काल जे घडलं ते मला अजिबात आवडलं नाही, मंगेश…….
का? काय असं वेगळं घडलं काल?
मी बोलत होते, तर खसकन् ओढून घेतलास तू फोन माझ्या हातातून. आणखी किती वर्ष चालणार आहे असं?
आपल्या रक्ताच्या नात्याशी कसलं ते वैर धरायचं?,
श्रावणीचं हे बोलणं ऐकून मंगेश एकदम उसळुन म्हणाला, आम्ही सगळी नाती तोडलीयेत. हद्दपार केलंय तिला आमच्या जीवनातून आणि या गावातूनही, किती वेळा सांगायचं तुला, का समजून घेत नाहीस तू? का तुला पुळका तिचा? एवढी कोण आहे तुझी ती?
श्रावणी म्हणाली, मी या घरात आले, तेव्हा ती माझी नणंद होती, मग ती माझी चांगली मैत्रीण झाली. तिच्यामुळेच रमले मी या घरात. तुझं अन् तिचं नातं पण खास होतं रे…….एकत्र वाढलात ना दोघं तुम्ही?
एवढी परकी झाली ती तुला? तोंडही पहावासं नाही वाटत तिचं?
हे बघ श्रावणी, तिने चुकीच्या मुलावर प्रेम केलं. पळून गेली आणि पूर्ण गावासमोर आमची मान खाली घातली. तिला गावात घेतली तर, बाकीच्या पोरींना पण चेव चढेल, मंगेशने तावातावाने आपली बाजू मांडली.
पण श्रावणी त्याचा मुद्दा खोडून काढत म्हणाली, तो चुकीचा वाटतो ते तुम्हाला. जाऊन बघितलं का कधी, काय थाट आहे तिचा? चांगला उच्चशिक्षित आहे, स्वभावानेही चांगला आहे. शिवाय घरदार, शेतीवाडी आहे, आणखी काय हवं?
पण जातीतला नाही ना? ते सर्वात गरजेचं होतं, मंगेश तोऱ्यात बोलला.
कुणासाठी? तुमच्यासाठी की गावासाठी?
मंगेश, तसं तर आपलंही लव्ह मॅरेज. तू माझी जात चेक केली होतीस का रे? ती चेक करूनच हिला आवडून घ्यायचं की नाही ते ठरवलं होतंस का?
खरंतर मीच चुकले, मीच तुला हो म्हणायच्या अगोदर ‘जात’ चेक करायला पाहिजे होती. तुमची मोठी असेल, पण माझी तर जात तुमच्याहूनही मोठी होती. माझ्या घरच्यांनी विरोध केला असता तर? नाही केला, तेव्हा तुम्हाला ते मोठ्या मनाचे वाटले!!
पण असं नाही का वाटलं आपणही होऊया तसे?
नावं आमच्याकडेही ठेवली गेली होती, पण आम्ही सर्व एकजूटीने सामोरं गेलो त्या सगळ्याला.
श्रावणीचं ऐकून मंगेश आवाज वाढवून म्हणाला, तू आता उगाच काहीही खोदून काढू नकोस. मलाच नाही आईबाबांना पण नकोय ती. तिडीक जाते डोक्यात त्यांच्या, तिचं नाव काढलं की!!
श्रावणी शांततेने म्हणाली, मला नाही वाटत. तू स्वतःहून विषय काढ प्रेमाने, समजतील ते. तुझा राग बघून तेही निमूट बसले असतील. तिचं नाव काढलं की आईंचे डोळे तर भरून येतात, कितीदा पाहिलंय मी. तू एकदा बोल तर त्यांच्याशी, एका पायावर तयार होतील तिला पुन्हा जवळ करायला. म्हातारपणी कसले रुसवे फुगवे धरून ठेवायला लावतो त्यांना…….मोकळं कर ना त्यांनाही……
अगं तुला कळतय का श्रावणी काय बोलतेस तू?सांगितलं ना तिला हद्दपार केलंय, पूर्ण गावाने सुद्धा. कोणाकोणाला समजवायला जाऊ मी? तिला घरात घेतली तर आम्हाला वाळीत टाकतील लोकं, मंगेश आपला हेका सोडायला तयारच नव्हता.
मग अशी रक्ताची नाती तोडायला सांगणारा गावच सोडून देऊया आपण. गावासाठी आपला माणूस तोडायचा?
मागच्या वेळी त्यांच्या गावात गेलो होतो कामानिमित्त, ती सामोरी आली, तिच्या त्या एवढयाशा मुलाने ‘मामा’ अशी हाक मारली, तर तू मान फिरवून घेतलीस. असलं कुठलं रे काळीज तुझं? त्याक्षणीच तुला सोडून द्यावसं वाटलेलं मला. नुसता जातीचा मोठेपणा काय कामाचा? मनही मोठं हवं ना?
मंगेश, आपण तिच्या पाठीशी उभे राहिलो तर गाव काही बिघडवू शकत नाही आपलं. गावाने पण सुधारणं गरजेचच आहे तसंही, होऊ दे एकदाचा काय धिंगाणा व्हायचा तो. मात्र तिच्या हक्काच्या घरात पुन्हा तिचं मोठ्या मनाने स्वागत करूया आपण. असं कसं आपल्याच माणसाला तोडून टाकायचं, कायमसाठी हद्दपार करून टाकायचं?
तिच्या बाजूने विचार करून बघ. स्वतःला तिच्या जागी ठेऊन बघ जरा……..
खूप झालं आता, काहीतरी स्टँड घे. मलाही विचार करावा लागेल नाहीतर. मी जातीकडे दुर्लक्ष करून मन बघितलं होतं. पण तेही एवढं कद्रु असेल असं वाटलं नव्हतं…….
बास झालं ………..
घे फोन, बोल तिच्याशी. सांग घ्यायला येतोय मी लवकरच तुला.
श्रावणीच्या बोलण्याने भारावून जाऊन मंगेशने फोन लावला आणि त्याच्या तोंडून त्यालाही नकळत बाहेर पडलं, बाहुले तुला घरातून, गावातून हद्दपार केलं, पण मनातून नाही करू शकलो अजून. मी येणार आहे तुला सन्मानाने परत आणायला. तुझ्यासाठी भांडणार आहे गावाशी सगळ्या…… तू येशील ना पण माझ्याबरोबर?
बाहुलीच्या डोळ्यातुन अनावर पाझरत असलेलं पाणी थांबलं असतं तर काही बोलता आलं असतं ना बाहुलीला!! तोंडातून फुटणाऱ्या हुंदक्यांना दाबत दाबत ती नुसतं हुं…. हुं….. करत होती, आणि तिकडनं तिचा भाऊ, तिची आई, तिचे बाबा आणि लाडकी मैत्रीण इतक्या वर्षांचं साचलेलं काय काय बोलत बसले होते, कित्ती कित्ती वेळ………..
अजूनही बाहुलीसारख्या बऱ्याच मुली वाट पाहतायत आपल्या घरच्यांकडून हाक यायची, ही कथा त्यांच्यासाठी……….
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला लाईक आणि फॉलो करा.