तो टपोरी आणि ती फटाकडी म्हणून एरियात प्रसिद्ध होते.
तो बारावी पर्यंत शिकला होता. पण नंतर मात्र त्याचं शिक्षणातून लक्ष उडालं.
नाक्यावर बसून मित्रांसोबत टवाळक्या करणं हाच त्याचा एकमेव उद्योग होता.
ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होती. एकदम बिनधास्त, कुठल्याही पोराला खडसवायला ती मागे पुढे बघायची नाही.
त्यामुळे पोरं तिच्यापासून जरा बिचकुनच राहायची.
सौदर्य तर असं होतं की बघणारा क्षणभर आपलं भान हरपेल.
असंच एकदा तो मित्रांसोबत कट्ट्यावर बसला असताना, ती तिथून जात होती. त्याने पाहिलं आणि मस्त शिटी वाजवली.
तिने खुन्नसने पाहिलं आणि पुढे निघून गेली.
तिच्या त्या पाहण्याने त्याच्या छातीत कळ गेली, आणि तो टपोरी तिच्यावर लट्टू झाला.
मित्राला म्हणाला, झक्कास होती रे!! आपल्याला जाम आवडली
मित्र म्हणाला, झक्कास तर आहे, पण फटाकडी पोरगी आहे ती. तुला समोर उभं पण करणार नाही.
तो म्हणाला, असुदे की. आपण काय हिरोपेक्षा कमी आहोत काय? आणि खरंच तो एखाद्या हिरोलाही लाजवेल असाच होता. टॉल, डार्क, हॅन्डसम पठडीत मोडणारा. फक्त टपोरी म्हणून दुर्लक्षिलेला!!
तेव्हापासून रोज हा तिच्या वाटेवर उभं राहू लागला. ती दिसली की तिच्या मागे जाऊ लागला.
हिने दोन दिवस बघितलं, आणि तिसऱ्या दिवशी त्याला म्हणाली, काय नाटकं आहेत रे तुझी?? तुझा टपोरीपणा तुझ्या नाक्यावर, माझ्याकडे नाही चालणार!!
तो सुद्धा कमी नव्हता, बिनधास्तपणे तिला म्हणाला, तू खूप आवडलीस आपल्याला!!
ती म्हणाली, हे एका दिवसात तू किती मुलींना ऐकवतोस बरं??
जा चल निघ, छप्पन्न पाहिले तुझ्यासारखे !!
तो म्हणाला, पाहिले असशील, पण ते माझ्यासारखे नक्कीच नसतील.
काय समजतो स्वतःला कोण जाणे, असं म्हणून ती निघून गेली.
तो मात्र वेड्यासारखा तिचा पिच्छा पुरवू लागला. जिथे ती जाईल तिथे तो तिच्या मागे असायचा. स्वतःला सुद्धा तो विसरला होता.
त्याच इतकं वेड बघून ती फटाकडी पाघळली आणि त्याला हो सुद्धा म्हणाली.
तिथपासून त्यांची प्रवाहाविरुद्ध वाहणारी लव्ह स्टोरी सुरू झाली. दोघांचीही घरं कट्टर होती. यांची जात नाही, तर धर्मच वेगळा होता. पण माणूस एकदा प्रेमात पडला की पडला. सर्व विचार करून थोडच कोणी प्रेम करतं!!
एक दिवस त्यांच्या प्रेमाचं बिंग घरी फुटलं, तसं तिच्या घरच्यांनी त्याच्या घरी जाऊन तमाशा केला. तुमच्या टपोरी पोराने आमच्या पोरीला नादी लावलं, म्हणून त्याच्या घरादाराला भरपूर शिव्या घातल्या.
अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं, तिला कोंडून वगैरे ठेवलं.
त्याच्या घरीही हे अजिबात मान्य नव्हतं. एक तर कामधाम काही नाही, वरून पोरींची लफडी, म्हणून त्यालाही वडिलांनी तुडवलं.
दोघही थोडे महिने थांबले. ही गोष्ट आहे नव्वद सालातली. त्यावेळी मोबाईल फोन काय लॅण्डलाईन पण प्रत्येक घरी नसायचे. मित्र-मैत्रिणींच्या मार्गेच काय ते निरोप मिळायचे.
त्यांच्याच मदतीने दोघांनीही पळून जायचा प्लॅन केला.
त्यावेळी पिक्चर मध्ये पण प्रेमी युगुलं पळून जातानाच दाखवायचे. प्रेयसीला पळवून नाही न्यायचं तर घरच्यांचं मन वळवून न्यायचं हा विचार DDLJ मधला शाहरुख नंतर घेवून आला.
तोपर्यंत पळून जाणं हेच एक ऑप्शन डोक्यात असायचं सर्व प्रेमी युगुलांच्या.
मग तोच ऑप्शन त्याने आणि तिनेही स्वीकारला.
अगोदर लग्न नोंदवून ठेवलं. मग ते रजिस्टर झालं की एक दिवस दोघंही पळाले.
मित्रमैत्रिणींच्या मदतीने देवळात लग्न लावलं, आणि कायमचे एकमेकांचे झाले.
दोन दिवस त्याच्या मित्राकडे राहिले. दोन्ही घरी शोधाशोध आणि एकमेकांशी बाचाबाची सुरू झाली.
मित्रांची घर धुंडाल्यावर हे सापडले, दोघांचाही यथेच्छ समाचार घरच्यांनी घेतला. तिच्या घरच्यांनी तिचं नाव कायमसाठी सोडलं . त्याच्या घरचे आता लग्न केलंच आहे तर काय करणार म्हणून घरी घेऊन आले.
