विराज एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आठवीत शिकणारा मुलगा. एकुलता एक असल्याने आईवडिलांचा जरा जास्तच लाडका. घरी तिघेच. आई वडील दोघेही नोकरी करणारे.
सकाळी जाणार ते रात्री सात कधी आठ नंतरच घरी.
कधी ऑफिसच्या टेन्शनमुळे कधी घरातल्या कामावरून बरेचदा दोघांची चिडचिड व्हायची. एकमेकांशी खटके तर रोजचेच. कधी थोडक्यात आवरायचे, कधी मात्र दोघांचाही तोल सुटायचा. विराज मात्र भांभावून जायचा. कधी एकटाच रडायचा. तो नका भांडू म्हणून म्हणायचा, पण आवेशात आई वडिलांचे लक्षच नसायचे.
विराजची शाळा सकाळची, साडेबाराला सुटली की पूर्ण दिवस मोकळा. लहानपणापासून तो पाळणाघर सांभाळणाऱ्या मावशींकडे असायचा त्यांच्या घरी. मग आई येताना त्याला घेवून येई. सहावीपर्यंत अगदी हाच कार्यक्रम होता.
नंतर मात्र त्याला तिथे जायचा कंटाळा येऊ लागला.
मी आता मोठा झालो मी घरी राहीन , असे म्हणत तो शाळेतून घरीच यायला लागला.
आई बाबा अधून मधून फोन करत रहायचे. तसे लक्ष ठेऊन असायचे. त्याचे सर्व लाड करायचे. पाहिजे ते घेऊन द्यायचे, कुठे कुठे फिरायला न्यायचे.
पण घरी दोघांचे या ना त्या कारणावरून भांडण ही चालूच असायचे.
मोठा होता होता विराज त्यापासून अलिप्त राहू लागला. त्यांच्या मधे पडणं सोडून दिलं त्यानी.
अशीच एकदा त्याची आई कामावरुन येत असताना, बाजूच्या काकूंनी विचारलं, काय हो विराज आजारी आहे का?
आई म्हणाली, नाही काय झालं हो ??
काकू म्हणाल्या, चार दिवस झाले शाळेतून लवकर येताना दिसतोय, तुम्ही गेलात की अर्ध्या तासात घरी येतो.
विराजच्या आईला धक्काच बसला. मी बोलते त्याच्याशी असे म्हणून ती घरी आली.
तिला काय करावे सुचेना. तरी तिने विराजला विचारले, तू ठिक आहेस ना??? काही होत नाही ना??
विराज म्हणाला, काही होत असते; तर सांगितले असते मी.
त्याची आई विचार करत बसली. विराज थोडा एकलकोंडा झाला होता खरा. चिडचिडही करायचा बरेचदा. तिला वाटायचे तो मोठा होतोय, शरीरातल्या बदलामुळे असेल.
मग तिने दुसऱ्या दिवशी रजा घेऊन विराजच्या शाळेत जायचं ठरवलं. काय ते नक्की बघू मगच त्याच्या बाबांशी बोलू असा तिने विचार केला.
नेहमीप्रमाणे विराज आवरून शाळेत गेला. मधल्या सुट्टीच्या वेळेत आई शाळेत गेली.
वर्गशिक्षक भेटायला आल्यावर मात्र त्यांनीच कानऊघाडणी सुरु केली. केव्हापासून आम्ही शाळेत बोलावतोय, तुम्हाला निरोप मिळाला नाही का??
काही काळजी नाही का तुम्हाला?? बरं तुमचा मुलगा कुठाय,चार दिवस झाले शाळेतही येत नाहीये.
आता मात्र विराजच्या आईला काय बोलावं ते सुचेना.
शिक्षकच पुढे बोलले, अहो तुमचा मुलगा नशा करतो, माहित आहे का तुम्हाला??
काय बोलताय तुम्ही, असं कसं करेल तो?? विराजची आई रागात म्हणाली.
म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलावणं पाठवलेलं. विराजने निरोप दिलाच नाही वाटतं तुम्हाला…..
घरी काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या???
तुमचा मुलगा रुमालावर फेवीक्वीक टाकून हुंगत बसतो. अभ्यासातूनही लक्ष पार उडालय त्याचं.
आमच्या शिक्षकांच्या दक्षतेमुळे त्याच्यासारखीच काही मुलं असली नशा करताना सापडलीयेत. त्यांच्या दप्तरात व्हाइटनर, स्टिकफास्ट, फेवीक्वीक, आयोडेक्सच्या बाटल्याही सापडल्यात.
एमडी, गांजा, कोकेन, चरस एवढ्यानेच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टींचा उपयोग होतो नशेसाठी. आपल्यापेक्षा या मुलांनाच जास्त माहिती. लक्ष ठेवा मुलांवर, तुम्ही पैसे देता खाऊ घ्यायला, मुलं काय करतात बघा. सतर्क राहणं सर्वात गरजेचं आहे, वाईट नाद लागायला आणि वाढायला वेळ लागत नाही. या साध्या वाटणाऱ्या नशेचं रूपांतर पुढे जीवघेण्या नशेतही होऊ शकतं.
बघा समजावून त्याला नाहीतर समुपदेशकाची, लागली तर डॉक्टरांची मदत घ्या, पण वेळीच आवरा त्याला.
विराजच्या आईला तर आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.
घरी येऊन मात्र तिला राहवलं नाही, एवढ्या वेळ आवरून धरलेलं स्वतःला. आता तिने अगदी मनसोक्त रडून घेतलं.
पोरगा घरी एकटाच असतो, काही लागलं तर पैसे असावे जवळ, म्हणून त्याच्यासाठी पैसे ठेऊन जायची.
पण तो असं काही करत असेल हे ध्यानीमनी देखील नाही आले तिच्या.
तिने विराजच्या बाबांना फोन करून सर्व काही सांगितले, बाबांनाही ऐकून धक्काच बसला. संध्याकाळी त्याच्याशी बोलू मी येतो लवकर असे बोलून त्यांनी फोन ठेवला.
तेवढ्यात विराज दाराचे लॅच उघडून आला आणि आईला घरात पाहून चपापला.
विराजने पोटात दुखतंय म्हणून घरी लवकर आलो असं सांगितलं. तिही काही बोलली नाही.
पण आतून धुमसत होती ती नुसती, तिला वाटत होतं आत्ता समोर बसवावं त्याला आणि विचारावं, काय चुकलं रे आमचं, का वागतोयस असा? काय कमी पडलंं रे तुला??
पण ती गप्प राहून स्वतःचीच चूक शोधू लागली.
तिला आपलच दुर्लक्ष होताना दिसलं, नोकरी सांभाळण्याच्या नादात पोरगं बाजूला पडलं का??लहानपणी पाळणाघरात सोडताना कित्ती आकांडतांडाव करायचा, एवढसं तोंड व्हायचं त्याचं, पण मी ही कुठे आनंदाने सोडायचे त्याला, जीव माझाही तुटायचाच की.
मग त्यांचं भांडण सुरू असताना केविलवाणा होणारा विराजचा चेहरा नजरेसमोर आला. त्याच्या विनवण्या दिसल्या. त्याला सर्व पुरवतोय म्हणजे तो नक्कीच खुश असेल, हा भ्रम होता आपला. चूक आपलीच होती हे तिला आता कळून चुकलं.
कळत नकळत बरंच काही घडलं होतं………..
विराजचे बाबा आल्यावर तिने सारा प्रकार त्यांच्या लक्षात आणुन दिला.
आपण त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती न करता, त्याच्या कलेने घेऊया, त्याला आपल्या आधाराची गरज आहे, उत्तरं तर मिळालीच आहेत आपलीच आपल्याला सारी. चूक त्याची एकट्याची नाही. जे झालंय ते आता सर्वांनी मिळून सावरूया. त्याचा आधार बनुया, त्याला योग्य दिशा दाखवुया असं त्यांनी ठरवलं.
दोघांनी त्याला जवळ बोलावून घडलेला सारा प्रकार सांगितला. विराज घाबरला, त्याला वाटलं आता काही खरं नाही आपलं. पण आईने त्याला जवळ घेतलं आणि त्याला एकटं पाडल्याबद्दल त्याची माफी मागितली. बाबांही पुन्हा असं होणार नाही म्हणाले.
मग विराजही थोडा मोकळा झाला, आईच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागला. तुम्ही माझं काहीच ऐकायचा नाहीत, मला नाही आवडायचं तुम्हाला भांडताना पाहुन. खूप खूप भीती वाटायची. मग माझ्या मित्राने सांगितलं, असं केलं की एकदम शांत शांत वाटतं, खरंच मला त्यात गुंगायला आवडायला लागलं. त्याने सारी कबुली दिली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही हेही सांगितलं.
पण त्याच्या आईबाबांनी एवढ्यावरच न थांबता योग्य समुपदेशकाची मदत घेतली. फक्त विराजसाठीच नाही तर स्वतःसाठीही. समुपदेशनाची गरज त्यांनाही होती. विराजला नशेतून कायमचं मुक्त करणं गरजेचं होतं. त्यासाठी भोवती मुख्यत्वे घरी उत्साही वातावरण हवंच. समुपदेशक चहू बाजूनी विचार करून योग्य शब्दात मार्गदर्शन करतात, त्याचा परिणाम दिसू लागला. विराज मधेही आणि त्याच्या आईबाबांमधेही !!!
कुटुंबाची घसरलेली गाडी रुळावर आली.
विराजच्या आईबाबांनी शाळेतल्या शिक्षकांचे पहिल्यांदा जाऊन आभार मानले. हल्ली शाळेत काही शिक्षकांचे लक्षच नसते, पुर्वी सारखे शिक्षक राहिले नाहीत असं आपण सहजपणे म्हणतो, पण इथे तर त्यांच्याच सतर्कतेमुळे एक कुटुंब सावरलं.
आता तर विराजही अशा मुलांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढायला शिक्षकांना मदत करू लागला.
त्याला तर लहान वयातच अनपेक्षितपणे एक नवीन उद्दिष्ट मिळालं………
खरंच आपलं थोडंस दुर्लक्ष मुलांना कोणत्या वळणावर आणून सोडेल, याची आपण कल्पनाही नाही करू शकत.
ही स्वस्तातली नशा अल्पवयीन मुलांसाठी घातक ठरत चालली आहे. अगदी गरीब वस्तीतलीच नाही तर मध्यमवर्ग, उच्च वर्गातील मुलेही या जाळ्यात अडकली आहेत. कुठल्याही दुःखावर तात्पुरती फुंकर मारायचे काम करते ही नशा. असल्या नशेसाठी लागणाऱ्या गोष्टी रोजच्याच वापरातल्या असल्याने संशयाचा देखील प्रश्न नसतो. वेळीच सावरलं तर ठिक पण नंतर मात्र अशा कुठल्याही नशेतून मुलांना बाहेर काढणे मुश्किल होते.
ज्याचं घर हसतं खेळतं आहे, मुलांना पालकांचा भावनिक आधार आहे, मुलांना त्यांच्या आवडीनुसार फुलण्याचं स्वातंत्र्य आहे; ती मुलं काही अशा कोणत्याही नशेच्या वाटेला नक्कीच जाणार नाहीत.
हो ना???
©स्नेहल अखिला अन्वित
त्यात नेमका फाल्गुनमास
Lalit lekhan - ललित लेखन मी किनई 'रोज नवा नाष्टा हवा' या माझ्याच मुलांच्या मागणीअंतर्गत साधारण मला जमू शकतील अशा...