इतकं इतकं कोरोना कोरोना झालंय ना सगळीकडे की त्याशिवाय कोणाला काsही सुचतच नाहीये.
मोबाईल उघडून फेसबुकवर जावं, तर प्रत्येकवेळी नवनवीन माहिती समोर येते, आणि भीतीपोटी ती वाचावीच लागते. व्हाट्सपवर पहिले सगळे गुडमॉर्निंग करायचे उठलेकी, आता उठल्यापासून कोरोना कोरोना करायला लागलेत.
मेलं त्या कोरोनाला डोक्यात ठेऊन झोपायचं, आणि त्यालाच डोक्यात घेऊन उठायचं. कसली वट पसरवलीये त्यानी, सगळे दिवसरात्र त्याचंच नाव जपत बसलेत.
आता माझंच बघा ना, आज दुपारी पोरगं पाच पाच मिनिटाला येऊन कागदाचं विमान बनवून घेत होतं, मी कोरोनाबद्दलचा लेटेस्ट व्हिडीओ बघत होते, त्याला विमान बनवून देऊन देऊन वैताग आला होता, त्यात कोरोनाचा किडाही डोक्यात वळवळत होता, माझ्याही नकळत त्याच्यावर ओरडून म्हणाले, मी तुला एकही कोरोना बनवून देणार नाही हा आता!!
पोरगा म्हणाला, कोरोना? कोरोना कुठं मागतोय? मला तर विमान हवंय बनवून!!
पोरगी म्हणाली, मम्मी येडं केलं ग तुला करोनाने……
मी म्हटलं, मलाच नाही ग सगळ्यांनाच येडं केलंय त्याने!!
माहितीये का, लहान मुलं आता त्यांच्यात भांडणं झाली की एकमेकांना संबोधून म्हणतात, एs कोरोना व्हायरस निघ चल इथून……..
गावच्या नातेवाईकांचा फोन आला की अगोदर आम्ही कसे काय म्हणून विचारायचे, आता तुमच्याकडचा कोरोना कसा काय हे पहिले विचारतात.
मैत्रिणीचा फोन आला की आमच्या तासनतास गप्पा चालयाच्या, हॉट विषय असायचे, नवरा, सासू, पोरबाळं, आणि आता कोरोना कोरोना करत उसासे टाकत बसतो फक्त.
ऑफिसमधला कोरोना काय म्हणतो, शाळेतला कोरोना काय म्हणतो अन् बाजारातला कोरोना काय म्हणतो यावर चर्चा चालते आता आमची.
नवरा आणि सासू त्यानिमित्ताने का होईना कsधी नsव्हे ते बॅक फुटवर गेलेत अगदी!!
सगळेजण त्यांचे सगळे रोग विसरून फक्त कोरोनालाच घेऊन नाचतायत. डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, कसंतरी होणं या नेहमीच्या कुरकुरींना आता बहुतेकजणांनी विश्रांती दिलीये आणि खोकला येतोय का, घसा दुखतोय, का ताप येतोय यावर बाssरीक नजर ठेवून बसलेत. अगदी मी पण !!
आता काल संध्याकाळी जरा भेळ खावीशी वाटली, पोरीला म्हंटलं, आण जा बरं जाऊन पळत, चमचमीत बनवायला सांग त्याला, मस्त खाऊया.
तर पोरगी शाहरुखच्या सुनो नाs सुनो नाs च्या तालावर गायला लागली,
कोरोना कोरोना……. कोरोss ना
मम्मी गरम खायचं आता, गार काही नाही. कोरोना जाऊन बसला असेल तर??
हो बाई खरंच, म्हणून मी पण भेळ खायच्या खुमखुमीला
तिलांजली देऊन गपगुमान उप्पीट बनवलं आणि कोरोनाच्या भीतीने माझ्यासकट पोरांच्या तोंडात बळेनेच कोंबलं.
दोन दिवसांपूर्वी नवऱ्याला लहर आली, म्हणाला चला बाहेर जाऊ जेवायला. माझ्याकडून ट्रिट तुम्हा सगळ्यांना.
दोन्ही पोरं खूष होऊन नाचायला लागली.
माझ्या चेहऱ्यावर मात्र उदासीची छाया पसरली.
नवरा म्हणाला, बये तुला काय झालं आता, आणखी काही डिमांड आहेत का??
त्याला म्हटलं; अरे, माझा पिढीजात खोकला महिनाभर चाललाय, आपल्या छोट्या पोराचे पिटुकले फ्रेन्ड्स येतात घरी, तेही मी जरा खोsक केलं की अचंबित नजरेने पाहतात माझ्याकडे.
चुकून माकून त्या हॉटेलमध्ये खोकल्याची नॉनस्टॉप ढास लागली तर तुझं काही एक न ऐकता कोरोनाग्रस्त म्हणून कितवातरी संशयित घोषित करून तिथल्यातीथे उचलून हॉस्पिटलात भरती करतील मला!!
घरीच मागवलं हो मग, पोरांची तोंडं पडली खरी, पण कोरोनाच्या दहशतीपुढे करणार तरी काय कोण??
अहो, कधी नव्हे ते, अगदी थंडीतही गरम पाणी न पिणारी मी ऐन उन्हाळ्यात गरमागरम पाणी प्यायला लागलीये, रात्री न चुकता चमचाभर हळद घालून दूध प्यायला लागलीये, चुकून माकून नरड्यात गेला असेल तर तिथल्यातिथे मुडदा पडावा त्या कोरोना व्हायरसचा म्हणून!!
घरातल्या सगळ्यांनाही ओरडून ओरडून सांगते मला फॉलो करा, पण एकजणसुध्दा चुकूनही मनावर घेत नाही.
ते सारखे सारखे हात धुऊन धुऊन सुद्धा हाताची सालटी निघायची बाकी राहिलेत आता!!
शिंक आली हात धुवा, खोकल्याची उबळ आली हात धुवा, शेंबूड येऊन रुमालाने पुसला तरी हात धुवा, मला तर काही न काहीतरी सारखं येतंच असतं बुवा,आणि कोरोनाग्रस्त नसताना देखील विषाणूने तोंडातून उडी मारली असेल तर, म्हणून भीतीने हात धुवावेच लागतातच अगणित वेळा!!
श्याss किती पथेटिक आहे हे सगळं!!
पोरं तर माझ्या जवळ फिरकेना झालीयेत हल्ली, त्यांनाही पकडून सारखी त्यांचे हात धुवत असते म्हणून!!
ये कोरोनापासून जल्द से जल्द छुटकारा मिलना जरुरी हो गया है रे बाबा……..कोरोना काय व्हायचा नाही, पण कोरोना कोरोना करून पूर्ण येडे व्हायचो आपण……..
आता त्यातल्या त्यात जास्तीची प्रिकॉशन म्हणून गोs कोरोना गोs कोरोनावाला फेमस मंत्र तसा दिवसभर तोंडात पुटपुटतच असते मी, (तुम्ही पण तेच करत असाल, अशी आशा आहे ) या ना त्या कारणाने कोरोना नामक क्रूरकर्मा घाबरून पळावा, एवढीच सदिच्छा, दुसरं काय??
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल