फक्त दोन महिने झाले होते पारुलची नवीन ऍक्टिवा घरी येऊन. आणि तिचं मन त्यावरून पूर्ण उडालं होतं!!
ती यायच्या आधी पारुलला कित्येक दिवस झोप येत नव्हती. कधी एकदा गाडी येते अन् कधी मी चालवायला लागतेय अस तिला झालं होतं. स्वप्नातसुद्धा ती स्वतःला गाडीवरच दिसायची सतत.
लाल रंग तिचा आवडता, म्हणून तिला लाल रंगाचीच ऍक्टिवा घ्यायची होती.
तशी ती होती घाबरटच.
पण तिच्या ऑफिसमधल्या बऱ्याच जणी गाडीवर यायच्या. त्यांना सारखं पाहून पाहून पारुलला पण फार वाटायला लागलं, आपण पण असं गाडीवर यावं जावं. लाल गाडी आणि त्यावर स्टायलिश लाल हेल्मेट!! तिनं ठरवलं, नवऱ्याला पुष्करला सांगितलं, त्याने तिला प्रोत्साहनच दिल.
मी तुला एकदम तरबेज करेन, भुर्र्ss भुर्र्ss करत हिंडशील सगळीकडे, त्याने पैजेवर सांगितलं.
एका शुभ मुहूर्तावर दोघांनी ऍक्टिवा बुक केली. तिला हवा तसा लाल रंग मिळण्यासाठी मात्र बऱ्यापैकी वेळ गेला. तो एकेक दिवस पारुल अगदी क्षण क्षण मोजून घालावत होती. सारखी म्हणायची पुष्करला, काय रे!! कसे काढू मी दिवस माझ्या गाडीविना. कधी येणार माझी गाडी, कधी मी गुरुगुरु हिंडणार तिच्यावरून?
पुष्करला तिची बेचैनी बघून हसायला यायचं, कधी तो तिच्यावर हसायचा, कधी गोड समजूत घालायचा.
शेवटी एकदा तो क्षण आला, तिच्या आवडत्या लालचुटुक रंगातली गाडी तिच्या ताब्यात आली. तिने तिला हवं तसं लाल हेल्मेटही घेतलं.
नवऱ्याच्या मागे बसून गाडी घरी घेऊन आली. सुंदरसा हार घातला, गाडीसमोर नारळ फोडला, आजूबाजूला पेढे वाटले. सगळ्यांकडून गाडीचं कौतुक करून घेतलं.
बस्स् आता रात्री जेवण झाल्यावर पाठीमागच्या मैदानात गाडीवरनं हात साफ करायचा तेवढा बाकी होता. पारुलने ठरवलेलं, जास्त दिवस घालवायचे नाहीत उगाच शिकण्यात,पटकन कॅच करायचं सगळं. अन् मग डायरेक्ट ऑफिसला घेऊन जायची!!
त्या दिवशी तिने उगाच उशीर नको म्हणून घरी जेवणाचा घाट घातलाच नाही. बाहेरून मागवलं, स्वतः पटापटा खाल्लं, पुष्करलाही घाईघाईत गिळायला लावलं.
दोघं मैदानात आले. अगदी मोठं नव्हतं, पण गाडी शिकायला पुरेसं होतं. त्यातून एका साईडला थोड्या गाड्याही पार्क केलेल्या होत्या.
पारुल अगदी उत्साहाने गाडीवर बसली. पुष्कर मागे तिला गाईड करायला बसला. पहिल्यांदा त्याने धरून धरून पाच सहा राऊंड मारले, अन् नंतर मात्र हळूच हात सोडला.
पारुलला अंदाज आला, तिला जमायला लागलं. कॉन्फिडन्स वाढला, तसा पुष्कर उतरला. तिने एकटीने राऊंडही मारले पाच सहा.
खूष होऊन पुष्करला म्हणाली, किती सोप्प आहे रे गाडी चालवणं, किती पटकन जमलं मला!!
पुष्करनेही तिचं तोंडभरून कौतुक केलं. एकाच दिवशी जास्त नको म्हणून दोघं घरी आले.
त्या रात्री पारुल झोपूच शकली नाही. उघड्या डोळ्यांनी गाडीवरून सगळीकडे फिरत होती ती.
ऑफिसला, बाजारात, या नातेवाईकांकडे त्या नातेवाईकांकडे, इतकंच काय पण अजून न झालेली दोन पोरही दिसली तिला गाडीवर पुढे मागे बसलेली!!
दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टीच घेतली तिने. मनच लागत नव्हतं कशात. नुसतं गाडी चालवत बसावं असच वाटत होतं तिला फक्त. कसाबसा दिवस ढकलला तिने. पुष्करला लवकर ये लवकर ये म्हणून दहा फोन केले. तोही आला बिचारा. त्याला खायला घातलं आणि म्हणाली,चल जाऊ आत्ताच. आल्यावर जेवू आता.
तिचा अतिउत्साह बघून कंटाळलेला असूनही पुष्करला ना बोलता आलंच नाही.
दोघही मैदानात आले. कालच्या प्रॅक्टीसमुळे पारुललाही जोर चढला होता. कॉन्फिडन्समध्ये डबल वाढ झाली होती. पुष्करने गाडी तिच्या हातात दिली. आणि म्हटला, कर सुरू. तिने सुरू केली, आणि काय झालं कळायच्या आत, गाडी सुसाट सुटली, आणि सरळ जोरात जाऊन पार्क केलेल्या एका कारवर आदळली. अनवधानाने तिच्याकडून एक्सिलेटर जोरात फिरवला गेला होता. पुष्करच्या तर डोळ्यांची पापणी लवते न लवते तोवर चमत्कार होऊन बसला होता. तो सावरून पटकन पुढे गेला तर गाडी समोरच्या कारवर धडकून साईडला पडली होती आणि त्याच्या खाली आs ऊई करत पारुल विव्हळत पडली होती. आजूबाजूच्या बिल्डिंग मधली लोकही काय झालं काय झालं करत खाली आली.
पुष्करने गाडी बाजूला करून पारुलला उठवलं. कंबरेला जोरात मार लागला होता तिच्या. हातापायाला चांगलंच खरचटलं होतं. पुष्करने तिला बाजूच्या कट्ट्यावर बसवलं. तेवढ्यात ज्यांच्या गाडीला ठोकलं होतं, ते नवरा बायको जोडीने तिथे अवतीर्ण झाले. तावातावाने भांडू लागले. पुष्करकडून नुकसान भरपाईचं आश्वासन घेतल्यावरच कुठे त्यांची टॅव टॅव बंद झाली.
नवीन ऍक्टिवाने तर पुढून चांगलंच चेपून घेतलेलं स्वतःला.
पारुलला कधी स्वतःकडे बघून तर कधी गाडीकडे बघून रडू कोसळत होतं.
घरी गेल्यावर तर तिने गळाच काढला. अगदी दुसऱ्याच दिवशी गाडीबरोबर तिचाही फज्जा उडाला होता.
जेवण काही गेलंच नाही तिला. ना रात्री धड झोपू शकली ती. शरीराचा प्रत्येक भाग ठुसठुसून स्वतःच्या अस्तिवाची जाणीव करून देत होता. थोडक्यात निभावलं होतं खरं.
मनापासून शरीरापर्यंत सर्व सुरळीत होईपर्यंत आणखी पंधरा दिवस गेले. पारुल गाडीबद्दल काहीच बोलत नाही हे पाहून पुष्करनेच एक दिवस तिला विचारलं, चल पुन्हा करायची का सुरू प्रॅक्टीस?
ते ऐकूनच तिला पुन्हा तो प्रसंग समोर आला, आणि ती एकदम म्हणाली, नाही बाबा मी नाही बसणार परत त्या गाडीवर.
हे काय? किती हौसेने घेतली होतीस ना तू गाडी? बसणार नाही कशी? एकदा काही झालं की सारखं तेच होणार का?
हौस फिटली माझी, विकून टाकूया आपण ती गाडी, पारुल निर्विकारपणे म्हणाली. तिने चांगलाच धसका घेतला होता गाडीचा!!
पुष्करने त्यावर लगेच काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याला वाटलं, अजून थोडे दिवस जाऊन देऊया, होईल आपोआप नॉर्मल.
पण पुढे दोन महिने गेले तरी पारुल नॉर्मल व्हायचं नावच काढत नव्हती. हे बघून मात्र एक दिवस पुष्करने तिला दमातच घेतलं आणि म्हणाला,
तुला गाडी चालवायला चांगली जमलेली, तू पटकन कॅचही केलेलंस. कधी होऊ शकतं असंही. भीती सोड. तुझं गाडीवरून गुरुगुरु फिरण्याचा स्वप्न तू मिटवून टाकलस तरी मी मनात जिवंत ठेवलंय अजून. मला बघायचंय तुला गाडीवरून ऑफिसला जाताना, मनात आलं की गाडीचं बटन स्टार्ट करून पाहिजे तिथे हिंडताना, मला पहायचय तुला आत्मनिर्भर होताना……..
