मोहिनीला तसा पाऊस आवडायचा. अगदी वेडी नव्हती ती पण तो चिंब भिजलेला आसमंत नजरेत साठवायला खूप आवडायचा तिला. जून महिन्याच्या सुरुवातीला नवीन नवीन पडत असताना, फार कौतुकाने बघायची ती त्याच्याकडे. मुद्दाम भिजण्यासाठी ऑफिसवरून परतताना छत्रीही उघडायची नाही. पावसाचे तृषार अंगावर पडले की तिच्या मनाला खूप आनंद वाटायचा. तिशीची ती क्षणात अवखळ तरुणी होऊन जायची. आपल्याच तंद्रीत मस्त मजेत ट्रेनमध्ये, रस्त्यातही गाणी गुणगुणतच असायची ती. भानच नसायचं तिला कशाचही, एखादं कोणी थबकलं तिच्याकडे पाहून की मग तिला कळायचं, आणि स्वतःशीच खुदकन हसायची ती!!
हा बेधुंदपणा जेमतेम दहा बारा दिवस चालायचा, नंतर तो पाऊस म्हणजे तिला चिकचिकाट वाटायला लागायचा. ऑफिसला जाताना नेमका पडायचा तेव्हा तर अगदी रागराग करायची त्याचा ती. तिचं म्हणणं असायचं, येताना वाटेल तेवढं पडावं त्याने, जाताना का यायचं नेमकं? पण पाऊस तिला समजून घ्यायचाच नाही. त्याला उलट मज्जाच यायची कामावर जाणाऱ्या माणसांची खोड काढायला!!
त्यांची त्रेधातिरपीट उडवायला………
हे ही सगळ चालून जायचं तिला एकवेळ पण तो परतीचा पाऊस मात्र तिला अजिबात आवडायचा नाही. सप्टेंबर महिना सुरू झाला की तिच्या मनात कालवाकालव व्हायला सुरू व्हायची. नको नको वाटायचा तो. पण सुटकाही नसायची त्याच्याशिवाय.
एकीकडे वाटायचं, एकदाचा काय तो पडून संपून जाऊ दे. मग छान सण येतील. माझी आवडती दिवाळी येईल.
ती ऑफिसमध्ये असतानाच ते काळे ढग जमायला लागले, दणादण आवाज करायला लागले की हिच्या जीवात हुरहूर दाटून यायची. आता नीट घरी पोचायला मिळतंय की नाही कुणास ठाऊक?
पुन्हा सारं घडून गेलेलं डोळ्यासमोर यायला लागायचं.
जेव्हा मोहिनीचं लग्न होऊन साधारण चार वर्षच झालेली. आणि तिची चिमुकली फक्त दोन वर्षांची होती. एक वर्ष काढलेलं घरी तिने चिमुकलीसाठी. पण नंतर तिला स्वतःलाच ऑफिसला जावू वाटू लागलं. आर्किटेक्ट होती ती. तिचं करियर तिला साद घालत होतं. सासू- सासरे घरी होते. आणि सासूबाई प्रेमाने बघणाऱ्या ही होत्या मुलीकडे. मुलीलाही लळा होता त्यांचा.
त्यामुळे तशी निर्धास्त होती मोहिनी. मुलगी काही दिवस रडली होती तिच्यासाठी, पण नंतर छान रुळलीही.
मोहिनीचंही सगळं नीट चाललं होतं. एप्रिलच्या सुरुवातीला जायला लागलेली ती. आधी आधी जरा जास्तच व्याकुळ व्हायची ती चिमुकलीच्या ओढीने, पाच नंतर मन थाऱ्यावरच राहायचं नाही तिचं. एकेक मिनिट तिला मोठं वाटायला लागायचं. उगाच डोळ्यात पाणी यायला लागायचं. सहा वाजले की हातातलं सगळं सोडून घराकडं धाव घ्यायची ती. मनाने तर पोचलेलीही असायची चिमुकलीजवळ. तिच्यावर अगदी लेबलही लावलं गेलेलं, या मॅडम अगदी काट्यावर घरी पळतात म्हणून. पण तिला पर्वा नव्हती. तिला वाटायचं घड्याळाच्या काट्यावर येणं बघत नाही, पाच दहा मिनिटं आधीच येते मी तशीही. काट्यावर जाणं मात्र सगळ्यांना टोचतं. कधी नेमकी मिटिंग लागली, तर ती भले काहीही होवो, पण आर्जव करून निघायचीच. तिचं कामही चोख होतं, त्यामुळे मोहिनी तिच्या ऑफिसची गरज होती.
एप्रिल, मे तर चांगलाच गेला तिचा. तसा जून, जुलै, ऑगस्टने थोडा त्रास दिला होता. वेळेत निघूनही पोचायला नेहमीपेक्षा उशीर व्हायचाच. इकडे मोहिनी आणि तिकडे चिमुकली दोघीही कासावीस व्हायच्या. चिमुकलीलाही तिच्या येण्याची वेळ माहित झाली होती. ती ही कावरी बावरी व्हायला लागायची.
पण ते महिने गेले, सप्टेंबरचाही शेवटचाच आठवडा चालू होता.
नेहमीप्रमाणे चार साडेचार पासून अंधारायला, गडगडटाला सुरुवात झाली. लगेच धो धो पाऊसही सुरू झाला. मोहिनीला खिडकीबाहेर बघूनच उदास वाटलं. तिचं मन घराकडे आणखी ओढ घेऊ लागलं, चिमुकलीला भेटण्यासाठी. नेहमीप्रमाणे सहाच्या ठोक्यावर ती बाहेर पडली. अगदी पळतच रेल्वे स्टेशनवर आली. एक ट्रेन तर अगदी डोळ्यासमोरून गेली तिच्या. चिमुकली समोर येऊन, डोळे चटकन् भरून आले तिचे. ऑफिस सायनला होतं, आणि ती रहायची कल्याणला. अगदी काही मिनिटात दुसरीही ट्रेन आली. इतकी खचाखच भरली होती की प्रयत्न करूनही तिला चढता आलं नाही. जीवावर नको उदार व्हायला म्हणून ती स्वतःहूनच मागे हटली.
पण नंतर किती वेळ झाला तरी ट्रेन आलीच नाही. पाऊसही प्रचंड म्हण्याइतका पडायला लागला होता.
स्टेशनवर गर्दीही खूपच वाढली होती. तिने सासूबाईंना फोन करून सांगितलं, उशीर होईल म्हणून. चिमुकलीशीही बोलली. थोडं बरं वाटलं. आपल्या नवऱ्याला फोन केला. त्याने उचलला नाही, मग बाईकवर असेल म्हणून तिने कट करून टाकला. तिला खरंतर सांगायचं होतं त्याला, उगाच पावसात निघू नको. थोडा थांब कुठेतरी. आता त्याचीही काळजी वाटायला लागलेली मोहिनीला.
एक तास झाला तरी ट्रेन आलीच नाही. नक्की कशामुळे अडकलीये तेही कळत नव्हतं. कोणी कायकाय बोलत होत नुसतं. काहीतरी प्रॉब्लेम झालाय एवढं कळत होतं.
पावसाचा जोर थांबायचं नाव घेत नव्हता. घरी अगदी सुरक्षित होती चिमुकली, पण हिलाच रहावत नव्हतं, जसा उशीर होत होता तशी ती आणखी बेचैन होत होती. डोळे क्षणाक्षणाला भरून यायचं काम करत होते फक्त.
साडे आठवाजता एक ट्रेन आली, मोहिनी सुखावली. पण सगळ्या बायका अगदी तुटून पडल्या त्या ट्रेनवर. हिला प्रयत्न करूनही त्या लोंढ्यात घुसताच आलं नाही. वर्षानुवर्षाच्या सवयीच्या बायकांनी तिला त्याच्यात शिरायला जागाच ठेवली नाही.
ती ट्रेन गेली आणि मग मात्र तिचा बांध फुटला. तिला रडायलाच आलं एकदम. कधी मी घरी पोचणार आता, असं वाटलं तिला. तेवढ्यात नवऱ्याचाही फोन आला. तो पोचला होता. आणि चिमुकली त्याच्याबरोबर खेळत होती. तिला आरामात नीट ये, असं बजावलं त्याने.
उभं राहून पायही दुखायला लागले होते तिचे,आणि स्वस्थ बसावही वाटत नव्हतं. डोळे ट्रेनकडेच लागलेले फक्त.
नऊ वाजता घोषणा झाली आणि तिच्या जीवात जीव आला. पाऊस अजूनही कोसळतच होता. मनातल्या मनात खूप खूप शिव्या घालत होती ती त्याला. जा की मुकाट्याने, जाताना कशाला छळतो उगाच, काय काय मनात बोलत होती त्याच्याशी.
ट्रेन आली तशी कसलाही विचार न करता त्या गर्दीत झोकूनच दिलं तिने स्वतःला, आणि गर्दीनेही तिला साथ देत आत ढककलं. हुश्य, एकदाचा जीवात जीव आला तिच्या. आता काही झालं तरी ती सुखरूप घरी पोचणार होती. तिच्या चिमुकलीजवळ……..
ट्रेन चालली होती रडत रडत. पण चालली होती म्हणून तिला बरं वाटत होतं. पण कळव्याच्या आधी थांबली ती थांबलीच. अर्धा तास झाला तरी हलेना. दहा वाजत आलेले आता. तिला वाटलं हळू चाललेली तशीच चालायची होती की. थांबायचं कशाला?
शेवटी पाऊण तासाने हलली तेव्हा, तिला पुन्हा धीर आला.
तेवढ्यात नवऱ्याचा मेसेजही आला, इकडे पाऊस थांबलाय आता, मी येतो स्टेशनवर तुला घ्यायला. तिला वाटलं, चला पटकन जाता येईल चिमुकलीकडे.
ट्रेननेही आता जरा वेग घेतला होता. डोंबिवली गेलं तशी ती गर्दीत पुढे पुढे सरकत दाराजवळ जाऊन उभी राहिली. एकेक सेकंद मोजत. कल्याण आलं तसं मागच्या गर्दीने ढकलून बाहेर काढलं तिला. ती स्टेशनबाहेर पळतच सुटली. पळता पळता मधेच लक्षात आलं, श्याsआपण जवळ आल्यावर नवरयाला फोन केलाच नाही. पण समोर तिला तो दिसला. तशी पुन्हा आणखी पळत ती त्याच्याजवळ गेली, घडयाळात पाहिलं तर अकरा वाजले होते. पटकन गाडीवर चढली, आणि म्हणाली चिमुकली झोपली असेल ना रे आता. नवरा म्हणाला, छे, तुला भेटल्याशिवाय कसली झोपतेय. वाट बघतेय केव्हाची ती. तिला हायसं वाटलं.
घर आलं तसं ती झपकन उतरली, पळत पळत दुसरा मजला गाठला. बेल वाजवली, दार उघडलं गेलं, तशी चिमुकली दिसली डोळ्यासमोर. पुन्हा पळतच बाथरूममध्ये गेली, हात पाय तोंड धुतलं, पटकन पुसलं आणी चिमुकलीला छातीशी कवटाळून तिचे पापे घेऊन रडायलाच लागली.
चिमुकली खरंतर आई आली म्हणून आनंदाने हसत होती, पण आईला असं बघून गडबडून गेली. परत तिला आणखी घट्ट मिठी मारत मोहिनी म्हणाली, उद्या मी पूर्ण दिवस तुझ्याबरोबरच चिमुकले. उद्या सुट्टी घेणार मी, आणि परवा रविवार आपण दोघी दोन दिवस एकत्र.
चिमुकलीला काही कळलं नाही, तरी ती आईच्या कुशीत उबदारपणे बिलगून राहिली.
त्यानंतर बरेचदा परतीच्या पावसाने छळलं मोहिनीला, नंतर तिला सवयही झाली. चिमुकलीही थोडी मोठी झाली.पण तरीही परतीचा पाऊस म्हटलं की तो पहिला वहिला प्रसंग डोळ्यासमोर यायचाच तिच्या.
उगाच मनात हुरहूर दाटून आणणारा परतीचा पाऊस म्हणून तिला आवडलाच नाही कधी!!
(नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्री बरोबर असं झालं असावच कधी ना कधी. माझ्याबरोबर तर बसच्या, ट्रेनच्या दोन्ही प्रवासात झालंय……जीव पोरात अडकलेला, आणि बाहेर पावसाने उच्छाद मांडलेला. मनात आपोआप हिरकणीसारखी मुलांच्या अनावर ओढीची भावना दाटून येतेच अगदी!! )
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.