आई इकडे ये, मी बघ तुझ्यासाठी काय आणलय?
काय ग काय आणलंयस एवढं? उगाच खर्च करत राहते सारखी…….
इकडे ये, हे बघ. असं म्हणत किर्तीने आपल्या आईसाठी आणलेलं सोन्याचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं.
तिच्या आईला तर एक सेकंद सुचलच नाही काही बोलायला. पण झटक्यात तिने ते गळ्यातून काढलं,आणि म्हणाली, अगं वेडी बिडी झाली काय ग तू? एवढी महागाईमोलाची वस्तू आणलीस ते. कशाला घालवले एवढे पैसे?
किर्ती तिला समजावत म्हणाली, आई अगं मी सहा महिने पैसे साठवले होते, याचसाठी. मला पगारही चांगला आहे की. मग आणू नये का मी मला हवं ते?
तुझ्यासाठी करायचं होतंस. आता हे आपण तुझ्या लग्नासाठी ठेवू. मला काय गरज?, असं म्हणत तिच्या आईने ते तसंच बॉक्समध्ये ठेवलं.
किर्तीने आईचे दोन्ही हात पकडले, आणि म्हणाली, पण माझी इच्छा होती ना ग, केव्हापासूनची आई. डोक्यावर स्वतःचं घर असावं, म्हणून तू बाबांना हातभार लावायला मंगळसूत्र दिलंस. मी लहान होते पण तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसलेलं. बाबाही तुला म्हणालेले, आपण पुढे करू नंतर. पण ते पुढं करणं कधी जमलंच नाही त्यांनाही. मला तेव्हापासूनच वाटायचं काहीतरी जादू व्हावी, खूप सारे पैसे माझ्याकडे यावेत, आणि दुकानात जाऊन तुझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन यावं. पण जादू काही झालीच नाही कधी.
पुढे परत दादाच्या उच्च शिक्षणासाठी तुला उरलेल्या दोन बांगड्याही मोडाव्या लागल्या. तू दाखवलं नाहीस पण तेव्हाही मला दिसलंच. म्हणूनच मग अभ्यासावर खूप जोर दिला, आणि स्कॉलरशीपवर माझं शिक्षण पूर्ण केलं. ते सर्व खरंतर मी ध्यासानेच केलं, मला माझ्या आईच्या अंगावर तिचे गेलेले दागिने घालायचे होते. आई, आम्हाला काही नाही वाटत. पण तुमच्या पिढीला शौक होता दागिन्यांचा माहिती आहे मला. कुठे कुठल्या कार्यक्रमाला गेलं, की बायकांची नजर दागिन्यांवरच असायची. मी ऐकलंय, नातेवाईकांना तुला त्यावरून हिणवताना. खोटं आहे का, अगदी खऱ्यासारखं दिसतंय!! पण आमचं खरं आहे बरं का!! काय अन् काय……
तू ऐकून घ्यायचीस पण मला तर खूप राग यायचा. मी गाठच बांधलेली तेव्हापासून माझ्या आईला तिचे गेलेले दागिने परत आणून देणार.
मुलगी एवढा आपला विचार करत होती, हे ऐकूनच किर्तीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, काय ग करू मी आता याचं, किर्ती. तेव्हा हौस होती, असावं वाटायचं. त्यावेळी काढून द्यावं लागलं, आता कुठे जाऊ घालून मिरवायला. हे तुलाच राहू दे.
किर्ती तिला दटावून म्हणाली, अजिबात नाही आई. माझी इच्छा म्हणून तुला घालावंच लागेल. हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात बघणं ही स्वप्नपूर्ती आहे माझी इतक्या वर्षांची!! मला तर पहिल्या पगाराला तुझ्या पुढे करायचं होतं. पण नाही जमलं. सहा महिने मी कसे काढले, मलाच ठाऊक!!
किर्ती, कुठलं मी पुण्य केलं एवढं ते तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला. दादाच्या शिक्षणासाठी बांगड्या दिल्या, त्याला आठवणही नाही त्याची. दोन वर्षे झाली नोकरी करतोय. घर चालवतोय, पण माझ्यासाठी असं काही आजपर्यंत आणून दिलं नाही त्यानी. मोठ्या घरात राहायला जायचं स्वप्न आहे त्याचं!! नवरा पुढे नंतर चिक्कार दागिने करू म्हणाला होता खरा, त्यानेही रिटायरमेंट नंतर आलेल्या पैशात स्वतःला हौस म्हणून गाडी घेतली. पण साधं एक ग्रॅम सोनं आणलं नाही घरात. मला तर कधी वाटलही नव्हतं, कुठला खरा दागिना माझ्या अंगावर येईल कधी. मी माझे दागिने तुम्हालाच समजायचे. दोन पोरं आहेत ना सोन्यासारखी, मग कशाला हवेत कुठले दागिने? मनाला मुरड घातली होती माझ्या.आणि आज तू हे माझ्यासाठी घेऊन आलीस, तिच्या आईच्या डोळ्यात बोलता बोलता परत पाणी आलं.
किर्तीने त्या बॉक्समधे ठेवलेलं मंगळसूत्र परत काढलं, आईच्या गळ्यात घातलं आणि म्हणाली, आई तुझ्यासाठी आणलंय, आणि तुला आता हक्काने हे घालायचय सुद्धा. मला माहितीये, मंगळसूत्र तरी खरं असावं, असं सगळ्या बायकांना वाटतं. तुलाही वाटायचं……..आणि एवढंच नाही, तुझी मुलगी तुझी दागिन्यांची सगळी हौस पूर्ण करणार आहे. तू मला सांग फक्त तुला काय काय हवंय ते. तुझ्या हातात बांगड्याही पहायच्यात मला. कुठलेही दागिने बघितले की मला वाटतं, हे आपल्या आईच्या अंगावर कसं दिसेल? आणि आहे ना कॅपेबल मी. मला स्वतःला नाही आवडत, पण मला तुझ्यासाठी दागिने करायचेत. लहानपणापासुन तेच स्वप्न उराशी बाळगून आहे मी. चल, आरश्यामध्ये जाऊन बघ बरं, कशी दिसतेस ते!!
तिची आई आरशासमोर गेली खरी, पण गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा, आरशातून समोर दिसणारा, स्वप्नपूर्तीच्या तेजाने झळाळणारा आपल्या पोटचा दागिना तिला जास्त मनोवेधक वाटत होता…….!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.