काही माणसं कितीही मोठी झाली तरी मॅच्युअर होतच नाहीत.
अगदी साठी उलटली, सत्तरीला पोचली तरी नाहीत.
कुठे काय बोलायचं हे त्यांना मरेपर्यंत समजत नाही. नको तिथे नको ते बोलतात, आणि इतरांच्या रोषाला कारणीभूत ठरतात. आणि समोरचा रागावला की साळसूदपणे म्हणतात, माझ्या मनात तसं काही नव्हतंच. मनात तसं काही नव्हतं तर मग तोंडातून बाहेर कुठून येतं, तेच कळत नाही असल्यांच्या.
अशोकरावही त्यातलेच. ते असतील सत्तरीचे आणि बायको असेल पासष्टीची. एकदा काही कारणाने त्यांची बायको आजारी पडली, अगदी हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. घरी आल्यावर जमेल तसे तिचे नातलग बघायला येऊ लागले. एक दिवस त्यांच्या जुन्या घराच्या शेजारी राहणारी, त्यांच्या बायकोची मैत्रीण तिच्या यजमानांबरोबर तिला भेटायला आली.
आता त्यांच्या बायकोची तब्बेत तशी बरी होती. थोडे हास्यविनोद बोलता बोलता चालले होते. अर्थात आजारी माणसाला बरं वाटावं म्हणूनच. तेवढ्यात अशोकराव फट्कन म्हणाले, तुम्ही माझ्या बायकोवर हसायला आलात काय? मला नाही आवडणार कुणी माझ्या बायकोवर हसलं तर!!
सगळे एकदम गप्प झाले. त्यांच्या बायकोवर कोणी हसत नव्हतंच. उलट तिचं मन रमावं म्हणून तर चाललेलं सगळं.
भेटायला आलेल्या त्या मैत्रिणीच्या डोळ्यात तर पाणीच आलं.
त्यांचा मुलगा अमित तिथेच होता. तो पटकन बोलला, काय बोलताय तुम्ही बाबा? लहान मुलालाही कळेल ती गोष्ट तुम्हाला कळत नाही की मुद्दाम करताय?
किती लांबून आलीये मावशी, आईला भेटायला. आणि तुम्ही काय बोलताय? तुमच्या अशा वागण्याने कोणी जास्त घरी येत नाही आपल्या. ती आईवर कशाला हसेल? प्रत्येक वेळी धावून येते ती आईला काही झालं की बघायला, आणि तुम्ही असं बोलता?
सुतकी चेहरा करून बसायला कोण गेलं नाहीये इथे……..
आणि काय सांगता, बायकोचं कौतुक? ढुंकून तरी बघता का तिच्याकडे? किती वेळा जाऊन बसला होतात हॉस्पिटल मध्ये सांगा?
ती म्हणून राहिलीये तुमच्याबरोबर, दुसरी एखादी केव्हाच सोडून गेली असती.
काय कमी त्रास दिला तुम्ही तिला? तुमच्या त्रासामुळेच लवकर खचली ती. तरुणपणातच काय अजूनही बाहेर लाळ गाळत फिरत असता. येतं आमच्याही कानावर बरंच. आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून. माझी आई घरात बसून तुमचा संसार सांभाळायची, आणि बाहेर तुम्ही दुसऱ्या बायकांना फिरवायचात. आणि आता बायकोवर किती प्रेम आहे दाखवता?
अहो, तुम्ही जेवढं छळलंय ना आईला तेवढं कुणी छळलं नसेल. तुमच्यामुळे मला बाहेर खेळायला जायची पण लाज वाटायची, सगळे हसायचे मला तुमच्यावरून. माहिती होती ना सर्वांनाच तुमची थेरं.
तुमच्यामुळे माझं बालपण लवकर सुटलं. आईसाठी मी लवकर मोठा झालो. लहान वयात मला मॅच्युरीटी आली, आणि तुम्हाला अजूनही नाही…….
