कशी आहेस, मधू??
मजेत
छान, अशीच मजेत रहा.
मधूच्या मैत्रिणीने कशी आहेस विचारल्यावर, मधूच्या तोंडून सटकन बाहेर पडल, मजेत. आणि ते बोलून झाल्यावर मात्र मधू बेचैन झाली,
हे काय बोललो आपण?
मनात दुःख असताना मजेत?
पूढे ती त्या फोनवर काय बोलत होती त्यात तीच लक्षच नव्हतं, तिला एकच टोचत होतं, मजेत कसं बाहेर निघालं आपल्या तोंडून???
जाऊ दे झालं ते झालं, तशी ती माझी चांगली मैत्रीण आहे, समजून घेईल मला.
मधू असं मनात म्हणायला आणि पुन्हा फोन वाजायला एकच गाठ पडली. आता तिला कोणाचाच फोन उचलायचा नव्हता. पण फोनही वाजायचा थांबतच नव्हता. शेवटी इरिटेट होऊन ती मोबाईल उचलायला गेली तर पुन्हा स्क्रिनवर त्याच मैत्रिणीचं नाव दिसलं.
आता काय राहिलं हिचं म्हणून जरा त्रासिकतेने तिने हॅलो केलं, तर तिची मैत्रीण म्हणाली, मुद्दाम फोन केला तुला परत. तुझ्या बोलण्यातून कळलं मला, मगाशी अचानक तुझं काय बिनसलं ते.
Its ok dear असू शकतेस तू मजेत!! किती दिवस दुःखाला कुरवाळत बसायचं. सारखं काही आपलं मन एकच ठिकाण पकडून बसत नाही. आणि तेच चांगलं आहे.
दुःख तर आत आहेच, पोकळी निर्माण झाली तीही आहेच, पण ठिक आहे. महिना झाला आता. तू नॉर्मल असू शकतेस.
मी तुला चांगली ओळखते, तुला कधीही फोन केला तरी कशी आहेस विचारल्यावर, बाय डिफॉल्टच तुझ्या तोंडून नेहमी मजेत हेच निघायचं. तसच निघालं आताही……
हो, खरंय तसच निघालं आताही. पण बाबा नुकतेच गेले आणि माझ्या तोंडात असं यावं, हे मलाच खटकलं.
माझा जीव होते ग ते, त्यांच्याविना मजेत नाहीये मी. पण आईसाठी भावना आवरून ठेवल्यात सगळ्या. आईसाठी दिवसभर सगळं विसरू पाहते, तिच्यासमोर गाणी म्हणते, तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगते, पण रात्र मात्र अंगावर येते ग…….फक्त बाबाच डोळ्यासमोर उभे राहतात, त्यांचं सारं सार आठवत राहतं. पहिले पंधरा दिवस तर झोपुच शकले नाही मी, आता कुठे जरा पहाटेला डोळा लागायला लागलाय.
आईला मी सावरतेय पण मला स्वतःच स्वतःला सावरणं कठीण झालाय.
दिवसभर शक्य तितक विसरायचा प्रयत्न करते मी, विषयच काढत नाही, पण मनात ठसठसत असतच सारखं. एक क्षण येतोच दिवसातून एकदा जो जाणवून देतो, बाबा नाहीत आता, खरंच बाबा नाहीत आता???
काळजात मोठा खड्डा पडल्यासारखं होतं, वाटतं आपणही सोडून द्यावं या जीवाला, मग आई डोळ्यासमोर येते, आणि आवरावं लागत स्वतःला………
आणि एवढं सगळं वाटत असताना माझ्या तोंडून यावं मजेत आहे???
मधू, कळतंय मला. पण खरचं आता बाहेर पड यातून. मजेत राहा, तेच आवडेल बाबांनाही. तू अशी दबलेली राहशील तर त्यांना शांती मिळेल का? हसरी खेळती हो, पुन्हा पूर्वीसारखी मोकळी हो, बाबा तुझ्यातच आहेत समज, ते बघतायत असंच समज. जवळची व्यक्ती शरीराने सोडून गेली, तरी ती क्षणोक्षणी आपल्या मनात वास करतच असते. तिच्या आठवणीत सतत झुरण्यापेक्षा त्या आठवणींना धरून खंबीर हो. बाबा बघतायात असं समजून त्यांना पुन्हा फुलून दाखव, ते कसे जिंदादिल होते एकदम. तू ही तशीच तर आहेस, त्यांच्या मागे तू सारं काही त्यांना आवडायचं तसंच आलबेल ठेवलं आहेस ते दाखव.
तू मजेत रहाच आता, चुकून का आलं असेना तोंडात, पण दुःखाचा एक ठराविक काळ सोसल्यानंतर मजेत राहणं, स्वतःला मजेत ठेवणं ही गरजच आहे माणसाची, नाहीतर ते दुःख गिळूनच टाकेल त्या माणसाला.
आता बाहेर पडच……….पुढच्या वेळेला चुकून नको, अगदी पहिल्यासारखचं मजेत आहे हेच ऐकायचय मला, कळलं??
मधूने हो नक्की म्हणून फोन ठेऊन दिला, तसं मनावरचं खूप मोठं ओझही कुठेतरी ठेवल्यासारखं वाटलं तिला, मोकळं मोकळं वाटलं अगदी. कुठल्यातरी गर्तेत ओढली जात असता कुणी हलकेच हात देऊन सावरल्यासारखं वाटलं तिला.
खरंच, असं एकतरी मैत्र जपावं प्रत्येकानेच मरगळलेल्या मनाला उभारी देणारं, मनाच्या अगदी आरपार ओळखणारं …..!!
हो ना??
©️ स्नेहल अखिला अन्वित
हो ना. मैत्र जपावेच.
सुरेख मांडणी.
खूप धन्यवाद😀
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Khup mast
आपल्या जीवनातून जवळच्या व्यक्तीचं निघून जाणं हेच मुळी धक्कादायक व पोकळी निर्माण करणारं असतं. अशा वेळी सकारात्मक विचार व उर्जा मिळणं गरजेचं असतं. मृत्यू हे सत्य आपण स्वीकारत नाही.
छान गोष्ट लिहिली आहे. मला आवडली. सकारात्मक प्रेरणा देणारी कथा.