“तरी मी तुम्हाला सांगितलं होतं, सगळं घर धुऊन काढू नका म्हणून. पोरींच्या लग्नापायी कंगाल करून ठेवलत!! राहतं घर विकून टाकलत आणि या भाड्याच्या घरात सगळं डोईजड झालंय आता…….
पोरी पैसे देतात तेही घेत नाहीत, नुसत्या पेन्शनवर काय काय भागवायचं आपण? ती तरी कुठे आहे एवढी? घरभाड्यालाच जाते निम्म्याच्यावर.
काय झालं असतं एवढं, स्वतःचं घर राहू द्यायचं होतं हो डोक्यावर……..”
चित्राताईंचा त्रागा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. म्हातारपणाची दुखणी खुपणी सुरू झाली होती, आणि पैसा सगळ्यालाच अपुरा पडत होता.
नेहमीप्रमाणे आजही त्या कुरकुरत होत्या, आणि आप्पा आपले शांतपणे पेपर वाचत बसले होते.
दहा तारीख होती, घरमालकाचा कालपासून दोनदा फोन येऊन गेला होता. आज तो प्रत्यक्षात येईलच याची चित्राताईंना खात्रीच वाटत होती. म्हणून सकाळपासून त्याच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता. त्यात आप्पा बघतो मी, बघतो मी करून गपगार बसून होते. त्याने आणखी त्रास होत होता चित्राताईंना. हात पाय हलवायचे, पोरींना पैशाच्या मागणीसाठी फोन करायचे सोडून पेपर वाचन चाललंय यांचं, चित्राताईंचा आतल्या आत भडका उडाला होता.
“यावेळी दवाखाना लागला म्हणून टंचाई झाली जास्त, पोरींना कळेल की ते, लावा की फोन. कधीतरी लावला तर चालतो, नेहमी मागतो का आपण?,” चित्राताई पुन्हा पुन्हा आप्पांना डिवचून बघत होत्या, पण आप्पा होईल सर्व नीट एवढंच एकच म्हणत होते.
“काय होणार कप्पाळ माझं,” बोलता बोलताच चित्राताईंनी कपाळाला हलकं बडवून घेतलं. विट आला होता त्यांना या परिस्थितीचा.
खरंतर मुलींची लग्न ठरवायच्या वेळीच त्या आप्पांना सांगत होत्या, आपली परिस्थिती स्पष्ट सांगा दोन्हीकडच्यांना, आम्हाला एवढ्यातच जमेल, थोडक्यातच करू बोला. पण आप्पांना घर दिसत होतं, आपण काय दोघं राहू कुठेही असा विचार करून त्यांनी काही कमतरता न ठेवता मुलींची लग्न बऱ्यापैकी थाटात लावून दिली. सगळ्या हौशीमौजी केल्या त्यांच्या. चित्राताईंच्या तोंडावर सतत हात ठेवला.
आता सगळा घोळ होऊन बसला होता त्यामुळे मात्र……….
जेवणाची वेळ झाली तरी चित्राताईंचं तोंड काही सरळ झालंच नव्हतं. तसच वाकड्या तोंडानी त्यांनी कार्यक्रम उरकला. आप्पा पोटभर जेवले पण चित्राताईंना चार घास कमीच गेले. घरमालक संध्याकाळचा येणार, आणि त्याला आता नाही जमणार थोडे दिवस द्या, हे सांगायला लागणार, हे त्यांना कमीपणाच वाटत होतं.
जेवण झालं आणि दोघं थोड्यावेळ लवंडले. आप्पा आडवे पडले तसे दुसऱ्या सेकंदाला घोरायला लागले. चित्राताईंना काही केल्या झोप येतच नव्हती, सारखं मेलं त्या घरमालकाचं तोंड समोर दिसत होतं.
आप्पांकडे बघून त्यांना वाटलं, “नक्की कोणावर आपल्या चिंता टाकून झोपलाय हा माणूस? अजब आहे बुवा सारं!!”
अख्खी दुपार सगळी आढ्याकडे बघतच काढली चित्राताईंनी.
बरोबर साडेचार वाजता बेल वाजली. चित्राताईंचे ठोके वाढले. त्यांनी गदागदा हलवून निश्चिंतपणे घोरणाऱ्या आप्पांना उठवलं. “अहो उठा, आला बघा तो मालक,आता तरी उघडा त्याच्यासमोर तोंड जरा, मी काही येणार नाही समोर. मला फार लाजिरवाणं वाटतं, दारही उघडा तुम्हीच,” म्हणत त्या तरातरा स्वैपाकघरात निघून गेल्या.
तेवढ्यात बेल अगदी नॉनस्टॉप वाजू लागली. आप्पांनी पट्दिशी चूळ भरली,आणि लगबगीने दरवाजा उघडला आणि समोर न बघता वाकून म्हणाले, या या साहेब.
“आप्पा, झोप अजून गेली नाही की काय? आम्ही काय साहेब दिसतो होय तुम्हाला,” त्यांच्या दोन्ही मुली रिद्धी सिद्धी हसत घरात शिरता शिरता म्हणाल्या.
“अगं तुम्ही कशा आता यावेळी?,”आप्पांनी अचंबित होऊन विचारलं.
“का? माहेरी यायची काय ठराविक वेळ आहे का काही ?,” त्यांच्या मोठ्या मुलीने रिद्धीने त्यांनाच उलट प्रश्न केला. “एकाच शहरात म्हटल्यावर वाटेल तेव्हा येऊ जाऊ शकतो ना आपण?”
“तसं नाही ग, अचानक न कळवता आलात ना म्हणून म्हटलं आपलं,” मुलीशी बोलतच आप्पा निवांतपणे दिवाणावर विसावले.
“आई, अगं आई, ये बाहेर लवकर,” सिद्धीच्या जोरजोरात हाका ऐकून चित्राताई घाईतच बाहेर आल्या. मालक येणार होते, ते मुली आल्या. आता तो मालक आला तर सगळा घोटाळा यांच्यासमोर. देवा मालकाला अडवून ठेव जरा, मनात त्यांचा धावा चाललाच होता.
दोन्ही मुली म्हणाल्या, “चला चला आवरा पटापट. आपल्याला बाहेर जायचय.”
“आता कुठे? आता नको,” चित्राताई भांबावून म्हणाल्या. मालक यायचाय, तो आला आणि टाळं दिसलं घराला तर बरं नाही ते, त्यांच्या मनात तेच चालू होतं.
पण मुलींनी कोणाचं काही चालवू दिलं नाही, दोघांनाही पटापट आवरायला लावून घराबाहेर काढलं.
जायला बुक केलेली गाडी आली, आईवडिलांना दोघींनी त्यात घुसवलं. दोघही कुठं जायचय कुठं जायचय करत होते, त्यांना ठिकाण आलं की कळेल एवढं एकच उत्तर सतत दिलं.
गाडी थांबवून उतरले ते ठिकाण त्यांच्या ओळखीचं होतं. “अरे, इथे का आलो आपण, मागच्या आठवड्यात तर शेजारच्याकडे फेरी झालेली आमची, इथेच यायचं होत तर सांगायचं, त्याचा डबा परत करायचा होता, तो आणला असता,” चित्राताई म्हणाल्या तशा दोन्ही मुली एकमेकींकडे बघून हसल्या.
थोडं पुढे गेल्यावर त्यांचं जूनं घर लागलं. त्याच्याच थोडं पुढं नवीन चार बिल्डिंगची सोसायटी होती. पोरींच्या लग्नाच्या वेळीच नुकतच तिचं बांधकाम पूर्ण झालं होतं.
मुली त्या सोसायटीत शिरल्या, तसे आप्पा म्हणाले, “पोरींनो इकडे कुणाकडे जातोय आपण?”
पोरी म्हणाल्या, “आहेत एक ओळखीचे. तुमची भेट घडवून आणायचीये त्यांच्याशी.”
पहिल्याच मजल्यावरच्या एका ब्लॉकचं लॅच रिद्धीने उघडलं. चित्राताई आणि आप्पा आत आले तसे दोघींनी टाळ्या वाजवून त्यांना वेलकम केलं आणि म्हणाल्या, हे घर तुमचं स्वतःचं आहे आई- आप्पा!!
तुमच्या मुलींनी तुमच्यासाठी घेतलेलं. बघा बरं फिरून तुम्हाला आवडतंय का?
चित्राताई आणि आप्पा जिथल्यातिथे आखडल्यासारखे उभे राहिले. त्यांनी अशी काही कल्पना स्वप्नातसुद्धा केली नव्हती. चित्राताईंना तर अगदी ह्या घरात पाऊल ठेवेपर्यंत तो घरमालकच समोर दिसत होता. तो येऊन गेला असेल तर काय म्हणत असेल आम्हाला, शरीर इकडं अन् मन त्या मालकाकडं होतं त्यांचं.
तिथल्या हॉलमधल्या फ्रेंच विंडोच्या कठड्यावर दोघं बसले. सिद्धीने त्यांना पर्समधली बॉटल काढून पाण्याचे घोट घ्यायला लावले. ते घेतल्यावर त्यांना जर बरं वाटलं.
“काय हे? हे का केलंत पोरींनो?,” आप्पांनी कळवळून विचारलं.
“तुम्ही तर विचारूच नका आप्पा का ते? स्वतःच्या डोक्यावरचं एकुलतं एक राहतं घर आमच्यासाठी विकलत, आम्हाला ताकास तूर नाही लावून दिला अजिबात,” रिद्धी दटावूनच बोलली.
“नाहीतर काय? लग्न झाल्यावर आम्हाला कळलं सारं. आम्ही भले तशाच राहिलो असतो पण घर नसतं विकू दिलं. तुम्हाला विचारलंही होतं आम्ही, कुठून आले पैसे? तर काय म्हणालात, तुमच्या लग्नासाठी पै पै करून साठवले होते.
एका मांडवात आमचं लग्न लावून नंतर मात्र भाड्याच्या घरात बस्तान मांडलत?” सिद्धीला पुढे बोलवलच नाही.
“आई एवढी भडाभडा बोलणारी तू पण गप्प बसलीस?”, रिद्धीने आईकडे मान वळवली.
“तुमच्या आप्पांनी तोंड दाबलं होतं माझं. पोरींचं लग्न झोकात व्हावंसं वाटत होतं त्यांना. त्यांची इच्छा नाही डावलावी वाटली मला. पूर्ण आयुष्यात एकदाच काहीतरी बोलून दाखवलं ग मला त्यांनी………”
“पण आम्हाला कळलं तेव्हा आमच्या जीवाला किती चटका बसला माहिती आहे तुम्हाला? आई बापाला घराबाहेर काढणारं लग्न नको होतं आम्हाला. टोचणी बसली जीवाला किती?” रिद्धीला प्रत्येक शब्दाला भरून येत होतं.
“आप्पा कळलं तसं, आम्हीही ठरवलं मग, जेव्हा आईबापाला त्यांच्या स्वतःच्या घरात आणू, तेव्हाच सुखाची झोप घेऊ”, सिद्धीच्या म्हणण्याला दुजोरा देत रिद्धीही म्हणाली, “खटपट करत होतो खूप पण तरी दोन वर्ष गेली. ती कशी घालवली, ते आमचं आम्हाला माहीत.
मान मोडून काम केलं ऑफिसमध्ये फक्त तुमच्यासाठी, धीटपणे घरी बोललो सर्व. सगळ्यांनी सहकार्य केलं. दोघींना कर्ज मंजूर झालं. आता आमचे पगारही चांगले आहेत, कष्टाचं फळ मिळालं आम्हाला. आमची ऐपत आहे हप्ते हसत हसत फेडण्याची. जूनं घरच परत घ्यायचं होतं आम्हाला, पण ते नाही मिळालं. म्हणून तुम्ही इतके वर्ष राहिलेल्या तुमच्या ओळखीच्या माणसांच्या एरियातच घर निवडलं तुमच्यासाठी. तुमच्या हक्काचं आहे हे.”
“आई, इथे घरमालक नाही येणार बरं का डोक्यावर बसायला. आता येणाऱ्या शनिवारी गणेशपूजन करायचं आणि रविवार पासून आपल्या घरात सुखाचा श्वास घ्यायचा. त्या तुमच्या मालकाचा हिशोब पण आम्ही चुकता करू सगळा, तुम्ही आवराआवर करायला घ्या फक्त आता”
“काय आप्पा?”
आप्पांनी चश्मा काढून डोळे पुसले आणि म्हणाले, “निशब्द झालोय मी आज. माझ्यासारख्या कफल्लक माणसाच्या डोक्यावर पुन्हा स्वतःचं घर असेल असा विचार माझ्या मनाला आतापर्यंत कधी शिवला पण नव्हता.”
“विचारही शिवला नव्हता, आणि कसली चिंताही शिवली नाही कधी. मला नेहमी यांना पाहून वाटायचं, कुणाच्या जीवावर हे कुठल्याही परिस्थितीत एवढे शांत राहतात. आता कळालं, त्यांच्याही नकळत तुम्ही दोघी पोरींनी त्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. ज्या बापाने आपल्यासाठी स्वतःचं घर विकलं, त्या बापाला कधी काही कमी नको पडायला, हे तुमचंच इच्छासामर्थ्य त्यांना सर्व विवंचनेपासून दूर ठेवत होतं बहुतेक………
बाप तशा बेट्या निघाल्या निःस्वार्थी, मी आपली उगाच सगळ्याला दूषणं देत काढली दोन वर्ष.
होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर घर आलं माझ्या वाट्याला माझ्या पोरींमुळे. आयुष्यातला भाग्याचा दिवस उजाडला आज, न मागता सर्वकाही मिळालं.” चित्राताईंनी अभिमानाने पोरींकडे पाहिलं, नकळत त्यांचे हात जोडले गेले. दोन्ही पोरी क्षणात आईकडे झेपावल्या आणि तिला घट्ट मिठी मारून एवढ्या वेळ अडवलेले आनंदाश्रू टपाटपा गाळून आईचे दोन्ही खांदे चिंब भिजवून टाकले.
आप्पांनी स्वतःला सावरलं, तीन खोल्यांचं घर त्यांनी फिरून बघितलं. घरातल्या सर्वांच्या डोक्यावर आशीर्वादाचा अदृश्य हात ठेवणाऱ्या देवाची जागा आणि सासरी गेल्या तरी मनात माहेरची जाण आणि आठवण सतत तेवत ठेवणाऱ्या दोन पोरींंच्या हसऱ्या फोटोची जागा त्यांनी पहिल्या प्रथम फिक्स करून टाकली……….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.