घरी आणलं, पण तिच्याशी कोणीच नीट वागत नव्हतं, की बोलत नव्हतं. तिला मनापासून स्वीकारणं त्यांना खूप जड जात होतं. त्यातून त्याला काही कामधम नसताना त्यांनी हे लग्न केलं होतं.
त्यामुळे खूप बोलणी खावी लागायची दोघांना.
पण तो आता टवाळक्या सोडून नोकरी शोधत होता. आणि प्रयत्न करून त्याला थोड्याच दिवसात एक नोकरी मिळलीही. मार्केटिंगची होती, पगार जेमतेम होता, पण सुरुवात तर झाली होती.
हिनेही आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. आणि अभ्यासाला लागली.
तो घरातून कामाला बाहेर पडल्यावर त्याच्या घरातले तिला खूप त्रास द्यायचे. ती फटाकडी होती, ती पण बोलायची, पण मर्यादेचं भान ठेवून.
त्याच्या घरचं वातावरण तिच्या घरापेक्षा पूर्ण भिन्न होतं.
प्रत्येक गोष्टीत फरक होता. ती जमवायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या घरच्यांना तिच्याशी काहीही जमवून घेण्यात इंटरेस्ट नव्हता. सतत टोमणे मारायचे तिला.
ती त्याच्याजवळ खूप रडायची. तो तिला समजवायचा, आपली पण वेळ येईल ग. लवकरच येईल, अशी हिम्मत हरू नकोस.
ती कसेतरी दिवस ढकलत होती. शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली, आणि तिच्याकडून गोड बातमी आली.
त्याच्या घरचे खुष झाले. पण म्हणून हिला त्या पिरियड मध्ये त्यांनी आनंदी ठेवलं, तिचं मन राखलं असं त्यांच्याकडून काही झालं नाही.
ते पहिल्यासारखेच वागत होते.
हिला मुलगा झाला. अगदी तिचं रूप घेतलेला. पोस्टर मध्ये कशी बाळं असतात, अगदी तसाच दिसायचा तो.
त्या दोघांना वाटलं; आता तरी घरचे सुधारतील, पण घरच्यांना नातू हवा होता, ती नको होती.
मुलगा काही महिन्याचा झाल्यावर हिनेही नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यासाठी गरजेचे काही कोर्सही केले.
थोड्याच दिवसात तिला बऱ्यापैकी नोकरी मिळलीही.
पण घरच्यांना तिच्या कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नव्हतं.
त्यांचा त्रास कमीही होत नव्हता.
शेवटी एक दिवस ती म्हणाली, एका खोलीचं का होईना आपण घर बघू. मला खूप त्रास होतोय रे इथे. तरी तीन वर्षे काढली मी आणखी किती काढू? त्यांना माझं काहीच आवडत नाही.
थोड्याच दिवसात अगदी एकाच खोलीत त्यांनी संसार मांडला. मुलाला ती मैत्रिणीकडे ठेऊन कामाला जायची.
दोघं आपल्या छोट्याश्या घरात खूप सुखी होते. त्यांच्यात जात-धर्म कुठे कशालाच मधे येत नव्हता.
थोड्याच दिवसात त्याने एक जुनी सायकल घेतली. तो त्या सायकल वरून कामाला जायचा.तिचं ऑफिस सुध्दा खूप लांब होतं. तिला यायला उशीर लागायचा, तर हा कामावरून आल्यावर तिला बस स्टॉपवर आणायला जायचा. आणि मग दोघे सायकल वरून घरी यायचे.
त्याची पर्सनॅलिटी समोरच्यावर छाप पाडेल अशी असल्याने आणि बोलण्यातही तो चतुर असल्याने त्याचं मार्केटिंगमध्ये हळूहळू नाव होऊ लागलं. स्वतःला सुधारण्यासाठी तो कष्टही तेवढेच घेत होता. मुख्य म्हणजे त्याला तिच्या प्रेमाची जाणीव होती. आणि तिला चांगले दिवस दाखवायचे होते. तिने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं चांगलं चीज करायचं होतं.
इकडे हिचाही एक्सपिरअन्स वाढल्याव , तिलाही चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
आता सायकल जाऊन त्यांच्याकडे स्कुटर आली होती. तिघे मस्तपैकी फिरायचे त्यावरून.
मुलगा देखील चांगला वाढत होता. त्याच्या घरचे नातवासाठी जेवढ्यास तेवढा संबंध ठेऊन होते.
दोघांनी खूप कष्ट करून एका खोलीचा संसार स्वतःच्या दोन खोल्यात नेला.
लग्न केलं तेव्हा तिच्या घरच्यांना वाटायचं, हा टपोरी, उडाणटप्पू पोरगा काय संसार करणार, आपली पोरगी चार महिन्यात परत येईल.
आणि त्याच्या घरच्यांना वाटायचं, ही फटाकडी कसली निभावणार संसार, आपल्या चालीरीती हिला काय पेलणार. पळून जाईल सर्व सोडून.
पण दोघांनीही जिद्दीने अक्षरशः शून्यातून स्वतःचं अस्तिव उभं केलं. कोणीही पाठीशी नसताना!!
आज जवळपास तीस वर्षे होतील त्यांच्या संसाराला, आता चार खोल्यांचा ब्लॉक आणि चारचाकी पण आलीये त्यांच्याकडे. मुलाने त्याच्या आवडत्या क्षेत्रात चांगलं नाव कमावलयं.
पण अजूनही जेव्हा कधी ते आठवतात, त्यावेळी सायकलवर फिरणारी त्यांची जोडी डोळ्यासमोर येते, त्यांचा अभिमान त्यावेळी जास्त काही कळत नव्हतं, तेव्हाही वाटायचा, आणि आता तर आणखीनच जास्तच वाटतो!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल