कमावलं की वर्षाची फिकीर मिटून जाती.
झालं मनात आलं तसं ती तोंडभर हसुन पटकन नवऱ्याला म्हणाली, आवं जत्रा न्हाई तर न्हाई. देवी हाय की आपुली. इतकं वरीस डोईवर हात ठेवल्याली देवी हाय ती. ह्या वरसाला गर्दी न्हाई तर डोळं भरून बगीन की तिला. उद्याच्यानं सकाळ सकाळ जाऊ आन् लगीच माघारी फिरू.
सोनीच्या नवऱ्याला, तिच्या आशेने भरलेल्या डोळ्यांचा शब्द पाडता आला नाही. तो मुंडी हलवून चालल म्हणाला.
दोघं सकाळी लवकर उठले, घरातल्या म्हातारीला सा़गितलं, तिच्या पाया पडले, आणि देवीच्या ठिकाणी निघाले.
या दिवसात कुठलं वाहन मिळणार याची काही माहीती नव्हती त्यांना, पण स्टँडवर गेले तसे, तिकडंच जाणारी रिकामी एसटी समोर दिसली त्यांना. दोघं आनंदानं चढली. आणखी काही प्रवासी भरल्यावर एसटी सुटली.
दोन तासांचा प्रवास होता. पण सोनी मनानं, काल रात्री ठरवल्यापासून देवीकडंच पोचली होती. आता शरीर जायचं तेवढं बाकी होतं.
गाडीतून लागणारी गार हवा मनाला आणखी उल्हासित करत होती. तिचा नवरा तर पुढच्या दहा मिनिटात झोपुनही गेला. पण तिचे डोळे मात्र बंद व्हायला तयारच नव्हते.
तिला ओढ लागली होती. हे असं ती इतक्या वर्षात पहिल्यांदाच अनुभवत होती.
इतर वर्षी डोक्यात आपला बिस्तरा कुठं मांडायचा, गिऱ्हाईकं कशी संभाळायची, दहा दिवस सामानाची कशी तजवीज करायची, मिळणारा पैसा कसा सांभाळून ठेवायचा, जाताना पोरांना काय काय न्यायचं, हेच विषय असायचे. देवी त्यात कुठंच नसायची. हा, शेवटच्या दिवशी मात्र सोनी खणा नारळाची ओटी भरून जायची देवीची. आणि डोकं टेकवून भरल्या डोळ्यानं जे काय कमावलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
पण यावेळी जत्रा नव्हती, फक्त देवीसाठी यावं वाटलेलं तिला. ती देवीच्या ओढीनं आलेली.
विचार करत करत स्टॉप आला सुद्धा. सोनीनं नवऱ्याला उठवलं आणि दोघं एकामागोमाग बस मधून खाली उतरले.
वाईच च्या पिऊ की दोगं, तिचा नवरा म्हणालाही, पण सोनीला धीर नव्हता.
ती त्याला व्हसकत म्हणाली, आता च्या बी काय नगं, येळ जाईल उगी.
देवी काय कूटं पळतीया का काय तुजी, म्हणून तो तिच्या मागं हसत मुकाट्यानं चालू पडला.
त्याला कौतुक आणि आश्चर्य दोन्ही वाटत होतं सोनीबद्दल. एवढे वर्ष नाही पण आताच हिला देवी इतकी कशी आठवली हे त्याला कळतच नव्हतं.
तसं तर ते सोनीलाही कळत नव्हतं. पण मन जसं करून घेत होतं, तसं ती त्याच्यापाठी धावत होती इतकंच.
नेहमीच्या जत्रेच्या ठिकाणी आल्यावर क्षणभर थबकलीच सोनी. सकाळ- दुपार- संध्याकाळ आणि देर रात्रीपर्यंत असणारी गर्दी एकदम कुठंतरी गुडूप झाल्यासारखी वाटली तिला. तो आवार इतक्या वर्षात कधी मोकळा पहिलाच नाही तिनं. बघून उगाच पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं जाणवलं तिला.
स्वतःला सावरून ती देवीच्या ठिकाणाकडे वळली. तिथं कोणी धक्का मारत नव्हतं, की उंच उंच उड्या मारून देवीला बघत नव्हतं की कोणी खांद्यावर पोरग उभं करून त्याला देवी दाखवत नव्हतं. लांबलचक लाईन नव्हती, की पोलिसांच्या शिट्यांचा आवाज नव्हता, काही काही नव्हतं. माणसं सुद्धा अगदी हाताच्या बोटावर मोजण्यातकीच होती. अगदी चटकन् देवीच्या समोर उभं राहायला मिळालं तिला. डोळे भरून पाच मिनिटं ती बघतच राहिली. एवढं कधी ते रूप शांततेने डोळ्यात साठवायला मिळालंच नव्हतं तिला. कोण चला निघा पुढं, बोलणारं नव्हतं, की उशीर होतोय म्हणून बाजूला ढकलणारं नव्हतं.
तिने देवीसाठी घेतलेली खणा नारळाची ओटी पुजाऱ्याने सांगितली तिथं ठेऊन दिली अन् निघायच्या वेळी पुन्हा एकदा नमस्कार करताना डोळ्यातलं पाणी ओघळू लागलंच तिच्या गालावर.
दरवरसाला भरभरून देतीस माय. आता काय बी मागणं न्हाई माजं. तुझा हात तेवडा तसाच डोईवर असु दे बग. अन् तुझा ह्यो आवार पुन्हा फुलू दे. त्यो फुलला की पुडच्या वरसाला कोनाला काय बी कमी पडनार न्हाई ठाव हाय मला!!
एवढं बोलून सोनीनं निरोप घेतला देवीचा…….
ती देवीला भेटून आली तसा काही चमत्कार झाला नाही, घरी गेल्यावर कुठूनही पैशाचा पाऊस पडला नाही. जी परिस्थिती होती तीच राहिली, पण आत्मा सुखावला. पैसा नसतानाही सुखाची झोप लागू लागली. आंतरिक शक्ती बळावली. पुढच्या वर्षी हे चित्र नक्की पालटणार याची मनीला खात्री झाली.
नवी उमेद मनात भरली, आणि पुढच्या जत्रेत भरल्या आवारातून वाट काढत देवीला जाऊन भेटायची नवी ओढ सोनीला लागली………
आमच्या ठाण्यात टेंबी नाक्यावर दरवर्षी दहा दिवस मोठी जत्रा भरते. खूप लांबून लोकं येतात, जत्रेसाठी, देवीसाठी. खचाखच गर्दीने सगळा रस्ता फुललेला असतो. पण या वर्षी मात्र सगळं पहिल्यांदाच सुनसान बघितलं, आणि मनातली व्यथा या कथेच्या रूपाने तुमच्या समोर आली……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.