सकाळी उठल्यापासूनच मंजिरीला का कोण जाणे प्रसन्न असं वाटतच नव्हतं. इतरवेळी नेहमी उठली की तिच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल यायची. बेडरूममधून बाहेर आल्यावर, सासूबाईंना चहा झाला तुमच्या दोघांचा? असं जवळपास रोजच विचारायची ती. खरंतर दोघांचा चहा झालाच असायचा, पण समोरच्या माणसाशी काहीतरी बोलून दिवसाची सुरुवात झाली पाहिजे ना? खरंतर मोठ्याने ‘गुड मॉर्निंग’ म्हणावं वाटायचं तिला. जे ती तिच्या आईकडे असताना करायची. पण इकडे तिला उगाच थोडं ऑकवर्ड वाटायचं.
तशा सासूबाई चांगल्याच होत्या तिच्या. सकाळी तिच्यासाठीही चहा बनवून ठेवायच्या. उठली की आयता चहा मिळायचा तिला. तिलाही कौतुक होतं त्याचं आणि त्यांच्या हातचा चहा आवडायचाही खूप तिला.
कधीतरी काहीतरी खटकायचं. पण तेवढं तर चालायचंच नाही का?
आजही नेहमीसारखा गरम गरम चहा घेतला. बरं वाटलही. पण उदास वाटणं काही थांबतच नव्हतं.
त्याच अवस्थेत तिने नाष्ट्यासाठी शिरा बनवायला घेतला. रवा भाजताना खिडकीतून समोर दिसणाऱ्या झाडावर पोपटाची जोडी दिसली मात्र अन् मनाला एकदम आनंद वाटला तिच्या. गावाला शाळेत जाता येताना खूप सारे पोपट दिसायचे, तिला खूप आवडायचं त्यांना बघायला. त्यांची पिसही होती तिच्याकडे त्यावेळी!!
पण मुंबईसारख्या शहरात इतक्या वर्षांनी पहिल्यांदा पोपट दिसले तिला, तेही जोडीने. एकदम आनंदून जाऊन तिने आपल्या सासूबाईंना बोलावलं, आणि जोडी दाखवली. सासूबाईंनाही आनंद वाटला. पटकन जाऊन तिने मुलाला उठवलं, आणि म्हणाली, ते बघ, कोण दिसतंय खिडकीतून!!
चल बघायला म्हणून त्याला उचलून स्वैपाकघरात कट्ट्यावर उभं केलं, आणि पोपटाची जोडी दाखवली. मुलाने आतापर्यंत पुस्तकात, टिव्हीत पाहिलेलं त्यांना, आता प्रत्यक्षात बघताना त्यालाही आनंद झाला. आजोबांनी त्याला त्याची दुर्बीण आणून दिली, मग तर त्याला ते अगदी जवळच असल्यासारखे वाटले.
ती जोडी उडेपर्यंत तो तिथून हललाच नाही.
मंजिरीने शिरा केला, तो सर्वांना द्यायला डिश मध्ये काढताना पुन्हा ती उडून गेलेली जोडी परत आली. मग तिने सगळ्यांना डिश दिल्या, आणि स्वतः खाता खाता त्या जोडीला बघत बसली. मनात विचार आला, किती बरं आहे ह्यांचं. मस्त स्वच्छंदी उडतायत, इकडे तिकडे. आणि मी, अडकून पडलीये नुसती. कंटाळा आला आता. मलाही बाहेर पडावं वाटतय, मोकळं व्हावं वाटतय.
वैताग आला घरी बसून बसून. तेच तेच चेहरे बघून………
त्यांना बघूनच, आज पहिल्यांदा कधी नव्हे ते तिला स्वतःहून वाटलं, आपणही पडावं का ह्यांच्यासारखं बाहेर? सहा महिने झाले आता, जे काय बघतीये ते घरातल्या खिडक्यामधूनच…….. घरी लहान पाच वर्षांचा पोरगा म्हणून नको वाटत होतं आपल्याला. पण बिल्डिंगमधली माधवी तर जाते की. तिच्या घरी कोणी पुरुषमाणूस नाही. सगळं तीच बघते. तिला कुठं काय झालं? ती सोनाली तर ऑफिसलाही जाते.
आपले सासरेबुवा पण सकाळी लवकर फिरून येतात. तेही चांगले आहेत अजून.
मीच का बसलीये घरी? उबग आला आता मला. विनाकारण चिडचीड वाढत चाललीये आपली.
जाऊ दे, आज पडून बघुयाच घराबाहेर, विचार आला तसा तिच्या अंगात उल्हास शिरला एकदम.
मुलाकडे गेली आणि म्हणाली, चल येतो बाहेर?
मुलगा म्हणला, कोरोनामध्ये बाहेर जायचं??
तूच तर म्हणतेना, तो गेला की जायचं?
मंजिरी म्हणाली, तो जाईल लवकरच. आपण राऊंड मारून येऊ चल. तो मास्क आणलाय ना तुला स्पायडरमॅनचा तो घाल. कुठे हात नाही लावायचा, अजिबात. सॅनिटायझर पण घेते मी. काळजी घेतली नीट, की काही नाही होणार. किती दिवस घरी बसायचं?
मुलगा पण खूष झाला. सासूबाई जाताना म्हणाल्या, जपून हो, पोराला नेतीयेस म्हणून म्हटलं.
मंजिरी म्हणाली, हो घेते मी काळजी.