मला तर तुम्हाला घरात ठेवावंसही वाटत नाही. तिला सांगतो चल, सोडून टाकू या माणसाला. तर ऐकत नाही ती. म्हणते, एवढी वर्ष काढली, आता थोडक्यासाठी कशाला? तिने आपल्या डोळ्यावर आणि मनावर कातडं ओढून घेतलंय केव्हापासूनच. राग येतो मला तर तिचाही. पण परत वाटतं, कोण आहे तिचं? तिच्यावर आपणही रागावून बसलो, तर काय करेल ती?
अमितचं सगळं फ्रस्टेशन बाहेर निघत होतं. तो आणखी काही बोलू नये म्हणून त्याला अडवत अशोकराव म्हणाले, पाहुण्यांसमोर तू माझा अपमान करतोयस. त्यांना जाऊदे मग बोलू आपण.
ते ऐकून अमित पुन्हा चवताळून म्हणाला, तुमच्यासाठी पाहुणे असतील ते, माझ्यासाठी नाहीत. माझ्या आईची सुखदुःखातली साथीदार आहे माझी मावशी. तुम्ही पर्वा सोडलेली तिची, तेव्हा माझ्या या मावशीने आधार दिला तिला. अजूनही तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडणारी आई मला आठवते.
आणि त्याबरोबर तुमचा माजुरीपणाही आठवतो. एवढ्या बायका फिरवल्यात, एक तरी बाई टिकली का तुमच्याबरोबर? आमच्या तोंडचा घास भरवलात त्यांना, कुठायत आता त्या?
कोण संभाळतय तुम्हाला, ज्या बाईला जन्मभर रडवलत तिचा मुलगाच ना? आणि हे ही सांगतोय ती आहे तो पर्यंतच बघणार मी तुम्हाला, नंतर देणार टाकून वृद्धाश्रमात.
तिच्यामुळे झेलतोय मी तुम्हाला, नाहीतर तोंड बघायची इच्छा नसते मला तुमची.
बास रे अमित, सोडून दे सगळं, अशोकरावांची बायको न राहवून म्हणाली.
आई, सोडून दिलं असतं ग, जर यांना शहाणपण आलं असतं. ते तसेच आहेत अजूनही. त्यांना आपण चुकलोय, किंवा चुकीचं वागलोय याची जाणीवही नाहीये. नको तिथं काहीतरी बरळतात. एवढही समजू नये का आता त्यांना? स्वतःच्या चूका दिसत नाहीत, मात्र इतर लोकांच्या चांगल्या बोलण्यात पण चुका दिसतात.
त्या दिवशी मामाचा फोन आला तुला, तर म्हणतात कसे. पैसे वाचवायला व्हाट्सप वरून केला. अरे कुठून का करेना, केला ना? यांना कोण विचारतं का तरी, एका तरी नातेवाईकाचा कॉल येतोका यांना कधी? सगळ्यांनी तोडून टाकलंय. तरी कसं जमतं यांना असं वागणं?
मरताना तरी जाणीव होणार का यांना कुणास ठाऊक, आपण चुकलो होतो याची?
चला, मावशी-काका मी तुम्हाला स्टेशनला सोडायला येतो. तुम्ही यांचं मनावर घेऊ नका, पण माझ्या आईला नेहमी भेटायला येत जा, एवढं बोलून अमित त्यांच्याबरोबर बाहेर पडला.
अशोकरावांची बायको भींतीकडे तोंड करून काही न बोलता पडून राहिली. तरी अशोकराव तिला म्हणालेच, बघ तुझा पोरगा कसं बोलला मला.
बायकोला खरं तर त्यांच्या तोंडी लागण्याची अजिबात इच्छा नव्हती; पण तरी ती न राहवून म्हणाली, माझा पोरगा आहे म्हणून दोन वेळचं जेवायला घालुन पोसतोय तुम्हाला, तेच नशीब समजा आणि गप पडून रहा माझ्यासारखं………
मुलाच्या आणि बायकोच्या बोलण्याचा मनावर खोल परिणाम होऊन अशोकराव पुढे सुधारले असतील, असं जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सांगते, तसं काही घडलं नाही आणि पुढे कधी घडण्याची शक्यताही नाही. कारण आपण चुकतोय हेच ज्यांना मान्य नसतं, ते सुधारणार तरी काय कप्पाळ!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.