देशमुखांच्या सुनेला बघितल्यावर कोणालाही वाटायचं, यांना एवढी देखणी सुन मिळालीच कशी? मग उत्तरही त्यांचं तेच शोधायचे, पैसा पाहून भाळली असेल पोरावर!! पैसा है तो सब है……
देशमुख चांगले श्रीमंत होते. गावात मोठा बंगला होता त्यांचा. गावाबाहेर कारखाना होता. मुलगा चांगला शिकून कारखान्यालाच हातभार लावत होता.
दिसायला तसा सामान्यच होता. पण त्याचं लग्न मात्र अशा मुलीशी झालं की समोरच्याने आश्चर्याने तोंडात बोट घालावं!!
लग्नाला हजर असणाऱ्या सर्वांना वाटत होतं, पैशाने देखणी पोरगी मिळवली. देशमुखांचा पोरगा म्हणून, नाहीतर दुसऱ्या कुणाला थोडीच अशी मुलगी मिळाली असती. मुलीने फक्त पैसा पाहिलेला दिसतोय!!
पण मुली खरंच का फक्त पैसा पाहून लग्न करतात?
देशमुखांचा मुलगा अर्णव. कॉलेजमध्ये असतानाच त्याला स्पृहा मिळाली. पाणीदार डोळ्यांची स्पृहा कॉलेजमध्ये अनेकांच्या मनातली राणी होती. बघेल त्याला आवडायची ती. अर्णव सोडून बहुतेक सगळेच तिच्या मागे होते. अर्णवच्या मनात स्वतःच्या दिसण्याबद्दल गंड होता. म्हणून तो जरा दूरच राहायचा मुलींपासून. उगाच हिरोटाईप वागायचा प्रयत्नही करायचा नाही. तो खरंतर श्रीमंतांच्या घरचा मुलगा होता, पोरींवर इम्प्रेशन पाडायला तो काहीही करू शकला असता. पण त्याला वाटायचं ते माझं कुठाय? माझ्या वडिलांनी कष्टाने उभं केलंय ते. त्यावर मी का शायनिंग मारू?
त्याचे मित्र त्याच्याएवढे श्रीमंत नसूनही घरून हट्टाने गाड्या घेऊन मिरवत होते, अर्णव महागड्या बाईक काय कारही फिरवू शकला असता, तरी तो एका सामान्य मुलासारखाच फिरत होता. त्याचे मित्र वेडा समजून हसायचे त्यावर. त्याला म्हणायचे आम्ही देशमुखांच्या घरात जन्मलो असतो ना तर काय थाटात राहिलो असतो रे!!
चेहरा मोहरा सर्व बदलून टाकला असता स्वतःचा!! तू कसा काय ते सगळं करू शकत असून सुद्धा बसलाय असाच. मनात आणलस ना, तर सगळा बदलू शकतोस तू. पैसे ओत फक्त, रंगरूप सगळं बदलेल चुटकीसरशी. पोरींची लाईन लागेल मागे. कसा राहतो रे तू, कोण्या भिकाऱ्याच्या घरी जन्माला आल्यासारखा?
पण अर्णवला कधी ह्या गोष्टीचा मोह वाटलाच नाही. जसं असावं तसं दिसावं,असच त्याला वाटायचं.
त्याच्या या स्वभावामुळेच तो सगळ्यात वेगळा ठरला आणि काहीही प्रयत्न न करता स्पृहाच्या नजरेत आला.
स्पृहाला वाटायचं सगळी मुलं माझ्या मागे पुढे करतात, आणि याला अजून एकदाही माझ्याशी कधी बोलावंही वाटलं नाही. ह्याने कधी माझ्याकडे बघितलेलंही मला आठवत नाही. पिक्चरमध्ये तर श्रीमंत मुलं पैशाचा किती माज करताना दाखवतात. आणि हा असा कसा? तिच्या मनात आपसूकच त्याच्याबद्दल कुतूहल जागृत झालं. साधारण सगळ्यांच असंच असतं, आपल्याला जे भाव देतात, त्यांचं काहीच वाटत नाही. पण जे आपल्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, ते असे कसे काय बुवा करु शकतात, ह्याचा मोठा प्रश्न पडतो. आणि आपण त्यांचाच विचार आपण जास्त करायला लागतो. स्पृहाचही तसच झालं, तिला त्याच्याबद्दल उगाच आकर्षण वाटू लागलं. हा कसा इतका वेगळा? हे जाणून घ्यायला तिने अर्णवशी स्वतःहूनच मैत्री केली. सहज केलेली मैत्री तिला त्याच्या वेगळ्या स्वभावाच्या खूप जवळ घेऊन गेली. आणि दिसायला बरा म्हणण्याजोगा असलेला अर्णव त्या रुपसुंदरीला चक्क आवडायला लागला. एखादया श्रीमंत घरचा मुलगा इतके उच्च विचार ठेऊ शकतो, हेच तिच्या मनाला भावलं आणि तिने स्वतःहूनच त्याच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली.
अर्णवच्या कल्पनेतही नसलेल्या सुखाने त्याला स्वतःहून साद घातली होती. अर्णव हरखून गेला, तरीही त्याने तिला सांगितलं, माझं एक ध्येय आहे. माझ्या वडिलांचा स्वतःचा कारखाना जरी असला, जरी मी तिथे कधीही लागू शकतो, माझ्या वडिलांच्याच खुर्चीवर कधीही बसू शकतो, तरी मी स्वतःला त्यासाठी पात्र बनवेन तेव्हाच तिथे जाणार आहे. त्यासाठी वेळही लागू शकतो. मी काही अगदी हुशार नाही. पण प्रयत्नांवर विश्वास आहे माझा. ते कितीही करण्याची माझी तयारी आहे, त्यानेच मला माझी स्वतःची ओळख मिळवायची आहे. आणि नंतरच आपलं लग्न होईल.
सगळं सरळ असताना, सोप्पं असताना जाणीवपूर्वक वेगळा, कष्टाचा मार्ग निवडणारा नवरा कोणाला आवडणार नाही?? स्पृहा तर त्याच्यावर फिदाच झाली. त्याच्याकडूनच प्रेरणा घेऊन तिनेही इकडचं तिकडचं लक्ष काढून स्वतःच्या शिक्षणावर जोर दिला. तिला वाटलं, एवढया ध्येयवादी मुलाची बायको शोभण्यासारखं आपणही काहीतरी करावं.
वाणिज्य शाखाच होती तिची, तिने सी ए व्हायचं ठरवलं. त्याचा कारखान्यालाही फायदा झाला असता. प्रचंड अभ्यास करायला लागणार होता, पण तिने स्वतःलाच चॅलेंज केलं. तिलाही त्याच्या तोडीस तोड बनायचंच होतं.
दोघांनीही कठीण परिश्रमाचा मार्ग निवडला, आणि तो जिद्दीने पारही केला.
अर्णवचं शिक्षण झाल्यावर, त्याने स्वतःला कारखान्यात पाऊल ठेवण्यासाठी लायक बनवल्यावर मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टवर तो सहज बसू शकत होता, वडिलांनी त्याला तशी ऑफरही दिली होती. पण मला सगळं येतंय, मी मालक आहे हे विसरून प्रत्येक विभागात काम करून त्याला त्याचं व्यावहारिक ज्ञान घेणं गरजेचं वाटलं. त्यानुसार त्याने कारखान्यात स्वतःचं शिक्षण सुरू केलं. आणि मग त्यात हळूहळू पारंगत होत होत एकेक वरच्या पायऱ्या तो चढत गेला.
अर्णव आणि स्पृहा भेटले तेव्हा अठरा वर्षाचे होते फक्त. स्वतःला घडवण्यात त्यांनी पुढची आठ वर्ष जाऊ दिली. सव्वीसाव्या वर्षी बोहल्यावर चढले ते दोघे. त्यांनी मनात आणलं असतं तर, त्यांचं लग्न अगदी बावीस तेवीसाव्या वर्षीही सहज झालं असतं. स्पृहाला तरी काय गरज होती, स्वतःला सिद्ध करण्याची, ती तर तशीही मालकीण होणारच होती. अर्णवने कुठे तिला कोणती अट घातली होती? तिच्यासाठीही सगळी सुखं समोर होतं. पण तिनेही कष्ट घेऊन नाव कमावलं, स्वतःला तोडीस तोड बनवलं.
तरीही लोकं म्हणतात काय तर, मुली पैसा पाहून लग्न करतात……..!!
अगदी माझ्यासमोर एका लग्न समारंभात एक अतिशहाणा म्हणाला, मुलींंना काय पैसा हवा फक्त!! खूप वाद घातला त्याच्याशी पण त्याची मानसिकताच होती ती, त्याच्या डोक्यात घट्ट रुजलेली…….असा माणूस खऱ्या प्रेमापासून जन्मभर वंचित राहणार, हे निश्चित होतं. कारण बायकोने कितीही प्रेमाने काही केलं तरी त्या प्रत्येकाची तुलना त्याचं मन फक्त पैशाशीच करणार……..
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.
Good write
Sudarshanvalekar222.blogspot.com