ऑफिस सुटल्यावर मात्र कांचनने तिला अडवून पार्टी मागितलीच!! अवंतीची ती ऑफिसमधली खास मैत्रीण………
दोघी छानशा हॉटेलमध्ये गेल्या. कांचन तिला चिडवून चिडवून अगदी बेजार करत होती. विषयही तसाच होता ना!!
मधेच पटकन म्हणाली, अरे अवंती, फोटो तरी दाखवशील की नाही आता? बघू तरी कोण हँडसम शोधून काढलाय तो!! कांचनने असं विचारताच अवंतीने मोबाईलमधून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आशिषचा फोटो दाखवला, पण तो बघून कांचनचा चेहराच पडला.अवंती, ही तुझी चॉईस? तू इतकी देखणी मला वाटलं, कोणीतरी साजेसा निवडला असशील. किती आतुर होते मी फोटो बघायला!! राग नको माणूस पण मला नाही आवडला हा.
अवंती म्हणाली, तुला नाही आवडला हा, कारण तू फक्त याचा चेहरा पाहिलास मन नाही. तुझी प्रतिक्रिया स्वाभाविकच आहे. तो मला बघायला आला होता, तेव्हा मलाही तसंच वाटलेलं. कुठं मी आणि कुठं तो!!
पण तुला माहिती आहे का, यापूर्वी मी असंच चेहऱ्यावर भुलून एकाच्या प्रेमात पडले होते. त्याच्या एका नजरेने घायाळ झाले होते. क्षणाचाही विलंब न लावता हातचा जायला नको म्हणून मी त्याला होकार दिला होता.पण जशी त्याला भेटायला लागले, तसा त्याचा खरा रंग माझ्यासमोर उघडा पडत गेला.तो माझ्याबरोबर एकाच वेळी आणखी दोन मुली फिरवत होता. प्रेम वगैरे त्याच्या गावीही नव्हतं, त्याला घेणं होतं फक्त शरीराशी. ते मिळवायला तो स्वतःच्या रूपाचा वापर करत होता. सावध होते म्हणून त्याच्या जाळ्यात अडकले नाही एवढंच. पण त्याचं बिंग बाहेर आल्यावर त्याच्या घरी जाऊन चांगलाच तमाशा केला. आई- वडील बिचारे गुणी पोरग्याला पोरगी शोधत होते, त्यांना सगळे गुण दाखवून दिले पोराचे.
चेहरा पाहून तर पुरती फसले होते मी, म्हणूनच तोच पाहून नकार देताना दोन वेळा विचार करायचं ठरवलं. आशिष उत्तम शिकलेला होता आणि चांगल्या पोस्टवर देखील होता. पहिल्या नजरेत आवडला नसला तरी झटकून टाकण्यासारखाही नाही वाटला मला.
कांचन, तू आशिषला भेटशील तेव्हा तुला कळेलच. अगं, इतका छान बोलतो ना तो, की फक्त ऐकत राहावंस वाटतं. जवळपास प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे त्याला. अफाट वाचन आहे त्याचं. किती सुंदर कविता करतो तो!! आमच्या दुसऱ्या भेटीतच अगदी समोर बसल्या बसल्या माझ्यावर एक मस्त कविता करून ऐकवली त्याने. कित्ती भारी होतं ते!! चेहरा जरी खास नसला तरी त्याच्या व्यक्तीमत्वाने मोहवून टाकलं मला!!
कांचन, तुला माहिती आहे ना मला गायला आवडतं, पुढच्या भेटीत त्याची तिच कविता मी त्याला गाऊन दाखवली. तुला सांगते, तोपर्यंत कधीही त्याने मला उगाचच इम्प्रेस करण्यासाठी म्हणून कुठलीही कॉम्प्लिमेंट दिली नव्हती, पण माझ्या आवाजाला मात्र त्याने दिलखुलास दाद दिली. अन् एकमेकांना पूरक अशी आमची गट्टी त्याक्षणीच जमली.
सांग आता मला , अशा माणसाला मी फक्त चेहरा बघून नाकारलं असतं तर केवढी मोठी चूक ठरली असती ती!!
अवंती, चुकलंच माझं. मी देखील दुनियेसारखाच विचार केला. चेहरा बघून कित्येकदा फसतो आपण, तरी चेहऱ्यावरच भाळतो पुन्हा पुन्हा…….!! पण आता तुझं उदाहरण नेहमी माझ्या डोळ्यासमोर असेल.नुसता चेहरा बघून चांगलं वाईट ठरवण्यापेक्षा मी देखील समोरच्याच्या मनात डोकावून बघेन, आणि मगच काय ते मत बनवेन.
अवंतीला वाटलं, चला एकाला तरी कळलं बाई, हळूहळू का होईना दुनियेनेही समजून घ्यावं……..चेहऱ्यापेक्षा माणसाचं मन बघावं………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल