चला, सगळी आमंत्रणं देऊन झाली. धावपळीत दोन महिने कसे गेले कळलं देखील नाही. पंधरा दिवसांवर लग्न येऊन ठेपलं सुद्धा!!
सुखदा स्वतःशीच बडबडत होती, तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. नाव बघितलं आणि तिने पटकन उचलला, तिच्या लाडक्या बहिणीचा, स्पृहाचा फोन होता तो.
तयारी कशी चाललीये विचारायला, एक दिवसाआड बोलणं व्हायचंच दोघींचं. आज मात्र बोलताना दोघीनांही नकळतच भरून आलं होतं.
स्पृहा म्हणाली, ताई तू जेव्हा पहिल्यांदा लग्न ठरलंय सांगितलंस ना, तेव्हा दोन मिनिटं विश्वासच बसला नाही माझा! मी तर एवढीशीच समजत होते आपल्या छकुलीला. दहावी झाली, बारावी झाली आणि आताच तर कुठे इंजिनिअरिंगसाठी पुण्याला ऍडमिशन घेतली होती ना? नोकरीही करायला लागली आणि लग्नही ठरलं इतक्यातच. आपली छकुली एवढी मोठी कधी झाली ग?
हो ना, तिचं तिनेच ठरवलं म्हटल्यावर काय करणार?
खरंतर नुकतंच चोवीसावं लागलंय ग तिला. तिकडच्यांना घाई आहे, मुलाला कंपनीतर्फे लंडनला जायचंय ना दोन महिन्यांनी, त्यांचं म्हणणं दोघही जाऊ देत एकत्रच.
पण ताई, तुझ्याजवळ तर दहावीपर्यंतच होती ती. नंतर शिकण्यासाठी बाहेरच पाच वर्ष. मग पुन्हा आणखी नवे कोर्स, नोकरीची दोन वर्ष, पुन्हा बाहेरच, आणि आता एवढ्या लगेच लग्नही? अशी कितीशी मिळाली ग तुला ती??
स्पृहा हे बोलली,आणि सुखदाचा जीव कासावीस झाला, डोळे पार भरून आले.
त्याच तंद्रीत तिने फोन ठेवला, पण तिला स्पृहाचे शब्द सारखे ऐकू येत होते, अशी किती मिळाली ग तुला ती?
सुखदाचं मन हळवं होऊन विचार करू लागलं……..
खरंच आपली छकुली मोठी झाली तशी आपल्याला कधी मनभरुन मिळालीच नाही. छोटी होती तेव्हा तर जराही राहायची नाही आपल्याशिवाय. सारखी आई आई करत मागे मागे फिरायची. शाळेत घातलं, तर आई पाहिजे बाजूला बसायला म्हणून हट्ट केला होता वेडीने.
तिचा बाबा तर आईवेडी म्हणूनच हाक मारायचा तिला. आणि आई आई करते तशी बाबा बाबा नाही करत म्हणून सारखा खट्टू होऊन बसायचा.
पुढे मात्र तिच आईवेडी दहावीनंतर शिक्षणाच्या ध्यासाने मिळेल त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन राहायला तयार झाली. तेव्हाच पोटात खड्डा पडून जाणवलं, माझी छकुली आता मोठी झाली. तिच्या काळजीने कित्ती रात्री न झोपता घालवल्या ते फक्त देवालाच माहीत!! ती रुळलीही तिकडे, पण आपल्याला किती कठीण गेलं होतं तेव्हा, ती नसलेल्या घरात रुळणं!!
तशी सुट्टी मिळाली की लगेच घरची गाडी पकडायची, पण तिच्या सहवासात दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. कितीही राहिली तरी कमीच वाटायचं आपल्याला. परत जाताना जीव नुसता तुटायचा. किती रडायला यायचं, आणि ती म्हणायची, आई मी सासरी नाही चालले. वेळ आहे खूप अजून. उगीच सारखं सारखं रडून पाणी संपून जाईल ना डोळ्यातलं, सासरी जाताना हसत बसशील हं मग.
शिक्षण संपतय तोच लगेच जॉबही मिळाला, तरी तिला म्हटलेलं थोडं थांब ना, एवढी काय गडबड आहे नोकरीची?
अडकून नको ना घेऊ लगेचच. इथे घरी रहा ना अशीच काही दिवस…….
ऐकेल तर खरं ना, सगळ्याची घाई नुसती. आता तर काय लग्नही ठरवून बसली.
आपण तर विचारही केला नव्हता, तिच्या लग्नाचा इतक्यात. सव्वीसनंतरच सुरुवात करायचं ठरवलेलं, हल्ली होतात उशिरा लग्न. तेवढीच जरा जास्त काळ फक्त आपलीच राहिली असती ना ती!!
पण जितकं जास्त ज्याला आपण थोपवून धरू पाहतो, तितकं जास्त गतीने ते निसटून जाऊ पाहतं, असं म्हणतात तेच खरं आहे.
आता लग्न करून परदेशातच जाणार म्हटल्यावर उडत्या भेटींची सुद्धा मारामार होणार. पुढचंही आयुष्य असंच वाट पाहण्यातच घालवावं लागणार वाटतं!!
कधी शिक्षण म्हणून, कधी नोकरी म्हणून अन् आता काय तर लग्न म्हणून; पोरीचा सहवास काय मनाजोगता मिळालाच नाही आपल्याला.
आपल्यातूनच निर्माण झालेला आपल्या हक्काचा जीव आपल्याच वाट्याला असा कधीमधी ओझरता यावा, हे असं का बरं?
छे, माझीच पोरगी अन् मलाच नाही मिळाली, खरंच मला हवी होती तेवढी नाहीच मिळाली कधी ……….
सुखदाला आज भरून येणाऱ्या मनाला, आणि डोळ्यांना आवरावसं वाटतच नव्हतं, तिची वेडी माया अतोनात दाटून येऊन डोळ्यांतून एकसारख्या धारा पाझरवतच होती……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल