ह्याला वाटलं तरी कसं मी याच्यासारख्या एखाद्याला हो म्हणेन??
हल्ली कोणीपण येतं अन् प्रपोज करतं!! अर्णा आपल्या मैत्रिणीला सांगत होती.
मैत्रीण म्हणाली, पण त्याचं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर, त्याच्या डोळ्यातच दिसतंय.
अर्णा म्हणाली, त्याचं असेल ग, पण माझं नको का? त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याला हो म्हणू का आता??
स्वराज आणि अर्णा एकाच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होते. अर्णा दिसायला गोड, बोलण्यात कुणाला न ऐकणारी एकदम ऍक्टिव्ह मुलगी.
तिच्यावर फिदा बरेचजण होते. त्यातलाच एक स्वराज. दिसायला जरी चांगला होता, तरी पहिल्या नजरेत छाप पडेल असं त्याचं व्यक्तिमत्व नव्हतं. मात्र तो अर्णासाठी एकदम वेडा होता. सतत तो तिच्या मागेमागे असायचा. आणि अर्णा त्याला झटकत रहायची.
तिला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडायचं नाही.
तिच्या नजरेतली स्वप्नं काही वेगळीच होती. त्यात हा स्वराज कुठेच बसत नव्हता.
तिची नजर नेहमी कुणा दुसऱ्यांवरच स्थिरावायची.
तशी खूप हँडसम मुलं तिच्या भोवती फिरायची, तिला प्रपोजही केलं होतं त्यांनी.
ती सर्व अर्णाला दिसायला जरी आवडत असली, तर तिला त्यांच्याबद्दल खात्री वाटत नव्हती. ती आतापर्यंत कधीही प्रेमाच्या वाटेला गेली नव्हती. आणि तिने ठरवलेलं मी ज्याच्यावर प्रेम करणार, त्याच्याशीच लग्न करणार.
उगीचच टाईमपास करत मला कोणाबरोबर फिरत बसायचं नाहीये.
कॉलेज संपायला आलं तरी तिला कोणी मनासारखं मिळालच नाही. मागे असणाऱ्या कुठल्याही मुलाकडे बघून हा आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहील असं तिला वाटलंच नाही.
अपवाद फक्त स्वराजचा होता, त्याला बघून का कोणास ठाऊक तिला वाटायचं, हा आपली साथ सोडणार नाही. पण तिला तो अजिबात आवडायचा नाही. त्यामुळे त्याचा विचार ती मनातून काढूनच टाकायची.
स्वराजचे सगळे मित्र तिला त्याच्या नावाने चिडवायचे, अगदी तिच्या मैत्रिणी सुद्धा, पण ते तिला मुळीच आवडायचे नाही. ती म्हणायची, कोणावरूनही नका रे चिडवू.
कॉलेजचं शेवटचं वर्ष भुर्रकन उडून गेलं, सगळे वेगवेगळ्या दिशेला पांगले.
स्वराज मात्र न चुकता अर्णाला बघायला यायचाच. रोज संध्याकाळी त्याची एक फेरी असायचीच अर्णाच्या घरावरून.
अर्णाला वाटायचं, किती वेडा आहे हा!! मी याच्याकडे ढुंकूनही बघत नाही आणि कधी बघणारही नाही, तरी मला पटवायचे प्रयत्न काही सोडत नाहीये. कसं होणार याचं??
कॉलेजनंतर प्रत्येकजण आपापल्या करिअरच्या वाटेवर धावत होतं. प्रत्येकाला स्वतःच अस्तिव सिद्ध करायचं होतं.
अर्णाला भटकंतीची आवड होती. म्हणून तिने ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा पूर्ण केला आणि स्वतःच्या बोलण्यातील चातुर्यामुळे चांगल्या टुरिझम कंपनीत नोकरीही मिळवली.
स्वराजने फायनान्स मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला, त्यालाही मोठ्या कंपनीत जॉब मिळाला.
करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्यात दोघांचीही पाच वर्षे निघून गेली.
या पाच वर्षात काही वेगळं जरी घडलं नसलं तरी, असा एकही दिवस गेला नाही की स्वराज अर्णाला बघायला आला नाही. बरेचसे तिचे मित्र-मैत्रिणी तिच्या कॉन्टॅक्ट मधून गेले होते. पण स्वराज मात्र तिच्यासाठी जसा होता तसाच राहिला, तिची वाट बघत.
त्याचे मित्र कितीदा तरी तिला वाटेत अडवून सांगायचे, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, एकदातरी त्याचा विचार कर.
ही त्यांना म्हणायची पकवू नका रे. मी त्याला कधीच हो म्हणणार नाही, मला तो आवडतच नाही.
स्वराज स्वतःच्या ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन नेहमी अर्णाच्या एरियात फिरायचा. कधी ती त्याला ऑफिसमधून येताना दिसायची, तर कधी दुकानात काही घेताना, नाहीतर मग तिच्या घराच्या बाल्कनीत उभी असलेली दिसायची.
तिची झलक त्याला बघायला मिळायचीच, आणि त्याशिवाय तो घरीही जायचा नाही.
एके दिवशी मात्र अर्णाला ऑफिसमधल्या कामामुळे घरी यायला खूपच उशीर झाला, तिने तसे घरी फोन करून सांगितलेले होते. त्यामुळे घरचे निश्चिंत होते.
पण स्वराज मात्र इतका वेळ झाला तरी अर्णा कुठेच दिसेना, म्हणून तिची वाट पाहत तिच्या एरियात फिरत बसला.
दहा वाजले तरी अर्णा त्याला दिसली नव्हती. त्याच्याकडे तिचा मोबाईल नंबर होता. पण त्याने कधीच तो लावला नव्हता. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने तो लावून पहिला, पण अर्णाकडे त्याचा नंबर सेव्ह नसल्याने अनोळखी नंबर म्हणून तिने उचलला नाही.
साडेदहा वाजता अर्णा आली,आणि तिला घरासमोर स्वराज दिसला. त्याने तिला हसून बाय केले आणि तो निघून गेला.
त्या क्षणी अर्णाच्या मनात चलबिचल झाली. काहीतरी हललं. अरे देवा, एवढ्या वेळ हा आपली वाट बघत थांबला होता??
वेडा आहे नुसता!!
त्या दिवशी तिला झोपताना पण अगदी कॉलेजपासून त्याचं मागेमागे करण़ं आठवत होतं. त्याचं मागेमागे करणं आणि तिचं त्याला धुडकावून लावणं!!
पहिल्यांदा तिला, का कुणास ठाऊक खूप गिल्टी फिल झालं.
दुसऱ्या दिवशी तिने तो अनोळखी नंबर कोणाचा आहे बघू, म्हणून लावून पहिला.
आणि स्वराजने तिकडून हॅलो म्हटल्यावर, हिला छातीत धडधडलं. एवढी बोलणारी ती , काहीच बोलू शकली नाही. स्वराजच म्हणाला, मला काल जरा जास्त काळजी वाटली, म्हणून मीच फोन केला होता. व्हेरी सॉरी, पुन्हा नाही करणार.
तिने ओके बोलून फोन ठेऊन दिला. आणि बोलता आलं नाही म्हणून त्याला मेसेज टाइप केला, काही हरकत नाही, मी तुझा नंबर सेव्ह करतीये, कॉल केलास तरी चालेल.
इकडे तो मेसेज पाहून स्वराजच्या डोळ्यात पाणीच आले. एवढ्या वर्षात पहिल्यांदा अर्णा त्याच्याशी नीट बोलली होती.
इकडे अर्णाला देखील त्याच्याबद्दल खरंच काहीतरी वाटू लागलं होतं. तसा त्याच्या डोळ्यातला विश्वास तिला पहिल्यापासूनच सांगत होता, मी कायम आहे तुझ्यासाठी, पण तेव्हा तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
आणि आता मात्र तोच विश्वास तिला त्याच्याकडे खेचत होता.
तिलाही हळूहळू पटत चाललेलं, हा आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही.
अर्णाने जरी कॉल केला तरी चालेल म्हटलेलं, तरी स्वराजने तिला एकही कॉल केला नव्हता.
तिच्या मनात काय चाललंय माहीत नसल्याने, त्याला वाटलं कशाला उगाच तिला डिस्टर्ब करा.
अर्णा मात्र रोज त्याच्या फोनची वाट पाहत होती. तसं तर रोज तिला तो बघायला यायचा, पण आता अर्णापण त्याची वाट पाहायला लागली होती.
दिवस नुसते पाहण्यातच चालले होते, अर्णाला वाटायचं, या वेड्याला कसं कळणार, मलाही तो आवडायला लागलाय.
अशीच एक दिवस अर्णा ऑफिसवरून येत होती, आणि नेहमीप्रमाणे तिच्या घराबाहेर स्वराज तिला दिसला, तो निघणारच एवढ्यात तिने त्याला बोलावलं, आणि म्हणाली, माझं लग्न ठरलंय, आता तरी हे सारं बंद कर.
स्वराजचा चेहरा पूर्णपणे पडला. तो काही न बोलताच तिथून निघून गेला. त्याला खूप बेचैन वाटत होतं.
घरी पोचतोय तोपर्यंत त्याच्या फोनवर अर्णाचा मेसेज आला, मी चुकून ठरलं म्हणाले, खरं तर लवकरच ठरेल.
मुलगा मी पसंत केलाय, पण तो घरी विचारायला येईल तेव्हा सारंकाही पक्कं होईल.
त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो त्या मनस्थितीतच नव्हता.
अर्णाने पुन्हा मेसेज पाठवला, त्या स्वराजला आता तूच सांग ना जरा, मी त्याची वाट बघतेय, कधी येणार आहे तो माझ्या घरच्यांना विचारायला…..
स्वराजने तो मेसेज वाचला आणि तो उडालाच!!
असं काही प्रत्यक्षात घडेल, याचा विचार त्याने कधी केलाच नव्हता. खरंतर अर्णालाही कधीच वाटलं नव्हतं, ती स्वराजच्या प्रेमात अशी कधी पडेल. तिला तर तो बघायलाही आवडत नव्हता.
तिला फक्त त्याच्याबद्दल विश्वास होता, आणि त्याच विश्वासाने पुढे जाऊन तिला तिचं खरं प्रेम मिळवून दिलं होतं.
तो विश्वास आजही तसाच कायम आहे, पंचवीस वर्ष पूर्ण व्हायला आलीयेत त्यांच्या लग्नाला आता. स्वराजने कधीच तिचा विश्वास तोडला नाही. प्रत्येक सुखात दुःखात तो कायम तिच्या बरोबर राहिला. फक्त दिसण्याला प्राधान्य न देता विश्वासाला प्राधान्य देऊन अर्णाने केलेली स्वराजची निवड त्याने अगदी सार्थ ठरवली.
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल