हो, सिरीयसली!! माझी बायको नॉर्मल नाही…….
साधा चहा मागितला तर म्हणते, घे नाही तर बस तिकडं. मी दमून आलीये तूच मला द्यायला हवा खरंतर, मलाच काय मागतोस?
माझ्या मागनं तासाभराने तर येते, आणि म्हणते दमले. मी दमतो त्याचं काही नाही. पण तसं बोलायची खोटी, तासभर आधी येऊन काय गोट्या खेळत होतास का म्हणून विचारते, हमरीतुमरीवर येऊन लगेच!!
बरं संध्याकाळी दमून येते ठीक आहे, सकाळी पण जड जातं, तिला माझ्या समोर कप टेकवायला, दुःख मला याचं होतं. जरा म्हणून नवऱ्याशी गुणी बायकोसारखी वागत नाही.
चहा देतीयेस का ग, असं कितीही हळुवाssर विचारा, ती हमखास खेकसून म्हणणारच,
मी एकीकडे भाजी हलवतेय, एकीकडे पोळ्या करतेय, आता कुठल्या हाताने चहा देऊ तुला?
घे नाहीतर बस तिकडं……
अगदी माशीला बाजूला करावं तशी उडवून लावते मला इथून तिथून…….
एवढं काय कामाला जाते तर, इतर बायकाही जातातच की? पण त्या कित्ती कित्ती करतात नवऱ्याचं!! माझ्या ऑफिसमध्ये तर माझे मित्र फुशारक्या मारत सांगतात, आम्ही इकडची काडी तिकडं करत नाही घरी…….बायको सगळं हातात देते.
डोळे तिथल्या तिथे टचकन् भरून येतात माझे!!
तोंडात बोळा कोंबल्यागत चुपचाप बसून राहतो मी अशावेळी!! कोणत्या तोंडाने सांगू, काडीचं काय घेऊन बसलात, माझी बायको दहा कामं केल्याशिवाय मला जेवायलाही देत नाही ………
अक्षरशः वाटणी केलीये वाटणी, सगळ्या कामांची तिने. 50-50 वर अडून बसते सारखी!! एकाने फक्त काम करायची आणि एकाने नुसतं लोळत बसायचं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, सतत म्हणजे सतत ठणकावून सांगत असते.
माझं ऑफिस नऊचं, तरी साडेसहा पासून उठवून ठेवते. तू चहा कर, मी कणिक भिजवते. मग म्हणते, तू भाजी कापून दे, मी पोळ्या लाटते.
माझा मीच चहा करायचा, आणि माझा मीच हाताने घेऊन पिऊन टाकायचा. हे बरोबर नाही म्हटलं, तर पोपटीणीसारखी बोलते लगेच, मी मागते का तुझ्याकडे, तुला का नसत्या अपेक्षा?
साधा डबा भरून द्यायला वेळ नसतो तिच्याकडे!! डबा भरला का ग, असं कितीही प्रेमरसात घोळवून विचारा, ही गॅरेंटेड डाफरूनच बोलणार, बघतोयस ना केवढी धावपळ चाललीये माझी? असं बोलवतं तरी तुला कसं? तुझं ऑफिस इथल्या इथं. तुला काय माझ्यासारखा धावपळीचा प्रवास नाही करावा लागत. तासभर लवकर निघून सुद्धा तासभर उशिराने येते मी घरी. एखादा नवरा स्वयंपाकाची तयारी करून ठेवेल. तू नुसत्या तंगड्या वर करून लोळत पडलेला असतोस…..
हो, आहे माझं ऑफिस जवळ. माझा काय दोष त्यात? आणि तंगड्या माझ्या, मी वर करेन नाहीतर खाली, हिला प्रॉब्लेम असायचं कारणच काय? कशाला ते माझ्या खाजगी बाबीत एवढं लक्ष घालायचं?
आणि मी काय आल्याआल्या कामालाच लागायचं का बरमुड्याच्या नाड्या खोचून……
पण असं उलट उत्तर कधी चुकून जरी तोंडातून बाहेर आलं तर, बायका पदर खोचून आल्या आल्या कामाला लागतात ते चालतं. त्या जरा बसलेल्या नाही बघवत कोणाला. पण तुम्हा पुरुषांना मात्र जन्मोजन्मी नुसता आराम हवा. असं बरंच काही भलतं सलतं बोलायला लागते ते थांबता थांबतच नाही, अगदी रात्रभर. दुनियेतल्या सगळ्या पुरुषांचं उट्टं काहीएक कारण नसताना फक्त आणि फक्त माझ्यावरच निघतं.
एवढं ऐकवून पदर खोचून कामाला लागत नाही ते वेगळंच. उलट त्या दिवशी सगळे पुरुष सारखेच असतात, हा तिचा भ्रम कायमचा दूर सारण्यासाठी मीच पुढे होऊन कामाला लागतो. चार वर्ष झाली, आता वाटतं, माझी स्वतःची भ्रमात जायची वेळ आली तरीदेखील, या बाईचा भ्रम काही दूर होणार नाही……
आयतं ताटावर येऊन जेवते, पण कध्धी म्हणत नाही. छान झालं हा सगळं.
मी त्याबद्दल तातडीने निषेध नोंदवला तर म्हणते, तुम्ही पुरुष किती वेळा कौतुक करता बायकांचं?
पण इथे मी एकट्याने निषेध नोंदवला असता, सगळ्या पुरुष जातीला त्यात खेचायचं कारणच काय? त्यांचं वेगळं, माझं वेगळं का असू शकत नाही? त्यांच्या पापांची सजा मला का?
म्हणूनच म्हणतो, बाई अजिबात नॉर्मल नाही!! किती बायका बघतो मी, मुकाट्याने घरातली सर्व काम करत असतात. नवऱ्याचा शब्द न शब्द झेलतात. स्वतः कामावर जाताना सुद्धा नवऱ्याच्या हातात प्रत्येक गोष्ट देतात, नवरा थकून भागून आल्यावर स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून त्याला हवं नको ते बघण्यात प्राधान्य देतात. पतीला परमेश्वर समजतात. आख्खा सुट्टीचा दिवस घरकामात घालवतात, नवऱ्याला एका चकार शब्दाने सुद्धा बोलून जागेवरून हलवत नाहीत.
कधी वाटतं, नक्की कोणतं पुण्य केलं असावं त्यांच्या नवऱ्यांनी? आणि मी कोणतं एवढं मोsssठ्ठं पाप??
फक्त आठ दिवसासाठी येते माझी आई, त्याहून जास्त तिला माझे हाल बघत राहवतच नाही. जाताना चार टिपं गाळतेच माझ्याकडे बघून. तिला फार वाटतं, एवढा सुदृढ बालकाचा किताब मिळवलेला माझा पोरगा, वाळवून टाकला कैदाशिणीनं!! बायकोच्या नकळत कित्येकदा बोलून दाखवलय मला तिनं, डोक्यावरून हात फिरवत. हो, तेवढी खबरदारी घ्यावी लागतेच मला, आई जायची काहीतरी बोलून पोराच्या प्रेमाखातर, ती ऍबनॉर्मल बाई झिंज्या उपटत बसायची माझ्या जन्मभर. ते काही परवडायचं नाही बाबा आपल्याला!!
आई म्हणते तसं, पदरी पडलं आणि पवित्र झालं, असं समजून निभावून नेतोय मी पदर नसतानाही!! उगीच कुठे एवढ्या तेव्हढ्यावरून संसाराला काडी लावायची?? बरं नाही दिसत ना……शिवाय लोकं काय म्हणतील ते वेगळंच!!
सांगा मला बायांनो, माझ्यासारखा बिच्चारा नवरा आहे का कोणाकडं?
बाप्यांनो, तुम्हीही माझ्यासारखा आवाज उठवू शकता बरं का, तुमचीही बायको माझ्या बायकोसारखी नॉर्मल नसेल तर…….!!
भले त्या आवाजाला कोssणी विचारणार नाही, पण तेवढंच मनाला बायकोविरुद्ध काहीतरी खटपट केल्याचं समाधान तरी मिळेल😜
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज “हल्ला गुल्ला” नक्की लाईक आणि फॉलो करा.