राजेशच्या घरातली ही पहिलीच दिवाळी अशी होती, जिथे घरात प्रियाचा नेहमीसारखा उत्साह ओसंडून वाहत नव्हता. नाहीतर दसऱ्यापासूनच दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू व्हायची. ऐन दिवाळीच्या तोंडावर गर्दी म्हणून हे रोज थोडी थोडी शॉपिंग करायला घ्यायचे.
अगोदरच शॉपिंग म्हणजे प्रियाचा जीव की प्राण, त्यात दिवाळी म्हटलकी जोरदारच असायचं सगळं. अगदी काही पैशाचा चुराडा नाही, पण जरा उत्साहात हात सुटायचाच तिचा!!
सहा वर्षाचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी दोघांचीही मनभरून हौस करायला आवडायचं तिला.
पण यावेळी तिचा उत्साह कोणीतरी ओढून घेतल्यासारखा वाटत होता. पोरं मात्र दिवाळी आली, आली दिवाळी आली करत ओरडत फिरत होती. त्यांची दिवाळीची स्वप्न काही वेगळीच होती. त्यांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडेच होतं. प्रियाला दिवाळी तर आली पण नेहमीसारखी नसणार, काहीच हौस मौज करता येणार नाही म्हणून विरस वाटत होती.
राजेश गेल्या सहा महिन्यांपासून घरी होता. तसा तो प्रायव्हेट कंपनीत का होईना पण चांगल्या पोस्टवर काम करत होता. पण मंदीच सावट काय आलं, वरिष्ठांची हांजी हांजी न करता कामाशी काम ठेवणारा, त्यांच्या डोळ्यात खुपणारा तो निमित्तमात्र झाला, आणि त्याची नोकरी गेली.
हे घडणार याची कुणकुण त्याला होतीच, पण आपण चांगलं काम करून तोंडं बद करू असं त्याला वाटायचं.
त्याचा अंदाज चुकला.
प्रियाला सांगितलं तसा तिने त्याला धीरच दिला, काही काळजी करू नको, होईल सर्व नीट. सेविंग्ज आहेत आपले, तोपर्यंत तुला आरामात दुसरी नोकरी मिळेल.
खूप दिवसांनी त्यालाही मोकळं वाटत होतं, आठवडाभर निवांत घालवल्यावर त्याने नोकरीची शोधाशोध सुरू केली.
बऱ्याच ठिकाणी बायोडेटा फॉरवर्ड केला.
पुढच्या काही दिवसात त्याला चार ठिकाणाहून इंटरव्ह्यूसाठी कॉल पण आले.
जमेल असं वाटत होतं, पण कुठेच काही जमलं नाही.
निराश न होता त्याने प्रयत्न चालू ठेवले. सगळ्या मित्रांना, ओळखीच्यांना सांगून ठेवलं, काही असेल तर सांगा.
रोज पाच सहा ठिकाणी तो बायोडेटा पाठवायचा, कधी बोलावणं यायचं कधी नाही.
आलं तरी कुठेतरी बोलणं फसायचं, जमून काहीच यायचं नाही.
यात दोन महिने निघूनही गेले. सेविंग्जवर सगळं चाललेलं.
नाही म्हणायला प्रिया चित्रकलेचे क्लासेस घायची. थोडाफार हातभार लागायचा. ती चांगली शिकलेली होती, पण मुलांसाठी तिने घरी राहणं पसंत केलेलं.
आता राजेशचाही नोकरी शोधण्याचा जोम ओसरू लागला. कुठेतरी त्याच्यात नकारात्मकता शिरत होती.
खरंतर त्याला हे सर्व करायचाच आता कंटाळा येऊ लागला होता. पण पोरांचे चेहरे त्याला पुन्हा प्रयत्न करायला भाग पाडायचे. यांच्यासाठी मला नकार पचवूनही पुढे जावंच लागेल, यांचं भविष्य माझ्यावर आहे म्हणून तो पुन्हा उठायचा, आणि शोधमोहीम सुरू करायचा.
प्रियाला काळजी वाटू लागली. सगळे सण असेच येऊन जाऊ लागले.
गणपती, नवरात्र, दसरा…… आता तर दिवाळीही आली. अजूनही कामाचा काही पत्ता नव्हता. मुलांसाठी का होईना आहे त्या परिस्थितीत त्यांना हसत हसत निभावावं लागत होतं.
खरंतर लहान असली तरी त्यांनाही कळत होतं, ही दिवाळी नेहमीसारखी नाही. तरीही त्यांचे ते उत्साहात होते.
तिने मुलांना जमेल तसे चांगले कपडे घेऊन दिले, घरात त्यांच्यासाठी काही फराळही केला.
नेहमी दिवाळीच्या चार दिवस अगोदरपासून फटाके आणायचे करत नाचणारा राजेश आज चलबिचल अवस्थेत होता.
मुलंही लहान असून कित्ती शहाणी, स्वतःहून त्याच्या जवळ जाऊन बोलली, टिचरने सांगितलंय फटाके वाजवायचे नाहीत.
नातेवाईकांच्या, मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन, त्यांना घरी बोलावून आनंद वाटून दिवाळी साजरी करायची.
आमचे छोटे फ्रेंड्स घरी येणारेत आपल्या, आणि आम्ही ही जाणार आहोत त्यांच्या घरी!! खूप धम्माल येणार आहे.
मम्मी पप्पा आपण तुमच्या ही फ्रेंडच्या घरी जाऊया ना, कित्ती मज्जा येईल!!
आणि आजी आजोबा, काका-काकू कधी येणारेत गावावरून?? यावेळी गणपतीत गावी सुद्धा नाही गेलो आपण.
मुलं न राहवून बोललीच शेवटी!!
राजेश घरी बसून होता, उगाच घरच्यांना टेन्शन नको, म्हणून गणपतीत गावी जायचं टाळलेलं हिने. मुलं नाराज होती, पण हिने कशीतरी वेळ मारून नेलेली.
आताही तिने नेहमीसारखा गावाला फोन करून कुणाला आग्रहाने बोलावलं नव्हतं. पहिली दिवाळी अशी जाणार होती, जिथे गावाला राहणारे आजी-आजोबा आणि काका-काकू, छोटी भावंडं येणार नव्हते. खरंतर तेही तिकडे वाट पाहत होते. त्यांनाही यायचं होतं.
पण नेहमी गणपतीला येणारी मंडळी आली नाही, तेव्हाच त्यांनी ताडलं, काहीतरी घडलंय नक्की. त्यांना वेळ देऊ, सांगतील स्वतःहून.
आता मुलांनी विचारल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. घरी पाहुणे येणार याचा आनंद मुलांना सर्वात जास्त असतो.
तिला आठवलं, ती सुद्धा कशी दिवाळीत त्यांच्या घरी राहायला येणाऱ्या पाहुण्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसायची.
ते येणारेत म्हटल्यावर येईपर्यंत उत्साहात झोपही यायची नाही तिला नीट. तेव्हा कुठे काय मिळत होतं, आतासारखी छानछोकी काही नव्हतीच.
आता आपण करतो तशी भारंभार खरेदी तेव्हा कुठे होती. मिळाला तर ड्रेस मिळायचा एखादा. पण आपल्याला त्या वयात त्याचं काही नव्हतं.
आपला आनंद म्हणजे, आजी, आई, काकू दिवाळीत गप्पा मारत फराळ बनवत असताना, तो सारखा सारखा मागून खाण्यात होता, गरम गरम चकली कधी एकदा गार होतीये, अन् कधी तोंडात पडतीये, याची वाट पाहण्यात होता, करंज्यांचं सारण भरण्यासाठी बहिणीबरोबर भांडताना होता, शंकरपाळ्यांचे तोबरे भरण्यात होता.
पाहुण्यांनी भरलेलं घर, हाच सर्वात मोठा आनंद असायचा आपल्यासाठी.
आणि आता !!
आता मला उगाच पैसे नाहीत म्हणून मनाजोगी खरेदी करता नाही आली, तर नाराज झाल्यासारखं वाटतय. हे सगळं मोठं झाल्यावर बदललं कसं? तो निर्भेळ आनंद पैश्यात कसा हरवून गेला??
मुलं तरी कुठं काय मागतायत? तेही खरंतर आपल्या लहानपणासारखीच घर भरण्याची वाट पाहतायत. त्यांचा आनंद त्यातच आहे. द्यावा का जो हवाय तो आनंद त्यांना!!
बोलवावं का आपल्या माणसांना आपलीच आहेत नाहीतरी, बोलली काही तर बोलुदेत!! घेऊ ऐकून…….
मुलं तर खुश होतील. विचार करताच तिला मोकळं वाटू लागलं, खूप दिवसांनी मनात आनंद दाटून आला.
राजेशला सांगू म्हणून ती उठली, तर राजेशच समोरून प्रिया मला नोकरीचं कन्फर्मेशन मिळालं ग, करत आनंदाने ओरडत आला. तो मागे पंधरा दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू दिला होता ना, एका मल्टिनॅशनल कंपनीत, तिथून कालच कॉल आला होता. पण म्हटलं, कन्फर्मेशनचा मेल आला की सांगावं!!!
प्रिया अगदी हरखून गेली, आता पहिला फोन लावते गावाला, विचारते तुम्ही येताय की घ्यायला येऊ आम्हीच!! काहीही होवो ही दिवाळी नेहमीप्रमाणे एकत्रच साजरी करायची.
तिने फोन लावला देखील, आणि माफी मागून घडला सारा प्रकार सांगितला. मुलं तुमच्यायेण्याकडे डोळे लावून बसलीयेत. आपल्या जवळच्या माणसांनी भरलेल्या घराच्या आनंदाची सर दुसऱ्या कशालाच नाही.
काका-काकू तर आजी-आजोबांना घेऊन निघालेच होते तसेही, त्यांना त्यांची पोरं कुठे बसून देतायत. त्यांनीही मुलांसाठीच न बोलवता जायचं ठरवलं होतं. तयारीच करत होते निघण्याची.
प्रियाने मुलांना सरप्राईज द्यायचं ठरवलं.
आणि जेव्हा ते सर्व आले, तेव्हा ते सरप्राईज त्यांच्या मुलांसाठी लाखमोलाचं ठरलं. तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पैशाने विकत मिळणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही आनंदाशी कधीही तुलना न होऊ शकणारा होता!!
सारं घर दिवाळीत आनंदाने भरलं होतं, मुलांना हवं तसंच आपल्या प्रेमाच्या माणसांनी सजलं होतं!!
©️स्नेहल अखिला अन्वित
लेख आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा😊