धन्यवाद डॉक्टर. तुमच्यामुळे माझं बाळंतपण सुखरूप पार पडलं, मी तर अशाच सोडली होती, अमृताने अगदी भरल्या मनाने डॉक्टरांचे आभार मानले.
आशा आम्हीही सोडली होती, बाहेर जाऊन सांगितलं सुद्धा तुझ्या आईला, काय होईल काही सांगता येत नाही. आता देवावर हवाला !! अडकलीच होतीस अशी तू………
तुझ्या आईने तर टाहो फोडला अगदी, अशी काही आर्त साद घातली परमेश्वराला, की सगळं चित्र पालटलं पोरी!! इतक्या वेळ अडकून बसलेलं तुझं पोरगं आमच्या पुढच्या प्रयत्नात मात्र सुखरूप बाहेर आलं.
तुला धन्यवाद द्यायचेत तर त्या माऊलीला दे!!
बाजूला उभ्या असणाऱ्या नर्सने पण डॉक्टरांच्या बोलण्याला दुजोरा दिला, आणि म्हणाली, शेवटी आईची माया ती. देवाला हलवणारच……..
डॉक्टरांचा राऊंड संपला, तसं अमृताने आईकडे पाहिलं. आईच लक्ष नव्हतंच तिकडं, ती तान्ह्या बाळाला मांडीवर घेऊन जोजवत बसली होती. जणू काही तिच नव्याने आई झाली असे भाव तिच्या चेहऱ्यावर आले होते.
अमृताने तिला हाक मारली, आsई….
तिच्या आईने मान वर करून विचारलं, काही हवं का ग?
अमृता म्हणाली, काही नको. ‘थँक्स’ काही तिच्या तोंडातून बाहेर पडलच नाही. तिला वाटलं, बाकी सगळ्यांना आपण चुटकीसरशी बोलून टाकतो, अन् मनात असूनही आईला बोलायला मात्र शब्द तोंडातच विरघळून जातो.
हॉस्पिटलमधले पाच दिवस संपले. घरी गेल्यावर मात्र एवढुश्या बाळाचं सर्व कसं बरं पेलणार, ही धाकधूक होतीच मनात अमृताच्या. पण पासष्टीला आलेल्या आईने बाळाचं सर्व आपल्या ताब्यात घेऊन अमृताला अगदी चिंतामुक्त करून टाकलं.
प्यायला ते काय बाळ जायचं तिच्याकडं, बाकी सगळं आई बघायची. रात्री अमृताबरोबर आईलाही जागरण व्हायचं. पण ती तेव्हाही तत्पर असायची.
अमृता विचार करायची, अगोदर किती कटकट करायची ही आपल्यापाठीमागे. आता कशी सगळं सहन करते? किती खटके उडायचे आम्हा दोघींचे? अगदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत सतत लेक्चर देऊन कान दुखवत होती. भणभणीला वैतागून केवढी खेकसलेले मी तर तिच्या अंगावर!!आणि आता? स्वतःला इतके कष्ट होतायत तरी गप्प कशी? एवढ्या दिवसात एकदाही वैतागलेलं पाहिलं नाही मी तिला !! मला बघतीये, बाळाला जपतीये. कटकट नाही तिची तर नॉर्मल वाटेना मला काही………
एका निवांत क्षणी, अमृताने पकडलाच हात आईचा. तरी घाई असल्यासारखी सोडवून घेत ती म्हणाली, थांब आता बाळ झोपलाय तर चहा टाकते. निवांत पिऊन घे. खायला ही बनवते छानसं काही……
अमृताने तिला जबरदस्तीच थांबवलं. आणि तिच्या कुशीत शिरून एकदाची धीर एकवटून म्हणालीच, आई ‘थँक्स’!!
थँक्स? अमु अगं तू केव्हापासून मला थँक्स बिंक्स म्हणायला लागलीस?, आईने आश्चर्याने विचारलं.
अमृता पटकन म्हणाली, तसंतर तू मला आणि माझ्या बाळाला नव्याने जन्माला घातलस, तेव्हाच म्हणायचं होतं, पण जीभ अडखळत होती खरी. डॉक्टरांंनी सांगितलं मला. आख्खं हॉस्पिटल हलवून टाकलेलंस त्या दिवशी तू !! तुझी हाक देवाने ऐकली, आणि आम्ही दोघे सुटलो.
ऐकावं लागलच त्याला. दमच तसा भरला होता मी. म्हटलं, माझा जीव काढ काय तो, पण माझ्या पोरीला मोकळं कर. तिला छळलंस तर मी अशीच इथेच जीव सोडीन!!, बोलता बोलताच तो प्रसंग आठवून अमृताच्या आईचं अंग शहारलं.
म्हणूनच आता जीवापाड जपतीयेस ना एवढी आम्हा दोघांना, खरं सांग?, अमृताने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. एवढं जीवापाड की एका शब्दाने मला काही बोलत नाहीयेस तू. किती भांडायचो आई आधी आपण!! मला तू माझी आई वाटतच नाहीयेस. हळवेपणा सोड आता. नॉर्मल हो. पहिल्यासारखी वाग, हवं तेवढं रागे भर मला!!
झालं ते झालं. सारखं नाही काही होणार तसं. तू असताना कोणाची हिम्मत?, देवाला पण अडवलस ना तू……..
आईने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला, आणि म्हणाली, आता तो विषय नको परत. काळीज गलबलतं ते आठवून.
ठिक आहे मग प्रॉमिस कर. सारखी मागे कटकट करणारी, चुकले तर माझ्यावर रागवून फुगून बसणारी पहिल्यासारखी आई होशील. ही साखरेचा एवढा पाक तोंडात घोळवणारी, मुलीचे सगळे नखरे झेलणारी आई नाही आवडत आहे मला. बोलता बोलताच अमृताने हात पुढे केला.
तिच्या आईने त्यावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, प्रॉमिस. पहिल्यासारखी कजाग आई होते. दोन्ही बाळांना आता चांगलाच इंगा दाखवते.
अगं आई एकच बाळ झालंय ग मला, अमृता हसत म्हणाली.
हो. ते तुझं बाळ. आता ते ही माझं आणि हे हात घट्ट पकडून केव्हाचं माझ्या कुशीत बसलंय ते ही माझं. हे माझं बाळ कितीही मोठं झालं, त्याला बाळ झालं, तरीही ते बाळचं राहणार हं कायम माझ्यासाठी!!
गोड गोड बोलणाऱ्या आईची गोड गोड पप्पी घेऊन, आज तुला मी माझ्या हातचा चहा पाजणार, तो तू निवांत प्यायचा कळलं?, असं लाडाने धमकावून खूप दिवसांनी अमृता स्वैपाकघराकडे वळली.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.