कित्ती ग गुणाची माझी पोरगी ती, असं म्हणत चैत्रालीने चहाचा भुरका मारला. अन् म्हणाली, खरंच बाई घरचा चहा तो घरचाच. हो किनई हो? तिने बाजूला शांतपणे चहाचा घोट घेणाऱ्या नवऱ्याला विचारलं.
मला काही पिचकवणी वगैरे लागला नाही. हिची आपली फार नाटकं, दुसरं काही नाही. एवढं बोलून त्याने टिपॉय वरचा पेपर उचलला आणि आपल्या तोंडासमोर वाचायला धरला.
त्यातून लग्नाला माणसं पण तशी जेमतेमच होती, फार तर फार दीडशेच!!
तिच्यापासून लपु म्हणता लपताही येईना झालं हो अगदी!
आई थंड घे. बाबा तुझं काहीएक ऐकत नाही आहेत, मनुलीने हसून फुसकुली सोडली.
चैत्राली तोंडं मुरडून म्हणाली, त्यांचं असच. आम्हा बायकाना तसं करता येत असतं तर कित्ती बरं झालं असतं!!
बरं ते जाऊदे. नवऱ्या मुलीने अगदी लालभडक कलरची साडी नेसली होती. त्यावर ते सगळे सोन्याचे दागिने. भरपूरच सोनं घातलेलं दिसत होतं मुलीकडच्यांनी. तोडे, बांगड्या लकाकत तरी होतं सोन्यासारखं. खरं खोटं देव जाणे!!
पण नेकलेसची डिझाइन मस्त होती ग. तुझ्या लग्नात तुलाही तसाच करू आपण. तुझी फार आठवण काढत होते सगळे. तू यायला हवं होतंस.
आई परीक्षा होती ना माझी? कशी येणार मी?, मनुली दोन्ही भुवया वर करत म्हणाली.
जेवणही तसं बरं होतं. त्या पनीरच्या भाजीत मीठ जरा जास्त वाटलं मला.
पुऱ्या चिवट होत्या तशा, पण बासुंदी चवीला छान होती मात्र. मी तीन वाट्या रिचवल्या.
बोलता बोलता चैत्रालीने ओठांवरून जीभ फिरवली आणि मधेच जोरात ओरडून म्हणाली, तुला ती चारु काकी आठवते का ग? मुलीला घेऊन आलेली तिच्या. काय तो तिचा ड्रेस. केवढा डिप तो गळा होता. आया सांगत कशा नाहीत यांच्या कुणास ठाऊक?
अन् ती साखरवाडीच्या आत्याची मुलगी. काय नाव. तोंडावर येत नाही लगेच.
ऋतुपर्णा!! काय झालं तिचं? चार महिन्यापूर्वीच लग्न झालं ना ग, आली होती ती?, मनुलीने आनंदाने विचारलं
तशी चैत्राली चुटुकन् म्हणाली, न यायला काय झालं? चांगली मिरवत होती नवऱ्याबरोबर.
अगं एका मिनिटासाठी पण नवऱ्याचा हात सोडला नाही तिने. बरं नाही दिसत, सारखं काय आपलं चिकटून बसायचं. स्वतःच्या लग्नाचाच शालू घातलेला. तिचं मंगळसूत्र एका वाटीचंच आहे अगं!!
असेना का? तुला काय आई. कुठे कुठे लक्ष घालशील ना, तुझं तुलाच माहीत. मनुलीला आईची गंमत वाटत होती.
मी कशाला मुद्दाम वाकून बघायला जाते. माणूस समोर आलं की नजर जातेच चोहीकडे. तिच्या लग्नाला जाता आलं नव्हतं ना आपल्याला. फोटोत मला दोन वाट्या दिसल्या सारख्या वाटल्या होत्या. आता एकच दिसली. दोन वाट्यांच चागलं दिसतं नाई? काय हो?
मला विचारतेस? मी नाही ग बघितलं बाई काही…..तिचा नवरा पेपरमधून डोकं बाहेर काढून म्हणाला.
तुमचं कधी लक्ष असतं कुठं? तुमच्या त्या पुण्याच्या भावाची ढेरी किती वाढलीये, ती तरी दिसली का? म्हणून म्हणते व्यायाम करा, नाहीतर तुमचं पण तसच व्हायचं.
मी लग्नाला गेलो होतो. कुणाच्या सुटलेल्या ढेऱ्या बघायला गेलो नव्हतो. तूच म्हटलीस ना मगाशी, ज्या कार्याला गेलो ते करावं माणसाने. आपल्या बाबांच्या तोंडातून चतुर चाणाक्षासारखा नेमक्या वेळी पंच सुटलेला बघून मनुली जोरातच खिदळली.
नको ते बरं कानावर पडतं आणि लक्षात राहतं हो तुमच्या, असं म्हणत चैत्राली मुद्दामच त्याला डिवचायला म्हणाली, मग त्या श्रीकांतची गाडी तरी दिसली की नाही? वयाने तुमच्या एवढाच असेल नाही तो, पण BMW घेतलेली दिसतेय नवीन. आपल्या खटाऱ्याला दहा वर्ष होतील आता.
बायकोची स्किन अगदी तुकतुकीत होती त्याच्या. पार्लरच्या व्हिझिट करत असणार रेग्युलर, त्याशिवाय काय एवढं?
तू पण कर की तुला कोण नको म्हटलंय. काय हो बाबा?
मी काही बोलतो का कधी?
चैत्राली वरून म्हणाली, जाऊदे. आम्हाला नाही तसले शौक. मात्र मनात म्हणाली, मी दोन छानशा साड्या घेईन त्यात.
आई आई आई, धन्य आहे तुझी आई. एका लग्नात कित्ती कित्ती गोष्टी तुझ्या डोक्यात भरून आलीस ग!!
आणि बाबा तुम्ही हो? तुम्ही काय काय पाहिलत सांगा बरं?
मी आपला कार्य चोख बजावून आलो नुसता. बाकीचं काय करायचंय मला?
अगं त्यांना काय विचारतेस? लग्न त्यांच्याकडचं होतं. तरीसुद्धा खुर्चीवर बसल्या बसल्या डुलक्या काढत होते महाशय. बाकी सगळं बघता बघता एक डोळा त्यांच्यावरही ठेवावा लागत होता मला. पेंगले की जाऊन हलवून यायचे मी. त्यांच्याबरोबर आणखी दोघातिघांना पण कोपरा मारायचे जाता येता. सगळे आपले उदासीन. लग्नात आले तरी तोंडं पोचवायला आल्यासारखी.
सारखं उगीच दात दाखवत फिरता येत नाही बाई आम्हाला तुम्हा बायकांसारखं!!, तिच्या नवऱ्याने तिचा मुद्दा खोडून काढायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला.
त्यावर चैत्राली ठसक्यात म्हणाली, तुम्हाला आम्हा बायकांसारखं काहीच येत नाही. तुमची नाती पण आम्हीच धरून ठेवतो म्हटलं. तुमच्या सगळ्या बहिणीभावंडांशी, काका काकूंशी, मामी मामांशी मी अगदी स्वतः जाऊन दोन शब्द बोलले कळलं.
तुम्ही जेवलात की रेवलात लगेच. खुर्च्याबिर्च्यात कशी तंद्री लागते या पुरुषांची कोण जाणे!!
तुम्हाला कमी तुमची माणसं मला जास्त ओळखतात. माझ्या बोलघेवड्या स्वभावामुळं आणि तुमच्या भाषेत उगीचच दात दाखवत फिरण्यामुळं, कळलं!!
बाबाचं माहीत नाही, मला मात्र कळलं आई. ते तुमचं काहीही असो, माझा भारी टाईमपास झाला. मला यायला नाही मिळालं, पण तू मला घरबसल्या लग्नात फिरवलं. तू नेहमीप्रमाणे तुझी सगळी कार्य चोख बजावलीस आई! I am proud of you!!
लेकीचं ऐकून चैत्राली टेचात नवऱ्याला म्हणाली, बघा हो बघा. ऐकलं का पोरगी काय बोलली?
नवऱ्याने एकदाचा पेपर बाजूला टाकला, आणि डोळा मारत म्हणाला, पोरगी काय मीही म्हणतो, I am proud of you!! आणि लव्ह यू सुद्धा.
नवऱ्याच्या त्या वाक्याने जादू झाली, एवढ्या वेळ त्याला दूषणं देणारी चैत्राली त्याच्याकडे बघून गोड गोड लाजली अन् खुदकन हसली………..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
खूप छान वर्णन