साडेनऊचीच वेळ होती. दोघं घराबाहेर पडले, कोवळं कोवळं ऊन आलं अंगावर. तशी दोघांचीही चित्तं फुलून आली. मग ते उन्हाच्या साईडनेच चालू लागले. फारसं कोणी नव्हतं रस्त्यावर, तशी नेहमीही गर्दी नसायचीच. मुख्य रहदरीचा रस्ता नव्हताच तो. मुलगा मस्त उड्या मारत चालत होता. त्यालाही मज्जा येत होती. इतके दिवसांनी आईच म्हणाली बाहेर पडूया तर…….
मंजिरीला तर खूपच छान मोकळं मोकळं वाटत होतं. तिने मन भरून आकाशाकडे पाहिलं. आजूबाजूचा निसर्ग डोळ्यात भरून घेतला. बरीचशी झाडं होती तशी त्यांच्या कॉलनीत. तरीही चिमण्या आणि कावळे याशिवाय आतापर्यत तिला कोणी दिसलं नव्हतं. पण आज अचानक भारद्वाज पक्षी समोरून उडाला. तिने मुलाला दाखवलं, आणि म्हणाली नमस्कार कर, हा पक्षी दिसला की चांगलं असतं. मला गावाला रोज दिसायचे. कोरोना संपला की जाऊ आपण लवकरच.
आता तिला खरंच प्रफुल्लित वाटायला लागलं होतं. खूप दिवसांनी बाहेरची हवा अंगाला लागली होती. खूप दिवसांनी मास्क लावलेली का होईना वेगळी माणसं दिसली होती.
थोडं पुढे गेल्यावर मोठा रस्ता दिसला, तर तिथे अगदी नेहमीसारख्याच गाड्या धावत होत्या. तीच धावपळ होती, जी काही महिन्यांपूर्वी तिने शेवटची बघितली होती. तिला वाटलं, अरे सगळे तर लागले आपल्या उद्योगधंद्याला, आपण घरात होतो तर आपल्याला फक्त कोरोनाच दिसत होता. लोकं दोन हात करायला बाहेर पडलीयेत त्याच्याशी. सगळे काळजीही घेतायत नीट. कोणी विदाऊट मास्क नाही दिसलं अजून.
तिचा मुलगाही म्हणाला, किती गाड्या धावतायत ग. मला तर वाटलं कोणी नसेल, सगळे घरात बसले असतील, आपल्यासारखे.
मंजिरी म्हणाली, बाबाला घरून काम करायला मिळालं तसं सर्वानाच नाही मिळत बाळा. किती दिवस कोण घरी बसणार? आपणही पडलोच ना आज घराबाहेर?
मज्जा येतीये मला आज खूप खूप जास्त!!
आई मला रेस लावायची आहे, आपण घराच्या इथे गेल्यावर पळायचं हा, मुलगा रस्त्यातच मोठ्या आवाजात म्हणाला.
मंजिरीला वाटलं, खरंच किती दिवसात पोरगा पळालाच नाही माझा. तोही मिस करतोय सगळं.
मग तिने मुलाला त्याच्या मित्राच्या इथे नेलं, आणि त्याला खालून हाक मारायला लावली.
मुलाने जोरात ओरडून मित्राला बोलावलं, तो बाहेर आला तसं दोघांनी हाय हॅलो करून लगेच बायही केलं. बोलायला काही सुचलंच नाही दोघांनाही, एवढ्या महिन्यांनी पाहिल्यावर.
पण मंजिरीचा मुलगा खूष झाला आणि म्हणाला, आपण रोज येऊ ना असं फिरायला. खेळायला नाही फिरु दे तरी. किती मज्जा आली मला!!
तिने त्याचा पापा घेतला आणि म्हणाली, नक्की.
बिल्डिंग आली तशी मुलाने रेसची आठवण करून दिली, आणि वन टू थ्री म्हणून धावतही सुटला. त्याच्यामागे मंजिरीही. पहिला नंबर आला म्हणून मुलगा टाळ्या वाजवून नाचायला लागला. त्याला एवढं खूष पाहून मंजिरीला आणखीच झक्कास वाटलं.
घरी गेल्यावर फ्रेश होऊन मुलगा जास्तच उड्या मारायला लागला. मंजिरीही उत्साहाने कामाला लागली. सासूबाई आल्या मदत करायला तशी त्यांना म्हणाली, खूप छान, मोकळं वाटलं हो. तुम्हीही चला उद्या आमच्याबरोबर. सगळी मरगळ निघून जाईल. आम्ही रोज एक छोटीशी तरी फेरी मारायला जाणारच आहोत. आणि आपल्याला गर्दीत थोडंच जायचंय.
घरात कितीही म्हटलं तरी तेच तेच करून नको वाटतं माणसाला, घराबाहेरची ती मोकळी हवा अंगाला स्पर्शून गेली की मन उल्हासित होतं बघा, चार वेगळी लोकं बघितली की बरं वाटतं, ती झाडं, फुलं, वेली, पक्षी सारे सुखावून जातात जीवाला!!
त्यांच्याकडे बघूनच नवी ऊर्जा आल्यासारखी वाटते अंगात……..
ती घेणं गरजेचं आहे हो, नाहीतर जगण्यातला नैसर्गिक आनंदच हरवून गेल्यासारखा वाटतो अगदी……..!!
सासूबाई हसून म्हणाल्या, ते तुम्हा दोघांना बघून लक्षात आलं माझ्या. तो पोरगा तर बघ, उत्साहाने नुसता सळसळतोय. रोज नाही पण कधीकधी नक्की पडेन हं मी घराबाहेर, तुमच्याबरोबर तो आनंद घ्यायला!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज हल्ला गुल्ला नक्की लाईक आणि फॉलो करा.