ईश्वरीकडे मार्गशीर्षातल्या गुरुवारचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तसं बिल्डिंगमधल्या सगळ्यांनाच आमंत्रण होतं. सगळ्या जमेल तशा येऊन जात होत्या. नव्याने राहायला आलेली दर्शना देखील आली. बरोबर सासूबाई होत्या तिच्या. दोघीही छान साडी, गजरा लावून प्रसन्न चेहऱ्याने आल्या होत्या.
त्या आल्या तसं का कुणास ठाऊक पण ईश्वरीबरोबर तिथे असलेल्या दोघी तिघींना पण एकदम उल्हासित वाटलं. चेहऱ्यावर स्पष्ट दिसतच होत त्यांच्या.
ईश्वरीने हळदकुंकू लावायला घेतलं, आणि दर्शनाला लावून ती तिच्या सासुबाईंकडे वळली. आणि पटकन तिला आठवलं, दर्शनाने सांगितलेलं, सासरे नाहीत तिला. ती क्षणभर त्यांच्याजवळ थांबली. ते पाहून दर्शनाच्या सासूबाई म्हणाल्या, मला चालतं. तुला चालत असेल तर लाव खुशाल!!
ईश्वरी एकदम मोकळं हसली, तिने त्यांना हळदी कुंकू लावलं, पाया पडली आणि त्यांच्याजवळच येऊन बसली.
दोघींना म्हणाली, खरंच मला खूप खूप आवडलं हे.
दर्शनाच्या सासूबाई म्हणाल्या, जाणारा माणूस माझ्यामागे सगळ्या सुखांचा त्याग करून विरक्त होऊन बसा असं काही सांगत नाही. थोड्या कालावधीनंतर आपणही पूर्ववत होतोच. मग फक्त लोकांना दाखवण्यासाठी दुःख पांघरून का जगायचं? मला जे योग्य वाटतं, मनाला पटतं ते मी करते. जो आनंद घ्यावासा वाटेल तो घेते. अगदी नॉर्मल जगते.
म्हणून तर आलो ना आम्ही दोघीही, दर्शना सासूबाईंच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. आम्हाला सगळं पटतं, दुसऱ्या कुणाला पटणार नाही याचा विचार करून आमचा आनंद का सोडावा आम्ही?
आणि तुला माहिती आहे ईश्वरी, अजूनपर्यंत एकही वाईट अनुभव आला नाही आम्हाला. सगळ्यांनी आमच्या आईंच्या निर्णयाचं स्वागतच केलंय.
आपणच आपलं मनात ठरवतो, लोकं नाव ठेवतील म्हणून आणि मागे हटतो. आपण लोकांना वेगळा विचार करायची संधी तर द्यायला हवी की नको?
खरं आहे, मला पण आवडलं हे, तिथे बसलेल्या साठे काकूही दर्शनाला म्हणाल्या.
हो ना काही वावगं नाही त्यात, बरं केलंत तुम्ही आलात ते, पुढच्या वेळेला मी पण घेऊन येईन सासूबाईंना माझ्या, बाजूच्या विंगमध्ये राहणारी प्रतिक्षाही मान डोलावून म्हणाली.
खरंच, आज अतिशय सुखावून गेला हा बदल मला, खूप कटू आहे आहे माझ्या मनावर कोरलेली याबद्दलची, ईश्वरी मध्येच थोडी गंभीर होऊन म्हणाली.
दर्शनाच्या सासूबाईंनी तिच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाल्या, बोलून मोकळी हो बाळा.
ईश्वरी म्हणाली, नको चांगल्या दिवशी कशाला त्या आठवणी……
आजच्याच दिवशी सांग, म्हणजे तुलाही हलकं वाटायला लागेल, असं म्हणत दर्शनाने तिला बोलायला भागच पडलं.
ईश्वरी बोलू लागली…….
आम्ही राहत होतो, ते छोटंसं शहरच होतं. माझ्या आजी-आजोबांनी खूप माणसं जोडलेली.
दर आठवड्याला आजी-आजोबा मला त्यांच्याबरोबर कुणा ना कुणा ओळखीच्यांकडे घेऊन जायचेच. मलाही खूप आवडायचं त्यांंच्याबरोबर फिरायला.
असंच एके दिवशी आम्ही आमच्या ओळखीच्या गोसावी आजींकडे गेलो. त्यांचं घर अजूनही माझ्या डोळ्यासमोर तसंच आहे. मोठ्या लाकडी दरवाज्यातून आत शिरल्यावर पहिले दिसायचा तो मोठा सोपा, त्यानंतर समोर देवाचं मंदिर आणि त्याला लागूनच त्यांच्या दोन खोल्या होत्या. मला खूप आवडायचं तिथं, कारण मोठी जागा होती खेळायला. त्या एकट्याच राहायच्या बहुतेक. त्यांची मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी होती.
आजी-आजोबा गोसावी आजींशी गप्पा मारत बसायचे आणि मी त्या मंदिराच्या आवारात तिथल्याच पोरापोरींशी खेळत बसायचे.
त्यादिवशीही नेहमीप्रमाणे माझं खेळणं चालू होतं, आणि आजीने हाक मारली. मी गेले, तर गोसावी आजींनी मला खाऊ दिला. तो खाऊन झाल्यावर, निघायचं म्हणून आम्ही उठलो. निघताना माझ्या आजीने समोर ठेवलेला करंडा उचलला, स्वतःला हळदी कुंकू लावलं आणि मलाही लावलं. मग मीही आपल्याला लावलं की दुसऱ्याला लावायचं हे बघितलेलं बरेचदा, म्हणून आजीला लावलं आणि गोसावी आजींनाही लावायला गेले.
तर त्या एकदम कडाडल्याच माझ्या अंगावर!!
मूर्ख मुलगी, अक्कल नाही का तुला, शिकवलं नाही काही कोणी असं खूप काही बोलायला लागल्या.
माझ्या नंतर माझ्या आजीलाही बरंच काही बोलल्या. माझी आजी निघण्याच्या तयारीत होती, तिला वाटलं मी जागेवर नेऊन ठेवतीये करंडा.
एका विधवेला कुंकू लावायला नुसता हात पुढे करणंही त्यांना प्रचंड चुकीचं वाटलं. मी तर अवघी पाच सहा वर्षाची होते. विधवा काय हेही माहीत नव्हतं मला. त्या तावातावाने ओरडत होत्या, आणि मी नेमकं काय केलं हे मला कळतच नव्हतं.
त्या इतक्या बोलल्या की माझ्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं. इतका मोठा गुन्हा होता हा त्यांच्या लेखी!!
तिथून बाहेर आल्यावर मी आजीला विचारलं, काय झालं त्यांना? तेव्हा मला आजीने कारण सांगितलं, खरंतर ते कळण्याचं वय नव्हतं माझं, तरी मला ते कळलं. कारण माझ्या लाडक्या आजीला रडवलं होत त्या गोष्टीने. तिच्या संस्कारांचा उद्धार केला होता, एका लहान मुलीला विधवा बाई काय असते आणि तिच्याशी कसं वागावं हे शिकवलं नाही म्हणून!!
माझे आजोबा तिथे काही बोलले नाहीत, पण बाहेर आल्यावर त्यांनी त्या बाईंंच्या वागण्याचा तीव्र निषेध केला. मी लहान होते, आणि चूक नकळत झाली होती, हे त्यांच्याच वयाच्या माझ्या आजी आजोबांना कळत होतं, पण मंदिराला लागून असणाऱ्या खोलीत राहणाऱ्या गोसावी आजींना मात्र अजिबात कळलं नाही. देवाच्या दारात राहून नावालाही देवत्व शिरलं नव्हतं त्यांच्या अंगात.
अजूनही तो प्रसंग जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो माझ्या. पिसवेसारखा चिकटून राहिलाय तो अजूनपर्यंत माझ्या मनाला…….
पण आज मात्र तुम्ही अगदी हक्काने कुंकू लावून घेतलत, खरंच आज मन शांत झालं माझं. तीस वर्षाने का होईना, माणसं नवीन बदल स्वीकारू पाहतायत हे ही थोडकं नाही.
दर्शनाच्या सासूबाईंनी कौतुकाने तिला जवळ घेतलं.
ईश्वरीने डोळे पुसले, आणि म्हणाली, आता संक्रांतीच्या हळदीकुंकवाला पुन्हा सगळे जमू. प्रतिक्षा नक्की आण हं तुझ्या सासूबाईंना, त्या दुर्वे काकू आणि तावडे काकूंनाही बाहेर काढू त्यांच्या नेहमीच्या कोषातून.
आणि ती बाजूच्या विंग मधली स्मृती ग, प्रतिक्षालाही वेळेवर आठवण झाली.
हो, तिला तर मी आज सुद्धा येऊन जा म्हटलेलं…..
आलीच नाही ती!!
संक्रांतीच्या वेळी घरी जाऊन जबरदस्तीनेच घेऊन येईन. आपण वेगळं वाटून घेणं सोडलं तर त्यांनाही आपल्यातल्याच एक असल्यासारखं नक्कीच वाटायला लागेल.
सगळ्यांनी ईश्वरीच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि यापुढे प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काचा आनंदाचा वाटा मिळवून द्यायचाच हे मनोमन ठरवूनच सर्वजणी तिथून घरी जायला उठल्या…….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
Nice