पुष्करचं बोलणं तिला पटत होतं पण पुन्हा गाडीला हात लावायचा धीर होत नव्हता तिला. भीती सारखी अंग वर काढत होती. पण पुष्करही हट्टाला पेटला आणि म्हणाला, तू येतेस की मी उचलून नेऊ. मी ऐकणार नाही तुझं काही. माझी इच्छा आहे समज आणि चल. उद्या मेलो बिलो तर पस्तावशील बघ!!
पारुलने एकदम त्याच्या तोंडावर, काहीही कसं बोलतोस रे म्हणून हात ठेवला. फक्त त्याच्याखातर धीर एकवटवला. मनाची तयारी केली.
पुन्हा मैदानात उतरली. पुन्हा पुष्कर मागे बसला. पुन्हा दोन राऊंडनंतर त्याने हात सोडला. पुन्हा मागे बसून चार राऊंड मारल्यावर तो उतरला. पुन्हा तिने एकटीने राऊंड मारले. पुन्हा तिला कॉन्फिडन्स आला.
दुसऱ्यादिवशी पुन्हा ते गेले. तिने गाडी स्टार्ट केली, आणि पुष्करची मदत न घेता बरेच राऊंडही मारले.
महिनाभरात रस्त्यावर फिरायला देखील तिचा चांगलाच हात बसला. आणि तो दिवस आला, ज्याचं तिने स्वप्न बघितलं होतं, बदामी रंगाचा बारीकशी लाल लाल फुल असलेला ड्रेस तिने घातला, लाल हेल्मेट डोक्यावर चढवलं, आणि देवाचं नाव घेऊन लालेलाल ऍक्टिवा सुरू केली. थांबवली ती डायरेक्ट ऑफिसच्या गेटमध्येच.
अन् मी पोचले सांगायला उत्साहाने पुष्करला फोन लावला. बरेचदा तिच्या पहिल्या रिंगला फोन उचलणारा पुष्कर तिसऱ्या रिंगलाही फोन उचलेना. नेमका त्याच वेळी तिला त्याचा डायलॉग आठवला, मेलो बिलो तर……
तिचे ठोके वाढले, दण् दण् करत कानावर आपटू लागले. ऑफिसमध्ये शिरली आणि समोर ठेवलेलं ग्लासभर पाणी तिने घटाघटा प्यायलं. पुन्हा फोन लावला. यावेळीही नुसता वाजताच होता. तिच्या डोळ्यात पाणी भरलं. काहीतरी झालं एवढंच सारखं मनात येत होतं. काही सुचत नव्हतं. त्याचा आवाज ऐकल्याशिवाय काही सुचणारही नव्हतं.
हुरहूर उगाच जीव जाळू लागली.
मनात चलबिचल चालू असतानाच तिचा फोन वाजला, नाव त्याचं दिसलं तरी मनात क्षणभर आलंच कुठली बातमी दयायला तर नसेल केला कुणी. तिने धीर एकवटून उचलला, समोरून तिचा पुष्करच बोलला, काय ग किती ते फोन? पोचलीस ना नीट?
मी पोचले तू कुठे होतास इतक्या वेळ? जीव गेला माझा!!
कशाने गेला? तुला काय वाटलं तुला गाडी चालवायला शिकवून मी उडालो की काय? ते सिनेमे पाहून काहीही डोक्यात शिरतं तुझ्या. बोललं की उडायला, सिनेमातली प्रत्येक गोष्ट खऱ्या लाईफमध्ये नाही घडत काही. सगळी भीती सोड पहिले. ती सोडली म्हणून स्वप्न पूर्ण झालं ना आज?
पारुल हसून म्हणाली, मी फक्त स्वप्न पाहिलं पण तू त्याचा पाठपुरावा करून माझ्याकडून पूर्ण करून घेतलंस!! किती आभार मानू तुझे!!
आभार बिभार नको, सुसाट धडकण्याची नुकसानभरपाई म्हणून दिलेला सात हजार रुपयांचा भुर्दंड तेवढा मला ट्रान्सफर कर म्हणजे झालं, पुष्करने डोळा मारून तिला सांगितलं.
ते तू मला उत्तम गाडी चालवायला यायला लागल्याबद्दल बक्षीस दिलं असं समज, आणि विसरून जा, असं म्हणत दोन्ही डोळे मिचकवून पारुलने टपकन् फोन बंद करून टाकला.
स्वप्नपूर्तीच्या आनंदाने तिच्या अंगात डबल उत्साह संचारला होता. तिचं तिला सारच अनोखं वाटत होतं.
एकदा काही झालं की सारखं नाही होत, उगीच भीती धरून बसायची नाही, पुष्करचं म्हणणं आता तिला शंभर टक्के पटलं होतं…………
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
मला पण आता मनातली भीती काढून टाकावी लागेल…. मी खूप घाबरते ग.
तू.. माझ्या मनातली भीती शब्दात मांडलीस