अरुंधती वाडेकर- निवृत्त शिक्षिका
दरवाज्यावरच्या पाटीवर नाव वाचलं, आणि रश्मीने बेल वाजवली. तसा एका साधारण तिच्याच वयाच्या स्त्रीने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह ओळखून रश्मीने सांगितलं, मी वाडेकरबाईंना भेटायला आलीये. आहेत का त्या घरी?
रश्मी असं म्हणताच, त्या स्त्रीने हसून तिला आत घेतलं. पाणी दिलं आणि बाईंना आवाज दिला.
बाई दोन मिनिटातच आल्या. त्यांच्या चेहऱ्यातला तजेलदारपणा अजूनही तसाच वाटला रश्मीला. तशीच शिडशिडीत अंगकाठी होती अजूनही. रश्मीने मनात कॅल्क्यूलेशन करून वयाचा अंदाज मांडला, तर पासष्टीच्या निघाल्या. पण दिसण्यावरून पाच-सहा वर्षे तरी मागेच वाटत होत्या.
रश्मीने ओळख करून दिली, पण त्यांच्या लक्षात ती आलीच नाही. त्या म्हणाल्या, अगं चेहरे बदलतात ना ग मुला-मुलींचे, आम्ही तशाच राहतो. तुम्ही ओळखता, पण आमचा मोठा प्रॉब्लेम होतो.
कुठे कुठे विदयार्थी भेटतात. ओळखलं का विचारतात? आम्ही अर्थातच ओळखलेलं नसतं, पण सांगावं कसं? चेहऱ्यावर किती उत्साह असतो पोरांच्या. बरं नाही वाटत ‘नाही’ म्हणायला.
रश्मीला वाटलं, आपल्या बाई अजूनही तशाच आहेत, बोलायला ओळख-पाळख काही लागत नाही. कुणाशीही गप्पा सुरु.
म्हणून तर आवडायच्या ना आपल्याला शाळेत?
अजिबात भीती वाटायची नाही बोलताना, काही विचारताना.
तशा तर सगळ्या शाळेच्याच आवडत्या होत्या. पण……बाकीचं सगळं रश्मीने मनातच थांबवलं.
ती म्हणाली, बाई तुम्ही मला आठवी-नववीला होता. मी रश्मी नलावडे. नववीला माझ्या क्लास टिचर होता तुम्ही. इतिहास शिकवायचात. तसा मला तो विषय अजिबात आवडायचा नाही. पण तुम्ही तो इतका रंगवून रंगवून शिकवायचात की तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखताना मी, कधी त्या विषयाच्या प्रेमात पडले मला कळलच नाही.
पुढे जाऊन मी त्याच विषयाची प्राध्यापिका होईन असं जर कुणी मला सांगितल असतं ना त्यावेळी, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण बाई, तुमच्यामुळे एक अजिबात रस नसणारा विषय मला अत्यंत आवडू लागला. तुम्हाला विसरणं शक्यच नव्हतं मी. ती ओढच घेऊन आली मला तुमच्यापर्यत.
आलं लक्षात, तूच ना ती जिने माझ्यासाठी दुधीचा हलवा आणलेला.
बाई तुमच्या लक्षात आहे अजून?, रश्मीला खूपच आश्चर्य वाटलं.
हो मग, असं कुणी कुणाला दिलेलं प्रेम विसरत नाही कधी!! इतिहासाची प्राध्यापिका झाली तू? वा!! फारच छान वाटलं, बाई कौतुकाने म्हणाल्या.
तेवढ्यात जिने दार उघडलं ती स्त्री, चिवडा आणि सरबत घेऊन आली.
बाई म्हणाल्या, ही शैला, माझी सून.
रश्मीला काही कळेना, बाईंनी लग्न कधी केलं?
त्या तर……….
आपल्या कसं कानावर आलं नाही? जाऊ दे, कशाला कोण बातमी देईल आपल्याला. आपण असतो तरी कुठं इथं? चार दिवसासाठी उडत उडत माहेरी येणार. सगळ्या गोष्टी कशा कळणार?
बाईंनी तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह वाचलं आणि म्हणाल्या, तू खा ते दिलेलं.
मी सांगते सगळं. तो शिरीष आठवतो का तुला?
रश्मी म्हणाली, शिरीष?? तो सोनटक्के सरांचा मुलगा ना?
हो तोच. ही त्याची बायको. तो माझा मानसपुत्र.
सर नाहीत आता. आम्ही एकत्र राहतो, म्हणजे एकमेकांना धरून आहोत, दोघांना एकमेकांचा आधार आहे.
तुझ्याही कानावर तर आलंच असेल ना तेव्हा सगळं.
रश्मीला काय उत्तर द्यावं कळलच नाही.
बाईच पुढे म्हणाल्या, कोणी कधी समजून नाही घेतलं आम्हाला.
सोनटक्के सरांची बायको लवकर गेली. हा शिरीष असेल त्यावेळी, चार वर्षाचा. आमच्या बाजूलाच राहायचे ते. तेव्हापासून फार वाटायचं मला त्याच्याबद्दल. माझीही आई लवकर गेलेली. त्यामुळे फार कणव यायची त्याची. त्याच्या आजारपणात स्वतःहून जायचे मी त्याला प्रेम द्यायला. त्याचं आजारपण काढायला. सोनटक्के सरांशी तर जेवढ्यास तेवढं बोलायचे मी.
पण लोकांना नाही बघवलं, काय काय बोलायला सुरुवात केली आमच्याबद्दल. शाळेत सुद्धा आमच्याकडे उगाच वेगळ्या नजरेने बघितलं जायचं. आमच्यात काहीही नाही हे कुणाला पटायचंच नाही. नववी- दहावीतली पोरं कुठे कुठे नावं लिहून ठेवायचे आमची.
माहिती आहे बाई मला, रश्मी मधेच हलक्या आवाजात म्हणाली.
हो ना, आणि बाकी सारे मोठे शिकले- सवरलेले सुद्धा टाळ्यांवर टाळ्या देत खमंग चर्चा करायचे. रिकाम्या डोक्यांना किती समजवायला जाणार?
ह्या सगळ्यात माझं लग्न ही ठरेना. कशी कुणास ठाऊक, सगळ्यांच्या कानावर अफवा जायचीच.
शेवटी मी एक दिवस ठरवलं, आणि सरांना म्हटलं, नाहीतरी काही नसताना सगळे नावं ठेवतातच आहेत, मग आपण दाखवून देऊ त्यांना लग्न करून. मला आवडेल शिरीषची आई व्हायला.
पण सर काय म्हणाले, माहिती आहे? ते म्हणाले, मला कोणाला काही दाखवायचं नाहीये. कोणी नावं ठेवतात, म्हणून मला नातं जोडायचं नाहीये. नाती मनातून जोडली जातात, कुणाला दाखवण्यासाठी नाही. मी माझ्या बायकोच्या जागी कोणालाच पाहू शकत नाही. मी तिची प्रतारणा, ती नसली तरी करणार नाही. कोणी काहीही म्हणो. तुम्हाला, मला आणि देवाला माहीत आहे ना? बास झालं!
हे सरांच्या तोंडून ऐकलं, आणि मी त्या क्षणापासून प्रेमात पडले त्यांच्या. खरंतर त्यांच्या विचारांच्या.
आणि मीही ठरवलं, आपणही असंच आपल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहायचं. कारण अश्या विचारांची माणसं कमीच. माझी अपेक्षा वाढलेली, मी सर्वांना सरांशी तोलून बघितलं असतं, आणि दुःखी झाले असते.
माझ्या वडिलांनी, एवढंच काय तर सरांनीही खूप समजावलं मला, पण मलाही माझ्या प्रेमाशी प्रतारणा करणं जमलं नाही.
शिरिषचं मी आईच्या मायेने सगळं केलं, तो तर स्वतःहूनच आई म्हणायला लागला मला. एवढा लळा लागला त्याला माझा.
अगदी सर जाईपर्यंत आम्ही तिथेच बाजूला राहत होतो. मग नंतर शिरिषने ही जागा घेतली, आणि माझ्या घरातून मला जवळपास उचलूनच इथे आणलं. आणि पाटी पण लावली ती माझ्या नावाचीच. तो म्हणतो, माझ्या आईने मला जन्म दिला, पण तू तेवढं एक सोडून सगळं दिलंस. हे माझं नाही तुझं घर आहे. मी तुला केव्हाच माझ्याजवळ ठेवलं असतं, माझीही इच्छा होती तू माझी आई बनून घरात राहावीस, पण बाबांना ते पटलं नसतं.
सर जाऊन दहा वर्ष झाली आता. त्या गोष्टीलाही खूप वर्षं झाली, पण त्या ‘काहीही नसलेल्या नात्यावरचा ठपका’ अजून काही पुसला गेला नाही तो नाहीच………..
अजूनही सोनटक्के सरांची ठेवलेली बाई म्हणूनच माझ्याकडे बघतात. असलं काही लोकांच्या स्मृतीतून जात नाहीच कधी!!
शाळेतलं कोणी भेटलं की थोडं इकडचं तिकडचं बोलतात, आणि नंतर मुद्दाम सोनटक्के सरांचा विषय काढतातच काढतात.
रिकामी मडकी, दुसरं काय? तूच आलीस एवढ्या आत्मीयतेने घर शोधून…….
रश्मी म्हणाली, बाई तुम्हाला कधी मी विसरूच शकत नाही. तुमच्या आठवणीने डोळे मिटले की अगदी तशाच हावभावात शिकवताना दिसता तुम्ही मला. माझ्या खूपच जास्त आवडत्या होत्या तुम्ही. तुमच्याबद्दल कोणी नको ते बोललं माझ्यासमोर, की मी अगदी भांडायचे त्यावेळी तुमच्यासाठी. मला अगदी मनापासून वाटायचं तेव्हाही, माझ्या बाई तशा नाहीत. आणि आज कळलंही, मी समजत होते, माझं मन मला सांगत होतं, ते अगदी खरं होतं.
तुमचं आणि सरांचं जीवन तर कुणी प्रेरणा घ्यावं असं आहे. क्वचित एखाद्यालाच जमू शकतं असं. बाकी प्रवचन देणारे तर चिक्कार असतात. पण बोललेलं कृतीत उतरवणारे तुमच्यासारखे विरळाच!!
तुम्ही शिक्षक म्हणून आदर्श होताच, पण माणूस म्हणूनही आदर्श ठरलात.
आणि ठपक्याचं काय घेऊन बसलात, तो देवाला तरी कुठे चुकलाय…..!!
ते ही खरंच. पण तुला सांगून मन हलकं झालं बघ. आतापर्यत कोणा दुसऱ्याला स्पष्टीकरण द्यावं वाटलंच नाही मला कधी. समोरचाही समजणारा हवा ना, असं म्हणत बाईंनी भरून आलेल्या डोळ्यांना खूप दिवसांनी मनसोक्त वाहू दिलं……….
रश्मी आणि शैला त्यांच्या पाठीवर आधाराचा हात फिरवत राहिल्या फक्त……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल