तन्वी दहावीच्या प्रिलीयमचा रिझल्ट घेऊन आली, तशी हुंदके देत देत रडायलाच लागली.
मेघा हातातलं काम सोडून तिच्याजवळ गेली, आणि काही न विचारताच फक्त तिला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवू लागली.
आई जवळ आली तसं तन्वीला आणखी जोरात रडायला आलं, रडतच ती आईला म्हणाली, बघ ना किती कमी मार्क पडलेत, मला चांगल्या मार्कांची अपेक्षा होती ग. आताच असं तर बोर्डाच्या परीक्षेत काय होणार?
माझा सगळा कॉन्फिडन्सच हलायला लागलाय आता.
मेघाने तिच्या मार्कवरून नजर फिरवली, आणि म्हणाली काय ग चांगले तर आहेत मार्क्स!! उगीच रडते आपली.
नाही ग आई…. मी जेवढा अभ्यास केला तेवढे नाहीत, आणि तुम्हाला कितीही पडले तरी चांगलेच वाटतात. पण माझी माझ्याकडूनच अपेक्षा होती ना काही?
सोड ग, कसलंही टेन्शन घेतेस तू तन्वी. आम्हाला माहीत आहे तू हुशार आहेस, हे मार्क्स आमचा तुझ्यावरचा विश्वास नाही घालवू शकत. आणि तू ही नको जास्त विचार करू. तसेही प्रिलीयमला जरा स्ट्रिक्ट चेकिंग होतच.
एवढं सांगूनही तन्वी नाराजच होती दिवसभर. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर त्याने तिला सहजच काय मग, काय म्हणतेस? एवढं विचारलं, अन् परत तिला आपले मार्क आठवून रडायला आलं.
मेघा म्हणाली, उगीच मनाला लावून घेतलंय वेडीने. आपण मार्कांची विचार तरी करतो का रे जास्त? हिनेच स्वतःच्या अपेक्षा वाढवून ठेवल्यात आणि आता सकाळपासून मूड ऑफ करून बसलीये स्वतःचा. धड जेवलीही नाही दुपारी.
एवढं बोलून मेघा तिची समजूत काढायला गेली तर तन्वीला झोप लागली होती. थोड्या वेळाने जेवायला उठवलं तरी उठली नाहीच.
पुढचे दोन दिवस असेच गेले. तन्वी नाराजच होती. अभ्यासही करत नव्हती आणि फारशी बोलतही नव्हती.
एरवी न सांगता स्वतःहून अभ्यास करणारी मुलगी पुस्तकाला हातही लावत नाही म्हटल्यावर मेघा थोडी धास्तावलीच. तिनेही काही फोर्स केला नाही.
पण तिच्या मनात सुप्त रितीने एक भीती शिरलीच.
पोरगी काय बरं वाईट तर करून घेणार नाही ना जीवाचं?
त्यात तन्वीचा बाबासुद्धा सकाळी जाताना तिची काळजी घे असं कधी नव्हे ते बोलला. त्याने मेघाच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडली.
त्यात नेमका त्याचवेळी तिला, मागच्या वर्षी तिच्या मैत्रिणीच्या बिल्डिंगमध्ये बारावीच्या रिझल्ट नंतर निराशेने जीव घालवलेल्या मुलीचा किस्सा आठवला. नको त्या गोष्टी नको त्या वेळी बरोब्बर मनात येतात. इतके दिवस विसरलेले मी ही गोष्ट, आज कशी लक्षात आली कोण जाणे?
त्यानंतर पुन्हा थोड्यावेळाने मेघाला पेपरमध्ये वाचलेल्या सुसाईडच्या बातम्या एकेक करून डोळ्यासमोर यायला लागल्या.
मेघाच्या मनावर भीती हळूहळू कब्जाच करायला लागली.
ती तन्वीला जास्तीत जास्त जपू लागली. थोड्या थोड्या वेळाने तन्वीला तुला बरं वाटतय ना, काळजी करू नको आम्ही आहोत, टेन्शन घेऊ नको असं, सांगायला लागली.
याअगोदर ती बिनधास्तपणे तन्वीला घरी सोडून आपली कामं करायला बाहेर पडायची. पण आता तन्वीला एकटं सोडायची तिला भीती वाटू लागली.
संध्याकाळी तिला लायब्ररीत पुस्तक बदलायला आणि थोडा बाजारहाट करायला जायचं होतं.
ती तन्वीला म्हणाली, चल पण दोघी जाऊ. छान फिरू येऊ.
पण तन्वीला मूड नव्हता. ती म्हणाली, तू जाऊन ये आई, मला नाही यायचं.
पण मेघाला तिला सोडून जाववत नव्हतं, भीती होती ना?
ती म्हणाली, तन्वी तू येशील तरच मी जाईन.
तन्वी म्हणाली, आतापर्यंत तर तू फिरायचीस की? हे काय नवीन?
मेघाला काय ते सांगताही येत नव्हतं. तिने तिचा प्रोग्रॅमच कॅन्सल करून टाकला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मेघाची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती. मेघाला जाणं भागच होतं.
मेघाने तन्वीला प्रेमाने,थोड्याश्या रागाने समजावून पाहिलं, तू आलीस तर बरं वाटेल मला वगैरे बोलून पाहिलं. तन्वीने तिचा हेका सोडलाच नाही.
मेघा मनात धाकधूक घेऊनच कशीबशी बाहेर पडली. बाजूच्या आजींना जरा मध्ये तिच्याकडे बघायला सांगितलं मात्र आठवणीने.
डॉक्टरकडेही अपॉइंटमेंट होती तरी अगोदरच्या पेशंटने थोडा जास्त वेळ लावला, आणि मेघाला नुसतं बैचेन बैचेन झालं. शरीराने ती तिथं होती फक्त. तसा पोचल्यावर तिने एकदा फोनही केला होता तन्वीला. तिने तो उचल्यावर हिच्या जिवात जीव आला खरा.
डॉक्टरकडून निघाल्यावर क्षणभरही इकडे तिकडे न थांबता तिने घर गाठलं.
नेहमीप्रमाणे एकदा बेल वाजवली. तन्वीने दरवाजा उघडला नाही. हिची धडधड सुरू झाली. दोनदा वाजवली तरी उघडला नाही. आता तर ती धडधड तिला स्वतःलाच स्पष्ट ऐकू येईपर्यंत वाढली. तिसऱ्या बेलला जेव्हा तिने दरवाजा उघडला नाही तेव्हा, ती पटकन् खिडकीत पळाली, आणि तन्वीच्या नावाने ओरडू लागली. घर ग्राऊंड फ्लोअरवरच होतं म्हणून नशीब!!
खिडकीतून तसं मनात आलेलं काहीच दिसत नव्हतं.
तन्वीss तन्वीsss उघड ना दार…….
मेघाला वाटलं, भीती होती ते शेवटी झालं की काय?
छे, जायलाच नको होतं आपण………
अगं तन्वी, उघड ना दार……नको मला त्रास देऊ ग.
पाच मिनिटं गेली, तरी तन्वी दार उघडेना. मेघाचा जीव जायचा बाकी राहिला होता आता.
तिला काही सुचेना, तन्वीच्या बाबांना फोन करायला म्हणून फोन बाहेर काढला. तर हाताबरोबर तोही थरथरत होता.
नुसता कानाला लावला, नावावर क्लिक करायचं देखील विसरली ती.
तेवढ्यात हिचा एवढा गोंधळ ऐकून तन्वी एकदाची खिडकीशी आली आणि म्हणाली, होs होs, दम आहे की नाही तुला आई?
तन्वीला बघून मेघाच्या जीवात जीव आला एकदाचा.
हुश्श् ss पोरगी सुखरूप आहे तर.
तिने दार उघडलं तशी, मेघा तिला मिठी मारून रडू लागली.
अगं आई, माणसाने नैसर्गिक विधीला पण जाऊ नये का आता?
नुकतीच गेले होते मी आणि तू आलीस, लगेच कशी येऊ?
आणि तुला काय झालं ग? एवढं हायपर व्हायला?
घे पाणी पी. शांत हो.
आई, काय चाललंय दोन दिवसांपासून तुझं?
कसली भीती वाटतेय तुला?
मेघा खोटा आव आणून म्हणाली, नाही ग काही नाही.
आई, तुला काय वाटलं, मला कळत नाहीये का हे सगळं?
जसं तुला माझं सारं कळतं तसं मलाही कळत ग!
ऐक आता नीट, मी काय बोलते ते. तुला वाटत तसं मी काहीही कधीच करणार नाहीये. सर्वात पहिले मी भित्री आहे, हे तर तुला माहितीच आहे. आणि मला जगायला आवडतं. जसं आहे तसं. मरायची उलट भीतीच वाटते मला. असल्या फुसक्या कारणाने तर नाहीच आणि इतर कोणत्याही कारणानेही वेडं वाकडं पाऊल कधीही उचलणार नाही मी. कुठलीही परिस्थिती येवो, मी स्ट्रगल करेन, पण काहीही झालं तरी हार मानणार नाही.
हा, थोडं फ्रस्टेट झाले होते मी, माझ्या मार्कांचा उजेड बघून.
म्हणून काही न करता अभ्यासावर रागवून बसले होते.
दोन तीन दिवस मी दिले स्वतःला, आता पुन्हा मनापासून प्रयत्न चालू करणार आहे मी.
आणि मी जशी तुमच्या जिगरचा तुकडा, आँखोंका तारा वगैरे आहे ना, तसे तुम्हीही माझ्यासाठी सर्वकाही आहात. माझा जीव आहात. तुम्हाला स्वतःहून सोडून जायची कल्पना तर मी कधी करूच शकत नाही. कsळsलं तुला?
प्लिssज, इतकी काळजी करू नको ना ग आई…….!!
तन्वी हे सारं बोलल्यावर मेघाला एकीकडे स्वतःवर हसायलाही येत होतं, अन् एकीकडे पोरीचं इतकं शहाणपण बघून डोळे भरूनही येत होते.
काही न बोलता तिने तन्वीला उराशी कवटाळलं, आणि मनात म्हणाली, काय करू? आईचं काळीज ग, कितीही नाही म्हटलं तरी उगाच नको त्या काळज्या करतच राहतं बरं…………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल