आई मी लग्न नाही करणार, माझ्यासाठी उगाच स्थळं शोधू नका……
सगळ्या मुली अशाच म्हणतात पहिल्यांदा, नंतर बरोबर लग्न करतात.
आई, तुला का वाटतं, मी त्या सगळ्या मुलींसारखीच असेल म्हणून?
तू ओळखत नाही का मला, मी ठरवलेलं करतेच.
अनुश्री हे काय वय आहे का तुझं काही ठरवून तसच करायचं? कुणी चांगला आला समोर की बरोबर करावं वाटेल लग्न.
माझं वय अठ्ठावीस आहे आई, चांगली सज्ञान आहे मी. मला चांगलं कळतंय मी जे बोलतेय ते.
मला खरंच नाही करावं वाटत लग्न. मला नाही कुठल्याही बंधनात अडकायचं, मला माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणेे जगायचंय.
अगं गोड बंधन असत ते, अनुश्री!!
असेल पण खरंच प्रत्येकवेळी गोड असतं? मग मावशीने का तोडलं ते गोड बंधन? आणि तो खाली दुसऱ्या मजल्यावर राहणारा, त्याचं तर एका वर्षातच तुटलं ते गोड बंधन…….
माझं बंधन गेले बत्तीस वर्षांपासून अतूट आहे अनुश्री, हे विसरू नकोस.
हो माहीत आहे मला. पण आहे बंधनच. आजही तू नाष्टा काय बनवायचा, जेवायला भाजी कुठली हवी, सुट्टीत फिरायला कुठं जायचं, कुणाच्या लग्नात किती आहेर द्यायचा, इतकंच काय घरात कुठलीही गोष्ट आणायची झाली तरी बाबांना विचारूनच करतेस. तुला कधी विचारतात बाबा, कुठली गोष्ट ठरवताना? तू तुझ्या मर्जीने काय करतेस सांग?
तरी खरंच तुला हे गोड बंधन वाटतं? का तुझ्या मनात कधी स्वतःच्या मर्जीचा विचार येत नाही?
आजी-आजोबा होते तेव्हा त्यांची मर्जी चालायची, तू पूर्ण अडकवून घेतलंस बंधनात स्वतःला. मला नाही जमणार असं.
मावशीने लग्नातर दहा वर्षाने विरोध करायला सुरुवात केली, थोडक्यात तिच्या मनाने जगायला सुरुवात केली तर तिला घराबाहेर पडावं लागलं…….
अगं अनुश्री, सगळेच असे नसतात. आणि मी सुखी आहे यात. मावशीचा स्वभाव थोडा वेगळा होता.
आई, काही वेगळा नव्हता. फक्त तुला अडजेस्ट करून राहायची अजूनही हौस आहे आणि तिची मेली, एवढंच.
लग्न म्हणजे मटका. मी नाही हे माझ्या ऑफिसमधल्या बायका बोलतात. हजारात चार जणांना लागत असेल, त्यांना सगळीकडून सगळं चांगलं मिळत असेल, बाकी तुझ्यासारखे ऍडजेस्टमेंटवाले, नाहीतर मग मावशीसारखे मधेच ऍडजेस्टमेंट तोडून टाकणारे.
नवरा चांगला तर सासूचा त्रास, सासू चांगली तर नवरा खराब, बरेचदा तर सगळयाचाच जाच.
माझ्या ऑफिसमध्येही बघते ना, कितीजणींचे डोळे एवढ्या तेव्हढ्यावरून भरतात. कितीजणी डबा खाताना काहीतरी आठवून रडतात.
ती मनवा, किती खूष होती, लग्न ठरलं तेव्हा. सतत कौतुक करायची नवऱ्याचं, सासुचं, सगळ्या सासरच्या माणसांचं. लग्न झाल्यावर मात्र तीन महिन्यातच माहेरी गेली, ते परतायचं नाव घेईना. आता चुकूनसुद्धा विषय काढत नाही तिकडचा.
तू अशी म्हणतेस अनुश्री, जसं मुलीच सारं ऍडजस्ट करतात. मुलंही करतात ग. त्यांची घरही करतात.
हो ना आई, पण तूच सांग. अशी घरं किती? आठवून मला दहा तरी उदाहरणं दे.
अगं बदल घडतोय, ते बघ. संख्या वाढेल हळूहळू.
सारखं नेगेटिव्हच कशाला डोक्यात ठेवायचं?
आई, जास्त तेच दिसतं सध्या. आणि तुम्हीच म्हणता ना, काहीही करताना योग्य विचार करावा माणसाने.
मग मी केलाय तो खूप आणि मगच ठरवलंय मला यात पडायचं नाही.
बदलतोय ना समाज, मग हा ही बदल स्विकारा की!!
लग्न हिच स्रीजातीची इतिकर्तव्यता का? ते करण्यासाठीच जन्माला आलो का आम्ही? जिला वाटेल तिने करावं, नाही वाटलं तर राहू द्यावं तसच. ते करावंच म्हणून भरीस तरी पाडू नये किमान!!
कोण तरी जोडीदार पाहिजे हे खरं, पण तो किती टिकुन राहील, याची काही शाश्वती आहे का? ज्याला वाटते त्याने नक्की करावं लग्न. ज्याची पूर्ण ऍडजस्ट करायची तयारी आहे त्याने नक्की करावं लग्न. आणि ज्यांची तयारी नाही, तरी खुमखुमी आहे त्यानेही नक्की करावं लग्न……
पण तो ज्याचा त्याचा प्रश्न असावा, त्याच्यावर सोडून द्यावा.
पण माझ्या सगळे मागे लागलेत ग नातेवाईक, त्यांना काय उत्तर देऊ? मी समजेन एकवेळ, ते समजतील का?
ते माझ्या लग्नानंतरच्या सुखी संसाराची गॅरेंटी देतायत का विचार, तुला त्यांना उत्तर देण्याची गरजच लागणार नाही.
आई, प्लिज सध्यातरी मी माझ्या विचारांवर ठाम आहे. पण वाटला कधी कुणावर तेवढा विश्वास, जोखून पाहिल्यावर समोरचही वाटलं तेवढं ऍडजस्ट करणारं, आणि भेटलं कोणी मला कधी लग्नानंतरही माझ्या मनासारखं, मला हवतसं जगून देणारं, तर विचार बदलेलही माझा. पण असं कोणी भेटलं तरच ह……
काय म्हणता तुम्ही? मिळेल का अनुश्रीला तिच्या मनासारखं, तिला हवतसं जगून देणारं कोणी?
अगदी फार नाही, ऍडजेस्टमेंट करायची तर दोघांनीही, इतकीच काय ती तिची अपेक्षा आहे…….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.