आता अनेकवर्षं झाली तो हरवलाय त्याला. तसं काही कोणाला सोयरंसुतक नाही त्याच्या जाण्याचं, कारण तो असताना डोक्याला तापच व्हायचा त्याच्या जवळच्यांना.
माणसं स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा पाडून घेतात त्यातलाच तो एक होता.
आई वडिलांना दोन मुलींवर झालेला. लहानपणापासून खूप हुशार म्हणून नावाजलेला. सर्वांचाच लाडका होता तो.
आईपेक्षा वडिलांचा जरा जास्तच जीव होता त्याच्यावर.
खोडकर आणि खेळकर असल्याने तसा सगळ्यांना हवाहवा वाटायचा. त्याच्या असण्याने घरात चैतन्य असल्यासारखं वाटायचं.
मोठं होता होता मात्र याचं डोकं भलतीकडेच चालू लागलं.
दहावीला असतानाच याला उद्योगधंदा करावा वाटू लागला. मग काय, वडिलांच्या मागे लागून त्याने सुरू केला उद्योग!! कपड्यांचं दुकान काढलं. पण धंद्यातले बारकावे शिकायला तो अपुरा पडला आणि अगदी चारच महिन्यात धंदा बासनात गुंडाळून ठेवावा लागला. धंदा धंदा करत अभ्यासातूनही लक्ष उडालं ते कायमचंच. पुन्हा काही त्या वाटेला त्याला जायची इच्छा राहिली नाही.
घरच्यांनी दमदाटी केली, तरी त्याने स्वतःला करायचं तेच केलं. घरातलं चांगलं वातावरण पण त्याला वाईटाकडे आकर्षित व्हायला थांबवू शकलं नाही.
झटपट पैसे कमवून मोठं व्हायचं खूळ डोक्यात घुसलं ते कायमचंच.
नंतर किराणामालाचं दुकान काढलं, ते ही लवकरच बुडालं. असा तर फार हुशार होता तो, पण व्यवहार ज्ञान मात्र काडीचं नव्हतन त्याला. बऱ्याच लोकांनी त्याच्या लहान वयाचा फायदा घेऊन, त्याचे पैसे बुडवून त्याला हातोहात गंडवलं.
थोड्या वर्षांनी मग त्याच्या डोक्यात टेम्पो चालवणं घुसलं, ते बरं चालत होतं, पण त्यापायी नको नको ती सारी व्यसनं त्याला लागून बसली.
अगदी त्यात खोलवर बुडेपर्यंत.
त्याच्या या उद्योगांनी वडिलांच्या जीवाला मात्र सतत घोर लागलेला असायचा. बरेचदा तो दोन दोन दिवस घरी यायचा नाही, आणि त्याचे वडील मात्र रात्र जागत त्याची वाट बघत बसायचे. तो मजा मारत असायचा आणि त्याचे वडील घरी काळजीने तळमळत असायचे. अनेकदा त्याला शोधायला रात्रीचे बाहेर पडायचे. त्याच्या ओळखीच्या लोकांच्या घरी, किंवा कुठल्या नाक्यावर त्याचा ठावठिकाणा शोधत फिरायचे.
तशी काळजी घरच्या साऱ्यांना वाटायची, पण कितीही सांगितलं तरी तो ऐकायचाच नाही, म्हणून त्या साऱ्यांनी त्याच्या नादी लागणं सोडून दिलं होतं.
घरी जेव्हा येईल तेव्हा काहीतरी बाथा मारून तो वडिलांना भुलवायचा. आणि तेही प्रेमापोटी भुलले जायचे.
आई त्याच्या बहिणी त्यांना किती सांगायच्या फसवतोय तो तुम्हाला, त्याचं ऐकू नका, पण त्याच्या वडिलांचं आंधळं प्रेम पुन्हा पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवायला जायचंच.
तसा तो घरात सर्वांना मदतीला तत्पर असायचा, बहिणींच्या लग्नातही याने खूप कामं करून सर्वांकडून कौतुक करून घेतलं होतं.
घरातल्या प्रत्येक अडीअडचणीतही याची धावाधाव असायची. पण तेवढंच.
मनाने चांगला असूनही व्यसनांपायी आणि डोक्यातील अनेकानेक धंद्यांच्या वेडापायी त्याने स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतलं होतं.
बरं कितीही वाट लागली, वडिलांचे, स्वतःचे कितीही पैसे वाया गेले तरी त्याला नोकरी करायचीच नव्हती. घरचे किती सांगायचे, तू हुशार आहेस, पुढचं शिक्षण घे, आणि चांगली नोकरी मिळवं, त्यात पुढे जाशील पण नाही, ह्याच्या डोक्यातली धंद्याची हवा कमी होतच नव्हती.
लग्नाचं वय होता होता बऱ्याच मुलीही फिरवून झालेल्या, पण कुठलं नातं शेवटपर्यंत टिकलं नाही.
घरच्यांना तेवढीच आशा होती, लग्न झाल्यावर सुधारेल. कुटुंबात रमेल. म्हणून मग लांबच्या गावातली गरीबाघरची मुलगी शोधून काढली, आणि तिच्या गळ्यात याला बांधलं.
मुलीत नावं ठेवण्यासारखं काहिच नव्हतं. पण जसंजसं ह्याचे उद्योग तिला कळायला लागले, तसतशी आपल्याला नको तिथे अडकवलं गेलंय हे तिला कळून चुकलं. घरात असताना तसा तो तिचा प्रत्येक शब्द झेलायचा. पण बाहेर पडला की कोणाचाच राहायचा नाही.
बायको आल्यावर पण त्याचे पूर्वीचे उद्योग तसेच चालू राहिले. जे काही कमवायचा ते व्यसनात घालवायचा. आणि मग सतत वडिलांकडे पैसे मागत बसायचा. बायकोला तर अतिशय कानकोंडं झाल्यासारखं वाटायचं. आपला नवरा दुसऱ्याच्या जीवावर जगतो, हा विचार तिचा जीव घुसमटून टाकायचा.
पण तिने कितीही समजावलं, कितीही अबोला धरला तरी त्याला समजायचं नाहीच ते.
शिवाय बायकोकडून सुधारणं होईना म्हटल्यावर घरचे त्याच्याबरोबर आता तिलाही टोकायला लागले होते.
जे त्याच्या आईवडिलांना एवढ्या वर्षात जमलं नाही, ते तिने येऊन एका वर्षात करावं अशी सर्वांची अपेक्षा होती.
ती देखील आपल्या सासऱ्यांना सांगायची नका देऊ त्याला पैसे, होऊ दे काय व्हायचं ते, पण तेही त्याने काहीबाही सांगितलं की इमोशनल होऊन त्याला पैसे पुरवायचेच.
दोघही ऐकत नाहीत म्हटल्यावर तिने त्याच्या मागे लागून दुसऱ्या ठिकाणी संसार थाटला. ह्याने जबाबदारी घ्यावी, यासाठीच फक्त.
पण हा सुधारण्यातला नव्हताच. मनावर नियंत्रणच राहीलं नव्हतं त्याच्या. उलट घर सुटलं, आता कोणाचीच नाही तमा नाही म्हणून बरेचदा कुठेतरी असाच पिऊन पडलेला असायचा. मग कोणी ओळखणारे तिला सांगत यायचे, त्याला इकडे पाहिलं आणि तिकडे पाहिलं म्हणून.
वडील त्यांच्या घरी फेऱ्या मारत असायचेच. वेगळं राहूनही तेच चालवत होते घर त्यांचं.
पुढे ती देखील किमान आपल्याला तरी कोणापुढे हात पसरावा लागून नये म्हणून कुणाच्या घरी पोरबाळं सांभाळायची कामं करू लागली.
तिच्या पैशात जमेलतसं घरही चालवू पहायची ती. तो मागायचा तिच्याकडेही पैसे, पण ती खमकी होती, तिने चार आणे देखील त्याच्या हाताला लागू दिले नाहीत. शिवाय त्याच्या या थेऱ्यात पोराबाळांचे हाल नको म्हणून तिने ती होऊच नये याचीही काळजी घेतली. माझं झालं तेवढं नुकसान खूप आहे, माहीत असून नकोच कुण्या निष्पाप जीवाला होरपळायला. नातेवाईक तिला फार बोलायचे मूल आल्यावर सुधारेल, पण तिने सर्वांचे टोमणे ऐकूनदेखील आपला निश्चय तसाच ठेवला.
जिथे काम करायची तिथल्या पोरांवर मात्र ती खूप माया लावायची. आपल्या मातृत्वची आस तिथे फेडून घ्यायची ती.
सगळं काही व्यवस्थित असूनही त्याच्या आईवडिलांना मुलापायी सुख काही मिळालंच नाही. आईचे होते नव्हते तेवढे दागिने, याच्या धंद्याच्या हौसेत केव्हाच तुटून गेले होते.
आई तर नेहमी कोसायची वडिलांना, तुम्ही दोघांनी एक दागिना टिकू दिला नाहीत माझ्या अंगावर कधी.
दागिने काय याने घरात पैसाच टिकू दिला नाही.
वडील सरकारी नोकरीत होते त्यामुळे बऱ्यापैकी पेन्शन मिळायची. आणि हा पेन्शनच्या दिवशी बरोबर दारात हजर असायचाच. वेगवेगळी कारणंही असायचीच जोडीला, त्याने नाही झालं तर रडून हातापाया पडून पैसे मिळवायचाच तो.
ना तो सुधारण्याची लक्षणं दिसत होती, ना त्याला पैसे पुरवणारे वडील सुधारत होते.
ह्याचाच काळजीने झुरून वयाच्या मनाने जरा लवकरच गेले ते, आणि काही महिन्याच्या फरकाने आई देखील.
ह्याचा तर मोठा आधारच गेला. बायको हात पसरायला घरी उभं करेना झाली, तिचं एकच म्हणणं होतं, तू काहीही करू नको, मी बघते सगळं, पण नीट माणसासारखा रहा. सगळे नको ते उद्योग सोड. काही दिवस तो ‘हो’ ही म्हणाला, बायको त्याला घरी बंद करून कामाला जायची. पण चार दिवसातच तो कंटाळला, आणि तिला दमदाटी करून पुन्हा आपल्या मार्गाला लागला.
बायको पैसे देईना तर जो ओळखीचा दिसेल त्यांच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली त्याने. उद्या देतो परवा देतो म्हणून घ्यायचा, आणि घरी मग पैसे घ्यायला लोकांची लाईन लागायची.
बहिणींच्या घरीही काही न काही बोलून मागत सुटायचा. चार पाच वेळा मदत केल्यावर त्यांनाही कळलं देऊ तेवढं हा आपल्याकडे मागत बसणार. मग त्यांनी ही त्यांची दार बंद करून टाकली.
बायकोच्या नातेवाईकांनाही याने सोडलं नाही. सगळ्यांसाठिच तो म्हणजे डोक्याला ताप होऊन बसलेला.
प्रत्येकाला पहिल्यांदा वाटायचं आपल्या हाताने सुधारला तर सुधारला, म्हणून मदत करून पहायचे.
पण नाहीच. शेवटी सर्वांनी त्याला कितीही रडला गागला तरी पैसे द्यायचं पूर्णपणे बंद करून टाकलं.
सगळ्यांनी टाकल्यावर ह्याचे हाल कुत्रं पण बघेना असे झाले.
तो एकेदिवशी स्वतःहून बायकोकडे जाऊन म्हणाला, मी सुधारेन. तू सांगशील ते ऐकेन. तिनेही हे शेवटचं म्हणून त्याचं ऐकलं. नेहमीप्रमाणे घरात ठेऊन त्याला कुलूप लावून कामाला जाऊ लागली. असे पंधरा दिवस त्याने काढले, आणि म्हणाला आता मी कुठे काय करतो. नको ठेऊ कोंडून मला.
बायकोनेही बघूया म्हणून त्याला असंच सोडलं. पंधरा दिवस कोंडून राहिलेला तो बाहेर पडला तो पडलाच. परत घरी फिरकलाच नाही. बायकोने दोन तीन दिवस वाट पाहून पोलीस कंप्लेंट केली, पण तो सापडलाच नाही.
ना त्याचं काही वाईट झालेलं कळलं.
नातेवाईकांनी तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली. कुणी देणेकऱ्यांवर संशय घेतला तर कुणी चक्क त्याच्या बायकोवरच!! पण कुणालाही खोलवर त्याच्या भानगडीत पडण्यात इंटरेस्ट नव्हता. आपण पुढे जायचं आणि पर्जरण फुकटचं आपल्याच अंगावर शेकायचं, ही भीती जास्त होती.
त्याचं थंड शरीर समोर आलं असतं तर मात्र सगळे धाय मोकलून रडले असते. पण आज साधारण वीस वर्षे झालीयेत त्याला गायप होऊन, पण कुणी साधा टिपूस पण गाळला नाहीये त्याच्यासाठी.
मिसिंग म्हणून सोडून दिलं सगळ्यांनी त्याला तसंच………..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार : गुगल