वेदांगी, तिची मम्मी म्हणाली, काय झालं ग माझ्या बुंदीला??
तुझीच तर आहे मी!!
हो पण बाळ आलं की तू त्या बाळाची होणार ना?? माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीस!, बुंदी रुसून म्हणाली.
नाही ग, कोण काही परत बोललं का तुला?, वेदांगी त्रासून म्हणाली.
आपल्या बाजूच्या आजी म्हणाल्या, आता तुमच्याकडे बॉय येणार, मग तो आला की तुझी मम्मी तुझ्याकडे लक्षच देणार नाही.
वेदांगीला खूप वाईट वाटले. लोकं तरी कशी असतात ना?? एकतर पहिली मुलगी म्हणून दुसरा बॉय होणार, हे त्यांचं तेच ठरवतात, आणि वरून लहान पोरीला काहीही सांगतात.कोणाकोणाची तोंड दाबायची पण?? वेदांगीला खूप वीट आला होता या सगळ्याचा.
अगदी मागच्याच आठवड्यात ते तिघे फॅमिली फंक्शनला गेले होते, तिथेही बुंदीला एक काकू अशाच म्हणाल्या होत्या.आता काय घरात दुसरं बाळ येणार, आणि तुला भाऊ आला तर मम्मी त्याचेच लाड करणार फक्त. बुंदी बिचारी एवढंस तोंड करत सांगत आली म्हणून, वेदांगीने हटकलं तरी त्या काकूंना……
वेदांगीला वाटायचं, का ही लोकं त्यांचे तेच ठरवून मोकळे होतात, काय होणार ते?? आणि छोट्या मुलांना असं सांगून त्रास का द्यावा वाटतो. काय मिळतं त्यांची मनं कलुषित करून??
भले मस्करी करत असतील, पण असली?? मुलं तेच धरून ठेवतात ना मग!!
आणि उगाचच कशात काही नसताना त्यांच्या डोक्यात नवीन बाळ यायच्या आधीच त्याच्याबद्दल आकस निर्माण होऊन बसतो.खरंतर अगोदर त्यांनाच सोबत हवी असते म्हणून ते मागे लागतात, आपल्या घरात पण छोटा बाबू आणा ना म्हणून. आणि नंतर लोकं मात्र त्यांचे नको ते बोलून कान भरतात.पुढे जाऊन हिच मुलं मग आपल्या छोट्या भावंडांना त्रास देत बसतात. वेदांगीने अशी बरीच उदाहरणं ऐकली होती.
आणि आपल्या घरात तिला त्याची पुनरावृत्ती नको होती. म्हणूनच एक दिवस तिने बुंदीला जवळ बोलावलं. आणि विचारलं, बुंदी तुला तुझ्या दोन डोळ्यांपैकी कुठला डोळा जास्त आवडतो ग??
बुंदी म्हणाली, मला माझे दोन्ही डोळे खूप आवडतात.
वेदांगी म्हणाली, तरीपण सांग ना? एक कुठला तरी सांग पाहू?
बुंदी म्हणाली, मम्मी दोन्ही डोळे माझेच आहेत ना, मग एक कसा सांगू, मला दोन्ही आवडतात.
बरं मग हात सांग, कुठला तरी एकच हं!!, वेदांगी तिचे हात हातात घेऊन म्हणाली.
नाही बाबा, मला दोन्ही हात आवडतात, बुंदीला आता मज्जा वाटत होती.
तू एक सांग, मग आपण त्याला थोड्या वेळ बांधून ठेऊ, आवडत नाही म्हणून, वेदांगी म्हणाली.
एका हाताने मला काय जमणार? नको मला दोन्ही हात हवेत, मला दोन्ही आवडतात बाबा, बुंदी झटकन म्हणाली.
हो ना, तशीच मम्मीला पण दोन मुलं असतील तर दोन्ही तितकीच आवडतात, दोन्ही तिचीच असतात ना? तुला कसं दोन्ही डोळ्यातला एक डोळा निवडता येत नाही, दोन्ही हातातला एक हात निवडता येत नाही, तसंच अगदी.
कोणत्याच मम्मीला दोन मुलांत फरक करता येत नाही. कळलं?? जेव्हा बाहेर तुला कोणी चिडवतं ना, तेव्हा त्यांना आपण दटावून सांगायचं, असं कधी नसतंच मुळी!! माझी काय कुठलीच मम्मी असं कधी करणारच नाही.
आणि नाही ऐकलं त्यांनी, तर मी तुला विचारलं ना ते बिनधास्त विचारायचं, मग बघ कशी त्यांचीच फट्फजिती होईल ते!! मला सांग, तुला तरी वाटतं का ग खरंच तुझी मम्मी तुझ्याकडे पाहणार नाही?, वेदांगी म्हणाली.
बुंदी जोरात ओरडून म्हणाली; मुळीच नाही, माझी मम्मी असं कधी करणारच नाही.
वेदांगी म्हणाली, मग आता मुळूमुळू रडायचं नाही बरं का?आपल्याकडे बाळ येणार आहे ना, आपली कामं किती वाढतील माहितीये का? मला एकटीला काय जमणार? तुझी खूप मदत लागेल बरं का मला!! दोघी मिळून त्याचं सगळं करू आपण, चालेल ना??
बुंदी नाचतच म्हणाली, हो चालेल मम्मी!! मी बाळाचं सगळं करणार, तर मला खूप खूप मज्जा येणार!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
फेसबुक पेज- हल्ला गुल्ला
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...