बालपणातील सर्व गोष्टी मनावर अगदी ठसल्याच जातात; चांगल्याही आणि वाईटही…….
त्या आठवणी अगदी कायम मनात भुंगा घालत राहतात; प्रत्येक गोष्टीशी वेगळीच अटॅचमेन्ट असते.
त्यातलीच एक आठवण आहे माझ्या बालपणी हाताळलेल्या फुलांची, त्याच्या सुंगधाची, त्यांच्या रंगांची. फुलं कोणतीही असो, आपल्या मोहकतेने सर्वांना आकर्षितच करतात. अशाच काही फुलांशी माझा कायमचा भावबंध जुळलाय माझ्या लहानपणापासून……..
माझ्या शाळेत जाण्याच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता, त्याच्या कडेला ह्या फुलांची मोठ्या मोठया पसरट पानांची झाडे होती, आणि त्यावर आलेल्या ह्या फुलांचे गुच्छ. हजारी मोगरा…….माझा सर्वात आवडता, खूप मारामारी करून ती फुलं मला मिळायची, सहजासहजी काढणं शक्य नव्हतं, पण मिळाली की डोक्यात गजरा घालून त्यांचा वेडं करणारा सुगंध अनुभवत राहायचं.
आता मला बघायला पण नाही मिळत तो…..पण आठवणीत मात्र रोज येतो….माझा खूप खूप लाडका हजारी मोगरा……प्रत्येक क्षण आठवतात याच्याबरोबरचे आणि तो सुगंध ही दरवळतो त्याबरोबर!!!
त्यानंतर आठवते ती गुलबक्षी…..आमच्याच अंगणातली; माझ्या आज्जीने लावलेली. राणी कलर, पिवळा, पांढरा, लालसर कितीतरी मनमोहक छटा. आजी एकात एक देठ दुमडून छान वेणी करून द्यायची.
हया फुलांचं झाड मात्र मी जिथे दिसेल तिथुन त्याच्या बिया मागून लावतेच….आत्ताही लावलेलं आहे माझ्याकडे ते, माझ्या आज्जीची आठवण आहे ती.
सदाफुली आणि गोकर्ण हेही कायम माझ्याकडे असतात, आज्जीलाच भेटत असते मी यांच्या रुपात. गुलबक्षीच्या सोबतीला नेहमी बहरलेले बघितलेत लहानपणी.
कोरांटीची फुले ही अशीच मला खुणावणारी; निळी, जांभळी, पिवळी, भगवी, पांढऱ्या रंगाची….. याचाही एक हलका वास होता, माझ्या आठवणीत आहे तो अजूनही!!
खूप गजरे घातलेत याचे लहानपणी. आमच्याकडे नव्हती पण ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडून बिनदिक्कत मिळायची. तशी ती कुठेही वाढणारी. जाडजूड गजरे व्हायचे यांचे…… खूप हौस होती गजऱ्यांची त्यावेळी….रोज शाळेत जाताना गजरा लागायचाच. मिळेल त्या फुलांचा. स्वस्तिकाच्या फुलाचेही गजरे अगदी आवडीने घातलेत.
आता मुलीच्या शाळेत मात्र गजरा नॉट अलाऊड आहे म्हणे☺️
आता बोलूया माझ्या चाफ्याविषयी. पिवळ्या नाही माझा जीव गुंतलाय पांढऱ्या चाफ्यात. शाळेजवळ त्याचं झाड होतं, येता जाता फुलांचा सडा पडलेला असायचा….आम्ही त्याच्या अंगठ्या बनवून बोटात घालत बसायचो. त्या झाडाची आणि फुलांची खास जागा आहे मनामध्ये………
आता मुलांना शाळेत सोडायच्या वाटेवरही आहे उभा माझा हा सखा …..जातीत फरक आहे थोडा पण गंध मात्र तोच माझ्या बालपणीचा. पडलेली फुलं उचलणं चालू आहे अजूनही, त्यांच्या स्पर्शात, वासात बालपण आहे ना माझं हरवलेलं…….
इतकचं काय तर घाणेरीची फुलंही आवडायची मला, डोक्यात घातली की उवा होतात म्हणून कोणी घालू द्यायचं नाही. जिथं तिथं डोलत असायची, सुंदर रंगात.
अशीच आणखी जवळची म्हणजे तेरड्याची फुले. हरतालिकेला, मंगळागौरीला शोधून आणायचो आम्ही.
खूप आवडायची मला, त्यांचाही वास आहे आठवणीत अजून.
त्या वेळी फुलपुडी आलेली किंवा कुठे जाऊन फुलं विकत आणलेली आठवतच नाहीत कधी. गणपतीला, हरतालिकेला, मंगळागौरीला किंवा कुठल्याही पूजेला ज्यांच्या घरी जास्त फुलांची झाडं असतील, तिथे जाऊन त्यांना विचारून फुलं घायची, आपणच हवी ती तोडायची….कित्ती मज्जा!!!
आमच्या घरासमोरच एक बंगला होता आणि त्यांची भली मोठ्ठी फुलांची बाग. मंगळागौरीला आणि हरतालिकेला पत्री आणि फुलं आणण्यासाठी मी मामीबरोबर जायचे तिथे…….तेव्हा मोबाईल असता तर फुलांच्या ताटव्यातले कित्ती फोटो काढले असते!!!
पण नव्हता, म्हणूनच तो आनंद वेचता आला मनमुराद. आठवणीत घट्ट रुतून बसला कायमचा. त्या बागेतली सगळ्या प्रकारची फुलं मनात डुलत बसलीयेत आनंदाने, अगदी कायमसाठी.
हिच ती सारी फुलं आहेत, जी मला कधी कुठे अवचित दिसली तर मी खूप खूप आनंदाने त्यांना कुरवाळायला जाते, अगदी जवळचं कोणी भेटल्याचा आनंद होतो मला!!!
बहुतेक सारी मला भेटतात कुठे न कुठे, काहींना घरीच आणून खिडकीची शोभा वाढवलीये……..भेटत नाही तो फक्त माझा हजारी मोगरा ………!!!
यावेळी साताऱ्याला गेल्यावर शाळेच्या वाटेवर मुद्दामच जाऊन बघणार आहे, तो आहे का तिथेच त्या ओढ्याकाठी पसरलेला की त्यानेही आपलं मूळ सोडून कुठे नवीन पसारा मांडलाय माझ्यासारखाच😊
तुमच्या मनात सुद्धा आहे का हो असा बालपणीच्या आठवणीतील फुलांचा फुलोरा फुललेला???
(अगदी मनासारखे माझ्या फुलांचे फोटो मिळाले ते श्रेय गुगलचे बरं😊)
©️ स्नेहल अखिला अन्वित