मला आज काय स्वप्न पडलं असेल सांग बघू? मोठ्या लाडाने हाक मारून नवऱ्याने मला विचारलं.
मी म्हटलं, नवऱ्याला स्वप्नात कोणत्या सटवाया दिसतात, हे बघायला फार आवडलं असतं रे मला, पण अजून तरी तुझ्या सुदैवाने अशी दिव्यदृष्टी मला प्राप्त झाली नाहीये……
सटवाई कसली घेऊन बसलीस, त्याहून इंटरेस्टिंग स्वप्न पडलं मला आज!!
अगं, वेगवेगळ्या पदार्थांनी सजलेलं ताट तू माझ्यासमोर ठेवलंस, आणि म्हणालीस नवऱ्याचं प्रेम जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो ना, म्हणून मी तुझ्यासाठी खास हे सगळं केलंय.
अगदी स्वप्नातल्या स्वप्नात सुद्धा मला ते खरं वाटलं नाही ग!!
ह्याs, खोटं आहे सगळं…..असं करतच मी उठलो,
आणि बघ ना खरं नव्हतंच ते……कधी खरं होईल अशी आशाही दिसत नाही.
बायकोच्या हातचा साग्रसंगीत, चविष्ट स्वैपाक खायचा दिवस आमच्या भाग्यात लिहिलाच नसावा असं वाटतंय मला!!
आsहा रे!!
असली स्वप्नं कधीपासून पडायला लागली तुला? मी तर तुला अगोदरच सांगितलं होतं ना, माझं स्वैपाकाशी वाकडं आहे म्हणून, तरीही तू मुद्दामहून मला चिथवावस??
अशी भलती नाटकं तुला सुचतात तरी कशी?? मजा येते ना मला डिवचवून??
जाss, दूर होजा मेरी नजरोंसे…….
आता मंडळी, असतं एखाद्या बाईचं स्वैपाकाशी वाकडं, त्याला काय करणार कोण??
बाईवर उगाच आपला स्वैपाक पाणी करत बसायचा शिक्का मारून टाकलाय.
अजूनही लग्न ठरवताना बऱ्याच ठिकाणी स्वैपाक येतो का विचारलं जातंच, कितीही शिकलेल्या मुलीला. हे मी अगदी जवळून बघितलय, बाई आणि स्वैपाक हे समीकरण अनेकांनी डोक्यात फिट्ट बसवलेलं आहे अगदी.
माझं म्हणाल तर, माझं मन नाही रमत स्वैपाकात. एकतर हाताला काडीची चव नसल्याने जे काही होतं ते फक्त बरं म्हणण्याजोगं असतं. मुलांना आईच्या हातचं सगळंच चांगलं लागतं, किमान सध्यातरी; म्हणून माझं निभावून जातं !!
नवऱ्याला नवीन नवीन दोन महिने सगळं चांगलं लागलं, कुरकुरायला लागला तेव्हा म्हटलं, तू शिक की दोन चार गोष्टी, कदाचित माझ्याहून चांगलं बनवायला लागलास तर तेवढाच आपल्याला चेंज!!
त्याने आपलं तोंड कायमसाठी बंद केलं.
नाही म्हणायला कधीतरी माझंही काही चुकून चांगलं होतं, अगदी खाणारे हाताची बोट सुद्धा चाटतात!! (अफकोर्स त्यांच्याच) तेव्हा मात्र आनंद उरात माझ्या मायेना, असं म्हणत मी नाचतच सुटते.
नवराही आवर्जून सांगतो, बये तुला आज मटका लागला बरं का!!
पण असा मटकेवाला सुदिन सहा महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळेसच उगवतो. बाकी वेळी आपलं जेमतेमच सगळं!!
आता यू ट्यूब वर रेसिप्या बघायचा मला छंद नाही, पण कोण जाणे कसा माझ्या पोराला कुठून लागला. त्याला फार आवडतं रेसिप्या बघायला. आणि मग मम्मी आपण हे करूया अन् ते करूया सुरू होतं.
आपण म्हणजे त्यालाही ते करताना त्यात पुढाकार घ्यायचा असतो. जे करायचं ते त्याच्या अंडर ऑब्जर्वेशन!!
अगदी गॅस कट्ट्याजवळ सुद्धा तो खुर्चीवर उभा राहून मला बिनकामाच्या सूचना देत बसतो.
हाय रे देवा!!
माझा पदार्थ त्याच्या प्रेशरमध्ये येऊन हमखास फसतोच, अगोदरच उल्हास त्यात फाल्गुनमास!!
खूप ऐकलंय की पदार्थ करताना त्यात थोडं आपलं प्रेम घातलं की तो पदार्थ चांगला होतो, आता मला सांगा कुठली आई, आपल्या मुलांसाठी काही करताना त्यात बदाबदा प्रेम ओतणार नाही?
माझ्यासारखी तर असेल नसेल तेवढं सगळं ओतेल, कुणीकडणं एकदाचा पदार्थ चांगला व्हावा. पण छ्याs, आमचा पदार्थ काही केल्या चांगलं व्हायचं नावच घेत नाही.
मला तर बरेचदा हातगुणच वाटतो तो. एखाद्याच्या हाताला इतकी चव असते, त्याने काहीही साधं करा, अतिशय चविष्ट लागतं.
आणि आमच्यासारख्याने काहीही करा, मेलं फिस्कटतचं.
एकदा एका ओळखीच्या काकूंच्या घरी गेले होते, तेव्हा त्या म्हणाल्या, मला स्वैपाक करणं काही फारसं काही आवडत नाही, माझं मन नाही रमत त्यात.
हाsय मला कित्ती बरं वाटलं होतं त्यावेळी, मिठीच मारावी वाटली त्यांना.
मी अगदी मनापासून खुष होऊन म्हटलं, मलाही हो!!
पण बहुतेकांना हे सांगितलेलं रुचत नाही. मी देखील सर्वाना सांगते, माझं बाई वाकडं आहे स्वैपाकाशी, तर समोरचा लगेच भुवयाच उंचावतो. मी काय विपरितच बोलले जणू, अशी तोंड होतात एकेकाची!!
अबब!! बाईची जात अन् स्वैपाकाशी वाकडं???
आता आहे त्याला काय करायचं?? कितीही हुरूप येऊन नवीन काही करायला घेतलं की ते धड होईलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळे हल्ली हुरूपही फारसा येईना झालाय. पोर म्हणतात, मम्मी आम्ही खातो ना, तू काहीही, कसंही केलं तरी, नको उगी जीवाला लावून घेऊ.
तेही आहेच, भले मिटक्या मारत का नसेना, खाणारे खातात, आपल्या हातात काही असेल, तर तो मटकेवाला सुदिन यायची प्रतिक्षा करत बसायचं एवढंच!!
आता सगळ्याच बायकांनी स्वैपाकात तरबेज असलंच पाहिजे, असं कुणी कुठे लिहून ठेवलय का सांगा??
अन् तेवढं एकच काम बायका करतात का तेही सांगा??
आता एवढं सगळं सांगताच आहात, तर मग एखादी माझ्यासारखी म्हटलीच, आमचं स्वैपाकाशी वाकडं तर समोरच्याने स्वतःचं तोंड आणखी वाकडं करणं बरोबर आहे का? हे सुद्धा सांगा😉
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा, नाहीतर माझंच तोंड वाकडं होईल😉