सुषमा दोन भावांच्या पाठीवर झालेली. भावांची लग्न झाली तशी हिच्या लग्नाची हालचाल सुरू झाली. रूपाने अगदीच साधारण असल्याने लग्न काही लवकर जमत नव्हतं, जी स्थळं सुषमाला पसंत करत होती, ती तिच्या घरच्यांना आवडत नव्हती. सुषमा रूपाने बरी असली तरी सुगरण होती, तिच्या हातचं खाणारा अगदी तृप्त होऊन जायचा.
पण बघणारा पहिले रुपालाच प्राधान्य द्यायचा. घरच्यांना चांगली वाटणारी स्थळे हिला नकार द्यायची.
त्यामुळे लग्नाचं वय सरत चाललं होतं. तिशी पार झाली तरी कोणी मिळेना!!
शेवटी जास्त चिकित्सक न बनता, त्यातल्या त्यात बऱ्या वाटणाऱ्या मुलाशी लग्न लावायचे ठरले.
पण आता तो सुद्धा मिळेना. ही गोष्ट साधारण तीस वर्षांपूर्वीची.
त्यावेळी लग्नाच वय पंचवीस म्हणजेच खूप जास्त झालं असं वाटायचं.
वयामुळे तिला आता सगळी बीजवराचीच स्थळं
येऊ लागली होती.
शेवटी त्यातलच एक बऱ्यापैकी स्थळ निवडून हिचं लग्न लावण्यात आलं. घरच्यांना अगदी सुटल्यासारखं झालं. हिचं लग्न ही एकच काय ती मोठी समस्या होऊन बसलेली जणू त्यांच्या जीवनात!!
तिचा नवरा केशव हा शाळेत शिक्षक होता. अगदी सरळमार्गी. इतका साधा सरळ की पहिली बायको यालाच फसवून दुसऱ्या कुणाबरोबर पळून गेली होती, त्यांचा मुलगा याच्याचकडे ठेऊन. तेव्हा असेल तो पाच वर्षांचा. केशव आणि त्याच्या घरच्यांनी दोन वर्षे वाट पाहिली, पहिली बायको काही परतलीच नाही.
मग मुलासाठी आणि केशवसाठी म्हणून लग्न करायचं ठरलं आणि सुषमा घरी आली.
केशव खरंच स्वभावाने अतिशय चांगला होता. सुषमा आणि त्याच्यात चांगलं नातं तयार होऊ लागलं. तीही स्वभावाने साधीच. मुलाला, गौतमला ऍडजस्ट व्हायला वेळ लागत होता, सुरुवातीला तो तिच्यापासून थोडा लांबच राही.
त्यात बाहेरच्या बऱ्याच जणांनी त्याचे कान भरलेले, आता तुला सावत्र आई येणार, तुझा छळ करणार, तुला उपाशी ठेवणार.
गौतम तिला चाचपडत होता. जास्त बोलायचा सुद्धा नाही तिच्याशी. सारखी भीती वाटायची त्याला, आता मारते की काय??
सुषमाही त्याच्याशी जपूनच वागायची. तिला माहीत होतं, लगेच काही तो आपल्याला आई म्हणून स्वीकारणार नाही, हळूहळूच होईल सगळं.
ती त्याच्या कलाने घ्यायची. आई करेल त्याच मायेने त्याचं करायची. थोड्या दिवसांनी त्यालाही कळलं, ही आई सावत्र असली तरी वाईट नाही. ही आपल्याला काही करणार नाही.
तोही हळूहळू रुळला तिच्याबरोबर. त्याने तिला आपली आई जरी मानलं नसलं तरी तो तिच्याबरोबर नीट बोले वागे.
केशवच्या आणि गौतमच्या दोघांच्याही जीवनात सुषमामुळे स्थिरता आली.
केशव आणि सुषमाला मुलबाळ काही झाले नाही. तसही सुषमाने गौतमला मनापासून आपलं मानलं होतं, त्यामुळे तिला स्वतःच मुलं नसण्याचं एवढं वाईट वाटत नव्हतं.
दिवस भराभर निघून गेले. गौतम खूप शिकला, मूळचा हुशारही होता. सुषमानेही त्याच्या अभ्यासाला प्राधान्य दिले.
त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि मोठया कंपनीत नोकरीही मिळवली. घरात श्रीमंती येऊ लागली. सुबत्ता बघायला केशव काही राहू शकला नाही. सुषमाला आता एकटं वाटू लागलं. गौतम होता पण कितीही प्रयत्न केले तरी त्याला तिचा लळा लागला नव्हता. तो अजूनही काही अंतर ठेऊनच तिच्याशी वागत होता.
आता त्याचंही लग्नाच वय झालं होतं. पहिल्याच स्थळात त्याची बात जमली. रुही सर्वार्थाने त्याला साजेशी होती. यांनी तिच्या घरी सर्व खरं सांगितलं. तिच्या घरच्यांना काही विशेष वाटलं नाही. रुहीला मात्र सावत्र सासू म्हणून जरा सुषमाचं दडपण आलं होतं.
पण लग्न झाल्यावर तिचं सुषमाशी चांगलंच गुळपीठ जमलं. तिला सुषमा सासू न वाटता तिची आईच वाटू लागली.
दोघीही एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत.
सर्वकाही चांगलं चालू होतं. आता घरात नात पण आली होती. सुषमाचा खूप छान वेळ जाई तिच्याबरोबर. नातीलाही आजीशिवाय अजिबात करमत नसे. गौतम आणि रुही दिवसभर नोकरीला. घरी या दोघीच असायच्या फक्त.
हे सर्व सुरळीत चालू होतं, आणि कुणाच्याही ध्यानी मनी नसताना एक दिवस गौतमची खरी आई, गौतमचा पत्ता काढून घरी आली.
आली म्हणजे, ज्याच्या बरोबर ती आपला घर-संसार सोडून पळाली होती, तो गेल्यावर हिला तिथे विचारणार कोणी नव्हतं. त्यांनाही मुलबाळ झालं नाही, त्याच्याही सर्व नातेवाईकांनी हिच्याशी लग्न केलं म्हणून संबंध तोडले होते.
तरुणपणी कोणी विचारलं नाही, आता म्हातारपणी तिथे तिला कोण विचारणार?
तिचे हाल होऊ लागले. तिला त्यांनी वृद्धाश्रमात टाकून दिली. आणि मग हिने त्या वृद्धाश्रमवाल्यांना विनंती करून तिच्या मुलाला शोधायची रिक्वेस्ट केली.
आणि मग हिच्या इच्छेनुसार तिला ते गौतमकडे घेऊन आले.
सुषमा, गौतम आणि रुहीला हे सगळं अनपेक्षित होतं. तशी तर कोणालाच इच्छा नव्हती, त्या बाईला ठेऊन घेण्याची.
पण तिने रडारड केली, माफी मागितली, मरताना तरी मला थोडं सुख मिळू दे, अशी याचना केली. गौतमच्या मनात प्रचंड राग होता, तरी माणुसकी म्हणून तिला ठेऊन घ्यायचं ठरवलं.
इकडे सुषमाला उगीच वाटू लागलं, गौतमची खरी आई आली, आता यांच्यात मीच बाहेरची. माझं रक्ताचं नात
नाही. गौतमने तर अजूनही मला त्याची आई मानलं नाही. आता माझं कसं व्हायचं. मलाही यांच्याशिवाय कोणी नाही.
सुषमा झुरायला लागली. आपल्या सासूच्या वागण्यातील बदल रुहीने ओळखला. ती म्हणाली, मी तर तुम्हालाच सासू मानते. ह्यांना तर मी ओळखतही नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका.
गौतमची खरी आई जरी यांच्या घरात राहत होती, तरी तिच्याशी सर्व कामापुरतचं बोलत होते. नातं वाढवायची कोणाचीच इच्छा नव्हती. छोटी नात तर तिच्याकडे अजिबात जात नव्हती. तिच्यामुळे खरं तर यांच्या जीवनाची घडी विस्कटली होती.
ती गौतमला सारखी आपलेपणा दाखवू पाहत होती. गौतम तिला झिडकारायचा. शेवटी एकदा तो म्हणालाच, मी लहान असताना स्वतःच्या गरजेपायी मला टाकून गेलीस, आणि आता स्वतःच्याच गरजेपायी परत आलीस. इतके वर्ष तुला मुलगा आठवला नाही, आणि आता म्हातारपणाचा आधार म्हणून बरोबर आठवला. मी तुला अजिबात आई मानत नाही. मी फक्त तिलाच आई मानतो, जिने मला वाढवलं. मी आज जो कोणी आहे तो फक्त तिच्यामुळेच. मी तिला कधीच अंतर देणार नाही, आणि तिला वाईट वाटेल असं काही करणारही नाही. तुला मी फक्त माणुसकी म्हणून घरात ठेवलंय. माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस!!
हे सुषमानं ऐकलं अन् तिच्या डोळ्यातून झरझर पाणी येऊ लागलं. किती वर्षे वाट पाहिली तिने, हे ऐकण्यासाठी. आज तिला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. तिला गौतमचं तिच्याकडे न खुलणं मनाला फार लागायचं. पण आज तिचं मातृत्व जिंकलं होतं. अगदी त्या क्षणी देवाने नेलं असतं तरी तिला चाललं असतं.
तिच्या मुलाने तिचे सारे पांग फेडले होते!! हिच माझी आई, अशी कबुली दिली होती, आता तिला दुसरं काही नको होतं!!
कथा खरी घडलेली आहे, आपल्या कल्पनेपलीकडलं जगात बरंच काही घडत असतं, तसंच काहीसं हेही!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा, आणि शेअर करताना मात्र नावासकटच करा.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
very heart touching story