अर्पितच्या लग्नासाठी मुलींची खूप शोधाशोध चालली होती.
अर्पितच्या खरं तर फारशा काही डिमांड नव्हत्या. तरीही येणाऱ्या प्रत्येक मुली मात्र त्याला नकार देत होत्या.
अर्पित दिसायला तर चांगला होता, नोकरी चांगली आणि पगारही चांगला होता.
मग घोडं कुठे अडत होतं बरं??
म्हणतात ना, लग्न घरदार पाहून करतात, तसंच त्या मुली आणि त्यांच्या घरचे जेव्हा घरदार पाहायला यायचे, तेव्हा त्यांना अर्पितचं घर अजिबात आवडायचं नाही.
तिकडून उत्तर यायचं बाकी सगळं चांगलं आहे, पण घर तेवढं दुसरं पाहिजे होतं.
अर्पित एका चाळीत राहायचा. अगदी त्याचा जन्मही तिथलाच. ती वास्तू त्याच्या खूप जिव्हाळ्याची होती. चाळीत असूनही चांगल्या तीन खोल्या होत्या त्यांच्या. पण चाळीत राहणं मुलींना नको वाटायचं.
त्याचे आई बाबा त्याला नेहमी म्हणायचे, आपण ही जागा बदलू , म्हणजे तुझं लग्न पटकन होईल. नवीन घर घेऊ कुठेतरी.
त्यावर अर्पित म्हणायचा, जागेत काय आहे? ऐन मोक्याच्या ठिकाणी आपलं घर आहे. ते सोडून कुठे लांब जायचं? इथली किती सवय आहे आपल्याला. सगळा एरिया हाकेला धावून येणारा आहे. किती वर्षाची सोबत आहे साऱ्यांची!!
अरे पण म्हणून काय सगळेच चिकटून राहिले का इथे, कित्येकांनी नवी घरं घेतली, आई -बाबा त्याला खूप समजवायचे.
अर्पितचं म्हणणं होतं, पण त्यांना करमतं का तिथे?? सारखी इथली आठवण काढत असतात. किती एकटं वाटतं तिकडे त्यांना, माहिती आहे ना??
आणि मला खरं सांगा, तुम्ही तरी आता या वयात असे बाजूला जाऊन पडल्यासारखे राहणार का? करमेल का तुम्हाला??
अशा मोक्याच्या ठिकाणी जागा घेणं तर शक्य नाही आपल्याला, मग कुठे तरी लांबवरच जावं लागेल ना??
त्यावर दोघे एकमुखाने म्हणायचे, तुझ्या लग्नासाठी करू आम्ही ऍडजस्ट!!
अहो, पण प्रश्न फक्त पाच- सहा वर्षांचा तर आहे. रिडेव्हलपमेंटची बोलणी चालली आहेत ना आपल्या इथे, किती मस्त घर होईल आपलं?? ते सुद्धा एवढ्या मोक्याच्या ठिकाणी!!
आणि नुसतं घर बघून येणारी मुलगी नकोच मला, थोड्या वर्षाची ऍडजेस्टमेंट करता येणार नसेल तर कसं चालेल??, अर्पित काही ऐकायला तयारच नव्हता.
अर्पितच्या आईवडिलांना खूप काळजी वाटत होती, अर्पितच्या लग्नाची. मुलगा ऐकायला तयार नाही तर काय करायचं, हेच कळत नव्हतं त्यांना.
या सगळ्यात सहा महिने असेच निघून गेले. दिवाळी आली. सगळी चाळ दिव्यांच्या झगमगाटाने लखलखायला लागली.
एक दिवस अर्पित आईला म्हणाला, आज दिवाळीच्या निमित्ताने माझे ऑफिसमधले फ्रेंड्स येतील ग फराळाला.
येऊ दे खुशाल, सगळी तयारी करून ठेवते मी, त्याची आई अगदी आनंदाने म्हणाली.
ठरल्याप्रमाणे अर्पितच्या ऑफिसमधली मंडळी संध्याकाळी त्याच्या घरी आली.
चार मित्र आणि दोन मैत्रिणी. घरात शिरल्या शिरल्या अर्पितच्या आईने त्यांचे हसतमुखाने स्वागत केले.
फराळ करता करताही बऱ्याच गप्पा टप्पा सुरू होत्या. बोलता बोलता त्या दोघीतली एक म्हणाली, किती छान आहे घर तुमचं. मला ना चाळ सिस्टिम खूप आवडते. घराचा दरवाजा सतत उघडा. सगळ्यांचा एकमेकांशी घरोबा. एकाला बोलावलं की चारजण धावत येणार. नाहीतर आमच्या ब्लॉकमध्ये कोणी कोणाला विचारत नाहीत. दरवाजे सतत बंद. कुणाच्या घरी डोकवायची पण खोटी. एकलकोंडं वाटतं अगदी.
तुमच्या इथे वाटतयं तरी की दिवाळी आहे, आमच्या इथे सगळे सण सारखेच!!
ती हे बोलली अन् अर्पितसह त्याचे आईवडील तिच्याकडे एकदम कौतुकाने पाहू लागले.
आई म्हणाली, अगं पण आजकालच्या पोरींना नाही आवडत असं चाळीमध्ये रहायला. इथलं असं मोकळं वातावरण नाही रुचत त्यांना.
पण मला तर खूप आवडतं हे सगळं, माझ्या आईचं माहेर चाळीतलच होतं, केवढी धम्माल यायची तिथे गेल्यावर. मला तर घरीच जायचं नसायचं, ती अगदी उत्साहाने सर्व सांगत होती.
थोड्या वेळ अशाच गप्पा झाल्या, आणि सगळे त्यांच्या घरी निघून गेले.
त्यांना खाली सोडायला गेलेला अर्पित घरी आल्यावर त्याची आई म्हणाली, किती गोड होती रे ती!!
अर्पित म्हणाला, कोण ऊर्जा??
हो तिच चाळ आवडणारी, मला खूप भावली रे ती.
बघ ना तिला विचारून, यंदा कर्तव्य आहे का??
अर्पितला हसायला येतं खरं. पण तिच्या त्या बोलण्याने त्याच्याही मनात कुठेतरी जागा केली होती.
एवढे दिवस मी काम करतोय हिच्याबरोबर, कधी काही वाटलंच नाही. आणि आज अचानक कसं काहीतरी क्लिक झालं. आपण हिलाच शोधत होतो असं कसं एकदम वाटू लागलं, त्याला काहीच कळेना.
ऊर्जा, अगदी खूप सुंदर नव्हती, साधीच तरीही आकर्षक मात्र होती.
आता अर्पितची उर्जाकडे बघण्याची नजर बदलली होती.
तो तिला पाहून बावरायला लागला होता, तिच्याशी बोलताना अडखळायला लागला होता.
इकडे त्याची आई पण त्याच्या मागे लागली होती. तुझ्याकडून होत नसेल तर मला नंबर दे, मी विचारते म्हणून.
दोन महिने तर असेच घालवले अर्पितने.
मात्र उर्जालाही हळूहळू अंदाज यायला लागला होता, त्याच्या मनात काहीतरी चाललंय म्हणून. तिला तर बरेचदा त्याची गडबड बघून हसायलाच यायचं.
पण एक दिवस मात्र धीर करून ऑफिस सुटल्यावर अर्पितने तिला विचारलंच, चहा घ्यायला येणार का?
ऊर्जा झट्दिशी म्हणाली, कुठे घरी का??
अर्पित गोंधळून म्हणाला, नाही मी हॉटेलमध्ये विचारत होतो.
पण मला तुझ्या घरी आवडलं असतं चहा प्यायला, त्या निमित्ताने पुन्हा माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असत्या, ऊर्जा असं म्हणताच अर्पितने आनंदाने संमती दिली.
दोघेही घरी आले तर अर्पितची आई बाजूवाल्या काकूंबरोबर गप्पा मारत बसलेली होती.
त्या दोघांना बघून ती खूप खूष झाली. बाजूवाल्या काकू घरी जायला उठल्या तशा म्हणाल्या, काय हो होणारी सुनबाई वाटतं?
तुमच्या तोंडात लवकर साखर पडो !!, अर्पितची आई अगदी खूष होऊन म्हणाली.
आईs काय बोलतेस तू? असं म्हणत अर्पितने कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने ऊर्जाकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर त्याला लाली पसरलेली दिसली.
त्याला साsरं कळून चुकलं, अन् मग तिला वेगळं विचारायची काही गरजच पडली नाही.
पुढच्या अगदी दोन महिन्यातच अर्पित आणि उर्जाचं धुमधडाक्यात लग्न सुद्धा लागलं.
ऊर्जा अगदी थोड्याच कालावधीत त्या चाळीतल्या घरात एकरूप होऊन गेली.
चाळीतल्या त्या वातावरणात इतकी रुळली की हे घर रिडेव्हलपमेंट मध्ये कधीच जाऊ नये, असंच तिला वाटायला लागलं.
देव करो आणि भरपूर वेळ लागो त्या सगळ्या प्रोसिजरला. हे चाळीतलं वातावरण मला मनसोक्त उपभोगायला मिळो, प्रार्थनेतही हेच एकमेव मागणं मागायला लागली.
अर्पित तर खूपच खूष होता तिच्यावर, जशी बायको त्याला हवी होती, ऊर्जा अगदी तशीच होती !!
ती घरात आल्यापासून त्याने तिला ते अनेकदा बोलूनही दाखवलं होतं, तुझ्या अस्तित्वाने माझं घर भरलं. जे काही जसं आहे, ते तू तसंच हसतमुखाने स्वीकारलंस.
तिच्याकडे बघताना, त्याचं एक खूप आवडतं गाणं नेहमी त्याच्या ओठांवर यायचं, तो तिला ते बरेचवेळा ऐकवायचाही……….
राहें वोही, वादी वोही, बदला कुछ नही
फिर भी तेरे मिलनेसे है, दुनिया क्यो हसी
कही ख्वाबोमे हम, गुम ना होते
मेरे हमराही जो तुम ना होते
ऐसा समाँs ना होता, कुछ भी यहाँ ना होता
मेरे हमराही जो तुम ना होते
मेरे हमराही जो तुम ना होते……..💕
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
( कोणाच्याही प्रेमात असाल (नसाल तरी हरकत नाही), तर हे गाणं एकदा नक्की ऐकून पहा, खूप सुंदर आहे. ऐसा समाँ ना होता…..)
Nice story ….I love this story. …😘😘😘😘