माझ्या लहानपणी घरातली सगळी मोठी लोकं येऊन जाऊन सारखी म्हणायची गणिताकडे लक्ष दे हं, गणितं कठीण असतात. मोठ्या मोठ्या इयत्तेत जसं जाणार तसा गणित विषय कठीण होत जाणार बरं का!!
गणितं कठीण जायला नको म्हणून पाढे अगदी रोजच्या रोज घोकून घ्यायची मंडळी. त्या पाढ्यांनी तर जीव नको नकोसा केलेला त्यावेळी. बाराव्या पाढ्यापर्यंत बऱ्यापैकी वेगात असणारी गाडी, तेराच्या पुढे रखडत रखडत कsशीबsशी वीस पर्यंत पोचायची.
पण एकंदरीतच सारखं गणिताबद्दल ऐकून एकून गणिताचा बागलबुवा मनात शिरला, आणि गणित हा विषय महाकठीण हे मनानं धरूनच ठेवलं.
पहिली दुसरीत, अगदी चौथीपर्यंत गणिताने तसं ऐकूनच घाबरवलं, प्रत्यक्षात एवढं नाही. पण पाचवीत मात्र काय झालं कुणास ठाऊक, गणित आणि सायन्स या विषयाशी अजिबात जमेना झालं. त्यांच्याशी जमेना म्हणून ते विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशीही जमेनासं झालं. त्यांना बघितलं की का कोण जाणे त्यांचा उगाच रागच यायचा. त्यांच्याच पिरियडला कसंतरी व्हायला लागायचं, कणकण जाणवायची, पोट दुखू लागायचं. आणि त्या वेळी आमच्या साताऱ्याच्या शाळेत बरं वाटत नसेल तर पडून राहण्यासाठी शाळेच्या कार्यालयात खास छोटा बेड होता, मी या विषयांना स्वतःला बरेचदा तिथेच पाडून घ्यायची.
जोडून दोनदा लागोपाठ तास असतील तर त्या दिवशी झोपेतून उठतानाच बरेचसे रोग जडल्यासारखं व्हायला लागायचं, आणि घरचे पटले तर दांडीच असायची.
पाचवी कशीबशी सुटले, पाचवीपर्यंत मी साताऱ्याला होते, सहावीत ठाण्याला आले. सहावीत इतर विषय त्यामानाने चांगले चालले होते, पण गणितं काही केल्या सुटायचं नाव घेईनात. ना घरी, ना शाळेत, ना शिकवणीत, सगळीकडे नुसता बट्ट्याबोळ!!
पोरगी सहावीत गटांगळ्या खात बसणार, घरचे समजून चुकले. पण वार्षिक परीक्षेच्या प्रगती पुस्तकात मात्र “वरच्या वर्गात ढकलली” असा शेरा मिळाला, आणि आमच्या घरात आनंद पसरला. ढकलून सुद्धा वरच्या वर्गात जाईन ही अपेक्षाच नव्हती कोणाला, पण बाकी सर्व विषयांचे मार्क बघून माझ्यावर दया दाखवली गेली होती.
सातवीचे दिवस सुद्धा गणितात चाचणीत कधी दोन कधी चार तर सहामाहीत पंधरा पर्यंत जाऊन सरत होते.
तेव्हढ्यातल्या तेवढ्यात दोन शिकवण्या पण बदलून झाल्या होत्या. पण कोणालाही माझ्या डोक्यात गणितं भरता आली नाहीत ती नाहीतच.
आम्ही चाळीत राहत होतो, आणि माझ्या एका मैत्रिणीने तिच्या ओळखीच्यांंकडे नुकतीच नवीन शिकवणी लावली होती. माझ्या घरचे शिकवणी शोधत होतेच, मग ती जातीये म्हणून मीही तिथे जायला लागले. आणि त्या नंतर मी जातीये म्हणून आणखी दोघं आली, त्यांच्यामागोमाग आणखी, असं करत करत आमच्या चाळीतूनच वेगवेगळ्या वर्गातली बरीच जणं त्या शिकवणीला जायला लागली.
सातवीच्या एडींगला मी तिथे जायला लागले होते.
गणिताचं मडकं पूर्ण रिकामं होतं. सातवीत तसं फारसं ते भरलं गेलं नाही.
पुन्हा गणितामुळे वरच्या वर्गात ढकलले हाच शेरा मिळाला, आणि घरच्यांना काही का होईना पास तरी झाली, म्हणून बरं वाटलं.
अति अपेक्षा करणं आमच्याच काय पण माझ्या बघण्यातल्या इतरही घरी कोणाला माहीत नव्हतं त्यावेळी…….
शाळेत मी यथातथा म्हणून होते, बाकीच्या विषयात चांगली आणि गणितात दssगssड.
आठवीत तिच शिकवणी सुरू झाली. बाई आवडल्या म्हणून.
पण आता मात्र गणितं हळहळू डोक्यात शिरायला लागली.
बाई म्हणायच्या गणितं म्हणजे ट्रिक्स आहे, काही घाबरायचं कारण नाही. मज्जा येईल कळायला लागल्यावर.
आणि खरंच हळूहळू मज्जाच यायला लागली. त्या गणितातले महत्वाचे फॉर्म्युले त्या मस्त तालात म्हणून घ्यायच्या, तो ताल आणि ती तंत्र अजून लक्षात आहेत.
“अधिक वजा वजा, वजा वजा अधिक, चिन्ह मोठ्या संख्येचं….”
असे बरेच काही…….
फॉर्म्युले डोक्यात फिट झाले, ट्रिक्स कळायला लागल्या, सगळं सुकर होऊ लागलं. आणि बघता बघता गणित हा विषय माझा फेवरेट झाला. वाटायला लागलं अरे इतकं तर सोप्प होतं.
खरंतर सोप्प होतं, पण ते सोप्प करून सांगणार कोणी भेटलं नव्हतं. एवढी जादू झाली की गणितात फक्त दोन ते चार मार्क मिळवणाऱ्या माझी मजल गणितात जवळपास पैकीच्या पैकी मार्क मिळण्यापर्यंत जाऊन पोचली.
गणित विषय सर्वात आवडता झाला. सर्वच चटाचटा सुटायला लागलं. मज्जा यायला लागली. माझ्या त्या शिकवणी मधल्या बहुतेक सर्वांची स्थिती हिच होती.
कारण आम्हाला तो हात मिळाला होता. आम्हाला समजून घेणारा, आमच्या खोचा ओळखणारा, आणि अवघड काही नसतं असा विश्वास आमच्यात निर्माण करणारा……..
आम्ही सर्व एन्जॉय करायचो ती शिकवणी, जिने आम्हा सगळ्याचं लाईफ बदलून टाकलं. ‘ढ’ वर्गात मोडणारे आम्ही हुशारात गणले जाऊ लागलो.
आजही जेव्हा मला कोणी म्हणतं, आमच्या पोराचं डोकं चालत नाही. ढब्बू आहे नुसतं.
तेव्हा मी म्हणते; छे, ढब्बू वगैरे कोणी नसतंच. तो हात मिळायला हवा फक्त, सारं काही सुटकं करून सहज समजवणारा.
मग बघा गाडी कशी धावेल ती………
एकतर तो हात शोधा तरी नाहीतरी तुम्ही स्वतः थोडे कष्ट घेऊन तो हात बना तरी……
पण मुलांना ढब्बू नका बोलू, कारण ढब्बू बिब्बू कधी कोणीच नसतं………..!!
फोटो साभार: गुगल
©️स्नेहल अखिला अन्वित
कथा आवडल्यास माझ्या हल्ला गुल्ला या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा……..