मिता आणि मानसचं लग्न झालं तेव्हा मिता एका चांगल्या कंपनीत नोकरीला होती. पगारही चांगला होता.
सकाळी नोकरीला जाताना सर्व काम केलं आणि आल्यावर देखील न कंटाळता काम करत राहीलं, तर सासूला तिचा काही प्रॉब्लेम नव्हता.
मिता सासुला खूष ठेवायचं म्हणूनच नाही तर झेपतय तोवर करायला काय हरकत आहे म्हणून निभावून नेत होती.
घरातले सर्वजणच कामाला जात होते. सासू-सासऱ्यांच्या रिटायरमेंटलाही अवकाश होता. घरात डोक्याला डोकी लावायला कोणी नसायचंच. त्यामुळे तसं काही वाईट चाललं नव्हतं मिताचं.
दोन वर्ष अशीच गेली, आणि मिताकडे गुड न्युज आली. मिता आणि मानस खूप खुश झाले. सासू-सासऱ्यांना देखील आनंद वाटला. सर्वजण तिची काळजी घेऊ लागले. प्रेग्नंसीचा जास्त बाऊ न करता योग्य ती काळजी घेऊन ती अगदी नवव्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कामाला जात होती.
प्रवास काही बस, ट्रेनचा नव्हता, रिक्षाने ती आरामात पोचू शकायची आणि रिक्षावाले पण समजूनच चालवायचे. त्यामुळे तिला तसा काही त्रासही झाला नाही.
नववा महिना भरतोय तोच गोंडस बाहुली त्यांच्या घरी दाखलही झाली.
मिता अगदी मनापासून तिच्या संगोपनात रमून गेली. बघता बघता तीन महिने झाले, तसे सासू-सासरे आडून आडून पाळणाघरं सुचवायला लागले. ते दोघेही नोकरी करत होते. त्यांची मुलं ही पाळणाघरातच वाढली होती, म्हणून त्यांना आता मितानेही काम सुरू करावं असं वाटत होतं.
बाहुली तर अंगावरचं दूधच पित होती, मिताला एवढ्याश्या तिला कुणा दुसऱ्याच्या आधारावर सोडण्याची कल्पना देखील सहन होत नव्हती.
तिनेही अडून अडून सहा महिन्यांशिवाय मी विचार करणार नाही असंच त्यांना सुचवलं.
सासू-सासऱ्यांना वाटायचं एवढं काय ते कौतुक, आम्ही नाही का सोडलं आमच्या मुलांना, वाढलीच की ती.
पण मिताला आपल्या डोळ्यासमोर बाहुली वाढताना बघायची होती. एक क्षणही नजरेसमोरून घालवावसं वाटत नव्हतं तिला. त्यात बाहुली दिवसभर झोपून पूर्ण रात्र जागी असायची. मिताची रात्रीची झोप व्हायचीच नाही. रात्री जागी असते माहीत असूनही सासू, ती घरीच असते दिवसभर म्हणून तिच्याकडून सकाळी लवकर उठून मदतीची अपेक्षा ठेवायची.
एवढ्या सगळ्यात नोकरीचा विचारही मिताला नको वाटत होता. मानसचाही तिला सपोर्ट होता. तोही त्याच्या आईवडिलांना सांगायचा, जाईल ती नंतर.
सहा महिने झाल्यावर मात्र घरच्यांच्या विरोधी नजरा बघून ती दोन-तीन पाळणाघरं पाहून आली. पण आपल्या काळजाच्या तुकड्याला तिथे ठेवायचा धीरच झाला नाही तिला. शिवाय बाहुलीच्या तोंडात साधं गायीचं दूध घातलं तर तीही बह्हादरीण फुsर्फुsर करून काढून टाकत होती. बाटली तर तोंडाला लावतच नव्हती.
मिताचा जीव अडकत होता, तिला असं टाकून जायला.
शेवटी तिने मानसला स्पष्ट सांगूनच टाकलं, मी नाही जाऊ शकत, आपल्याला पैशाची एवढी गरज तरी आहे का? माझ्या मागे का लागतायात सर्व? माझ्या करियरचं काय ते मी बघून घेईन नंतर.
माझं मन नाही होत, बाहुलीला सोडून जायचं.
मानसलाही तिच्या भावना कळत होत्या. शिवाय त्याचेही आई-बाबा त्याला पाळणाघरात सोडून कामाला निघून जायचे, त्याच्या काही कटू आठवणीही होत्या. त्यालाही वाटत होतं, आपल्या बाहुलीला ते प्रेम मिळावं. कुणीतरी आपलं तिच्याबरोबर सतत असावं. मी पाळणाघरात वाढलो तसं कोरडं प्रेम नको माझ्या बाहुलीला मिळायला.
मिता आणि मानस सोडून सगळ्यांना ती एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी वाऱ्यावर सोडून घरी बसलीये ते काही पटत नव्हतं.
बाळाला भेटायला येणाऱ्या बरेचजणांचा पहिला प्रश्न हाच असायचा, काय मग कधी जॉईन होणार?
सासूबाई घरी असतील तर सुरू व्हायच्या, हो ना आम्ही पण तेच सांगतोय, नंतर बाळ सोडणार नाही, एकदा आईची सवय लागल्यावर.
ही तेवढ्यापुरतं हो हो करायची. चाललाय विचार बघू कसं जमतं करून सोडून द्यायची. पण मनात म्हणायची, बाळ सोडायचा प्रश्न जाऊ दे, इथे मलाच बाळाला सोडवत नाहीये.
मला माझ्या मुलीचं बालपण अनुभवायचयं, ती कधी पालथी पडते, कधी बसते, कधी रांगते, कधी उभी राहते, कधी पहिला शब्द बोलते, ते सारं या डोळ्यात साठवायचयं.
सध्या तरी मला हे जास्त गरजेचं वाटतय, नोकरीपेक्षा. बरं तशी काही अडचण असती तर जीवावर दगड ठेऊन एकवेळ केलीही असती नोकरी.
सगळ्यांना का पडलंय एवढं माझ्या नोकरीचं कुणास ठाऊक??
हळूहळू बाहुली मोठी होऊ लागली, बघता बघता दोन वर्षाचीही झाली. जरा आई नाही दिसली की सैरभैर व्हायची. आता सासू-सासरेही वरचेवर बोलायला लागले होते, एकटं राहण्याची सवय करा तिला. सारखं काय आई आई.
जरा ठेऊन बघायचं दुसरीकडे थोड्यावेळ. त्यांच्या बोलण्याचा रोख मिताला चांगलाच कळत होता.
सर्वांनी पैसे कमवायचं मशीन बनलच पाहिजे, ही मानसिकता काही त्यांना शांत बसू देत नव्हती.
मिता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची. तिलाही आता या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून काहीतरी करावं वाटत होतं. कारण त्याशिवाय कोणाची तोंडं बंद होणार नव्हती. पण घरात बसून नेमकं करायचं तरी काय हे तिला सुचत नव्हतं. त्यात बाहुली झोपेल तोच वेळ फक्त तिचा होता. त्यातून मोठी होता होता बाहुलीची झोपही कमी होऊ लागली होती.
कॉलेजमध्ये असताना मिता सुंदर कविता करायची, पण कॉलेज संपल्यावर मात्र सारंकही सुटून गेलं होतं.
तिने विचार केला, सध्या काही नाही तर लिहावं तरी!!
तशी तिने बाहुलीच्या पहिल्या वाढदिवसाला छानशी कविता केलेली, मानसने मोठ्या कौतुकाने ती मोठ्या बोर्डवर प्रिंट करून हॉलच्या मध्यभागी लावली होती. सर्वांनी खूपच कौतुक केलं होतं मिताचं!!
मग तिने पुन्हा छोटासा प्रयत्न म्हणून एक चारोळी लिहीली, आणि फेसबुकवर सहज म्हणून टाकून दिली.
तिची अपेक्षाही नसताना, तिच्या लिस्टमधल्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या.
तिला पूर्वीपासून ओळखणाऱ्या मैत्रिणींनी तू आता पुन्हा लिहायला घेच म्हणून हक्काने गळ घातली.
खूप छान वाटलं तिला. प्रोत्साहन तर भरपूरच मिळालं होतं.
कधी आपल्या बाहुलीवर, तर कधी सभोवतालच्या गोष्टींवर, सुचेल त्यावर कविता करून ती पोस्ट करायला लागली.
लहानपणापासून तसं तिचं वाचन अफाट झालेलं. शब्दांची काही कमी नव्हतीच तिच्याकडे. शब्दातील वेगळेपण आणि त्यांची लक्षवेधी गुंफण यामुळे तिच्या कवितेला दाद देणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली.
हळूहळू ती नावाजू लागली. तिच्या सासु- सासऱ्यांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती. त्यांचं आपलं ही कामधंदे सोडून पोरीला धरून बसलीये, म्हणून टोमणे मारणं चालुच होतं.
फोनवरून सुद्धा खास जोर देऊन सांगितलं जायचं, हो घरीच आहे अजून!!
खरंतर तिला सगळ्यांना ओरडून सांगावं वाटत होतं, हो आहे मी माझ्या बाळासाठी घरी, काय प्रॉब्लेम आहे कोणाला?
पण वेळ सगळ्याचं उत्तर आपणहून देईल म्हणून ती गप्प बसायची.
माझेही दिवस येतील, असं तिला खात्रीने वाटायचं.
पुढे फेसबुकवर पोस्ट करण्याबरोबर ती प्रख्यात वर्तमानपत्रांना पण आपल्या कविता पाठवायला लागली. त्यातल्या काहींमध्ये त्या छापूनही येत होत्या. नवऱ्याशिवाय मात्र कोणाला काही कौतुक नव्हतं त्याचं.
त्यातल्याच एका वर्तमानपत्राने मात्र तिची प्रतिभा बघून तिच्याकडे जुन्या जाणत्या कवींच्या कवितांचे रसग्रहण करून, हल्लीच्या पिढीला त्याची ओळख व्हावी, या हेतूने एक कॉलम तिला लिहायला दिला, आणि मिताच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली.
त्यासाठी तिला त्या कवितांचा अभ्यास करावा लागणार जरी असला तरी तिच्या ज्ञानातही भर पडणार होती.
मानधनही उत्तम होतं, प्रसिद्धीही मिळणार होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या सोयीनं काम करायला मिळणार होतं.
मानसला तर आपल्या बायकोचा खूप अभिमान वाटला.
अगदी उत्साहाने त्याने आपल्या आई-वडीलांना सांगितलं. पण आपल्याकडे यश मोजण्याची पद्धत मुख्यत्वे पैसा हिच असल्याने त्यांना त्याचं एवढं काही वाटलं नाही.
पुढे दोनच महिन्यांनी नवीन वर्षाच्या नवीन पुरवणीत मिताचा कॉलम तिच्या फोटो सकट झळकला आणि दोघांच्याही जवळच्या दूरच्या सर्व नातलगांचे फोन अभिनंदनासाठी येऊ लागले. प्रत्येकजण तिचं कौतुक करत होता, आणि घरातल्या सर्वांचं अभिनंदन!!
सर्वांचा समज होता घरच्यांनी प्रोत्साहन दिलं असेल म्हणूनच हा पल्ला गाठला असेल तिने!!
मिताने मात्र प्रत्येकाच्या बोलण्याला फक्त हो ला हो केलं, आणि जिच्यामुळे हा दिवस दिसला, त्या बाहुलीचा गोड पापा घेऊन तिला मनापासून “थँक्यू” म्हटलं……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल